हायड्रोक्सिक्लोकोक्विन उत्पादन क्षमता विनावापर

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

कोविड १९ या जगभरात हाहाकार माजवलेल्या विषाणूविरोधात लढण्यासाठी हायड्रोक्सिक्लोकोक्विन हे औषध गुणकारी ठरत असल्याचा डॉक्टरांचा अनुभव आहे. अमेरीकेने भारताकडे याच औषधाची मागणी केली आहे.

अवित बगळे
पणजी,

कोविड १९ या जगभरात हाहाकार माजवलेल्या विषाणूविरोधात लढण्यासाठी हायड्रोक्सिक्लोकोक्विन हे औषध गुणकारी ठरत असल्याचा डॉक्टरांचा अनुभव आहे. अमेरीकेने भारताकडे याच औषधाची मागणी केली आहे. आपल्या देशात केवळ एकच कंपनी अशा औषधाचे उत्पादन करते अशी माहिती प्रसारीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्या मालकीच्या कंपनीकडे या औषधाच्या उत्पादनाचा परवाना व दिवसाला २५ लाख गोळ्या उत्पादीत करण्याची क्षमता असूनही ती क्षमता विनावापर ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
याच वर्गातील गोळ्या तयार गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याची या कंपनीला औषध उत्पादनाचा परवाना असूनही सध्या मागणी नसल्याने त्या कंपनीने या गोळ्यांचे उत्पादन थांबवले आहे. राज्य सरकारच्या गोवा आर्थिक विकास महामंडळाची २६ टक्के मालकी तुये येथील गोवा अॅन्टीबायोटीक्स अॅण्ड फार्मास्युटीकल्स लिमिटेड या कंपनीत आहे. केंद्र सरकारच्या हिंदुस्थान लेटेक्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडे उर्वरीत मालकी आहे. सध्या या कंपनीत क्षमतेच्या पन्नास टक्के उ्त्पादन सुरु आहे. या कंपनीकडे क्लोरोक्वीन फॉस्फेट ही मलेरीयावर गुणकारी ठरणाऱ्या गोळ्यांचे उत्पादन करण्याचा परवाना आहे. दिवसाला पंचवीस लाख गोळ्यांचे उत्पादन या कंपनीत केले जाऊ शकते. या क्षमतेच्या धर्तीवर अन्न व औषध प्रशासन खात्याने हायड्रोक्सी क्लोरोक्वीन गोळ्यांचे उत्पादन करण्याचा परवाना दिल्यासही तेवढ्याच गोळ्या ही कंपनी उत्पादीत करू शकते.
ईडीसीने समभाग विकल्यानंतर या कंपनीने खुल्या बाजारातून अंग काढून घेतले आहे. केवळ संस्थात्मक पुरवठा केला जात आहे. एकेकाळी गोवा सरकार हे या कंपनीचे मोठे ग्राहक होते. सरकारी इस्पितळांत या कंपनीची औषधालये सुरु होती. आता कंपनीने ती औषधालये बंद केली आहेत.
तुये येथील पठारावर असलेल्या या कंपनीची सुरवात गोवा सरकारने पिंपरी पुणे येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटीक्सच्या धर्तीवर केली होती. सातत्याने तोटा होत गेलेल्या या कंपनीचे ७४ टक्के समभागनंतर केंद्र सरकारच्या कंपनीला विकण्यात आले. व्यवस्थापनात बदल झाला. सध्या १६५ जण या कंपनीत काम करतात त्यात बहुतांश कामगार पेडणे तालुक्यातीलच आहेत. सरकार कोविड १९ विरोधात लढत असताना त्यांना औषधांची गरज लागणार आहे. त्यासाठी या कंपनीच्या क्षमतेचा विचार झाला तर स्थानिक पातळीवर औषध पुरवठा होऊ शकणार आहे.

संबंधित बातम्या