म्हापशात झोपड्या हटवल्या

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

झोपड्या हटवल्यानंतर सायंकाळी पुन्हा एक दोन झोपड्या उभारण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन संबंधितांना त्याबाबत ताकीद दिल्याने त्या झोपड्या त्यांच्याकडून स्वत:हून हटवण्यात आल्या.

सुदेश आर्लेकर
म्हापसा

म्हापसा बसस्थानकाच्या परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला परप्रांतीयांनी पुन्हा झोपड्या उभारलेल्या म्हापसा पालिकेने अखेर आज मंगळवारी सकाळी पाडल्या आहेत. यासंदर्भात म्हापसा पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून चांगल्यापैकी सहकार्य पालिकेला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाले. परंतु, आश्‍चर्याची बाब म्हणजे झोपड्या हटवल्यानंतर सायंकाळी पुन्हा एक दोन झोपड्या उभारण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन संबंधितांना त्याबाबत ताकीद दिल्याने त्या झोपड्या त्यांच्याकडून स्वत:हून हटवण्यात आल्या.
दरम्यान, या झोपडपट्टीसंदभांत वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी "धनिया' नामक व्यक्‍तीला म्हापसा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याचे खरे नाव गण्या फकिराज चव्हाण असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्याला काणका येथे जाऊन ताब्यात घेतले. तो झोपडपट्टीवासीयांचा मुकादम असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तेथील झोपड्यांमुळे परिसराला ओंगळवाणे रूप प्राप्त झाले आहे. सध्या त्या जमिनीची मालकी वाहतूक खात्याकडे असल्याचे सांगण्यात आले.
म्हापशातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्या झोपड्या म्हापसा पालिकेने हटवल्या होत्या. तथापि, त्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून नव्याने झोपड्या उभ्या राहिल्या होत्या.
यासंदर्भात म्हापसा शहरातील सामाजिक कार्यकर्ता शेखर नाईक यांनी सांगितले, खूप तक्रारी केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांना हटवले होते; पण, त्यांचा मुजोरपणा एवढा वाढलेला आहे की स्वत:च्या गॉडफादरच्या आशीर्वादाने ते पुन्हा तिथे आले आले. त्यांच्याविरोधात पालिकेकडे तसेच आरटीओकडेही तक्रारी केलेल्या होत्या. अखेर मंगळवारी पालिकेने त्या झोपड्या हटवल्या.
नाईक म्हणाले, गोव्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढतच आहेत व राजकारण्यांचे त्यांना पाठबळ मिळत आहे. छायांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झोपडपट्टीवासीयांकडून झाला. पत्रकारांच्या अंगावर ते धावून गेले. त्यांच्याविरोधात अर्वाच्य भाषाही वापरली.
आंतरराज्य बसस्थानक या नात्याने सध्या वापरल्या जाणाऱ्या त्या भागातील नियमबाह्य झोपड्यांवर पालिका त्वरित कारवाई करीत नाही. तिथे कचरा टाकला जातो. त्यामुळे हा परिसर विद्रूप झालेला आहे. त्या झोपड्यांत राहणाऱ्यांपैकी काही जण बाजारात भुरट्या चोऱ्या करण्यास फिरतात. काही दिवसांपूर्वी त्या झोपडपट्टीमधील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावार धावून गेल्या होत्या अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेनेच्या पदाधिकारी ऐश्‍वर्या साळगावकर या झोपडपट्टीवासीयांसंदर्भात म्हणाल्या, यापैकी काही परप्रांतीय बोडगेश्‍वर जत्रोत्सवाच्या निमित्त व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत. झोपड्या हटवल्यानंतर ते पुन्हा तिथे स्वत:चे बस्तान थाटतात. त्यांच्या बेकायदा व्यवहारांबाबत कारवाई झाली नाही तर आम्हालाच आता कायदा हातांत घ्यावा लागेल. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवावे यासाठी पोलिस निरीक्षकांनीही आवश्‍यक कारवाई करावी. तसेच, राज्य सरकारने लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालून त्यांना हटवावे.
पत्रकारांवर हल्ला
म्हापसा बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या खुल्या जागेत परप्रांतीयांनी उभारलेल्या तातुरत्या झोपड्यांची सामाजिक
कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाहणी करून वृत्तांकन करण्याच्या हेतूने गेलेल्या पत्रकारांना त्या परप्रांतीयांनी हातांत दगडधोंडे घेत हाकलून लावण्याचा प्रसंग काल सोमवारी दुपारी घडला होता. सुदैवाने संभाव्य हल्ल्यापासून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बचावले. त्या घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ता शेखर नाईक यांनी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. म्हापशातील समाजसेवक शेखर नाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार काही पत्रकार त्या दिवशी दुपारी १२.३० च्या दरम्यान त्या ठिकाणी गेले असता परप्रांतीयांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शेखर नाईक व त्यांचे मित्र सूर्यकांत चोडणकर तसेच पत्रकार सौरभ शिरोडकर व प्रकाश गडेकर त्या ठिकाणी गेले होते. त्या वेळी त्या लोकांचा मुकादम असल्याचे गणला जाणारा "धनिया' नामक इसम पत्रकारांशी तावातावाने बोलू लागला. त्यांनी असभ्य शब्दही वापरले. प्रसंगावधान पाहून पत्रकारांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर म्हापसा पोलिस स्थानकात त्यासंदर्भात तक्रारअर्ज सादर करण्यात आला.

त्या बेकायदा झोपड्यांसंदर्भात २७ रोजी म्हापसा पालिकेत तक्रार करण्यात आली होती. तथापि, कारवाई करण्याबाबत पालिका चालढकल करीत आहे. जर त्या झोपड्या कायदेशीर होत्या तर परप्रांतीय व्यक्‍तींनी पत्रकारांवर हल्ला करण्याची गरजच काय होती, असा सवालही उपस्थित होतो. झोपडपट्टीवासीयांचा मुकादम "धनिया' नामक व्यक्‍ती आहे. झोपडपट्टीवासीयांना संरक्षण देण्याचे काम तोच करीत आहे.
शेखर नाईक,
सामाजिक कार्यकर्ता

संबंधित बातम्या