आयआयटी’ गोवाचे कोरोना विषाणूवर संशोधन

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी अनेक संशोधक कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गोवा येथील विविध विभागातील प्राध्यापकही कोरोना विषाणूबाबत महत्त्‍वाचे संशोधन करीत आहेत.

तेजश्री कुंभार 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी अनेक संशोधक कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गोवा येथील विविध विभागातील प्राध्यापकही कोरोना विषाणूबाबत महत्त्‍वाचे संशोधन करीत आहेत. रुग्‍णाला आलेली शिंक आणि त्‍याच्‍या खोकल्‍यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमध्‍ये असणारे विषाणूचे प्रमाण, विषाणूच्‍या अस्‍तित्‍वाचा कालावधी यासारख्‍या विविध गोष्‍टींचे संशोधन सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्‍त असून अशा प्रकारची वैज्ञानिक आकडेवारी उपलब्‍ध झाल्‍यास विषाणूचा प्रतिकारासाठी मदत होईल, अशी माहिती ‘आयआयटी’ गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी दिली. 
विषाणूची लागण झालेली व्‍यक्‍ती ज्‍या खोलीत राहते, त्‍या खोलीत कोरोनाचे विषाणू त्‍या व्‍यक्‍तीच्‍या शिंकण्‍यातून अथवा खोकल्‍यातून पसरलेले असतातच. हा विषाणू हवेत किती काळ जिवंत राहू शकतो, यासह संख्यात्मक आणि प्रयोगात्मक दृष्टिकोनांद्वारेही या विषाणूवर संशोधन सुरू आहे. शिवाय या विषाणूच्‍या प्रसारावर होणारा वातावरणीय परिस्थितीच्या परिणामही आयआयटी गोवाच्‍या संशोधनाचा महत्त्‍वाचा भाग आहे. 
भौतिकशास्त्र विभागातील संतोष कुमार दास हे व्हायरसच्या (शिंका आणि खोकल्यातील थुंकीचे थेंब) उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी इक्‍वेशनच्‍या(हायड्रोडायनामिकल - बॅक्टेरियोलॉजिकल ॲनॉलॉजी) माध्‍यमातून पडताळून पाहत आहे. हा विषाणू हवेतून कशाप्रकारे स्‍थलांतरीत होतो, हे पाहणे महत्त्‍वाचे आहे. तसेच प्रा. शक्‍ती प्रसाद आणि अरिंदम दास यांच्‍याकडून ‘कोल्‍ड प्‍लाझा बेस्ड’, ‘निगेटिव्‍ह आयन जनरेटर्स’ची निमिर्ती करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. जेणेकरून थुंकीतून बाहेर पडणाऱ्या थेंबातून होणारा विषाणूचा प्रवास लक्षात येईल. 

डॉक्‍टरांच्‍या सुरक्षेसाठी संशोधन
कोरोनासंदर्भात समाजासमोर असणाऱ्या संकटांना मदत करण्‍याच्‍या हेतूने ‘आयआयटी’ गोवाचे प्राध्‍यापक संशोधन करीत आहे. डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्‍या सुरक्षा हेतूने आम्‍ही थ्रीडी प्रिटेंड अँटिव्‍हायरल फेस शिल्‍ड निर्मितीचे कामही करीत आहोत. संगणक विज्ञान आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्राध्‍यापक भारतीय लोकांमध्‍ये या विषाणूचा इतक्‍या प्रमाणात प्रसार होण्‍यामागचा अभ्‍यास जागतिक स्तरावर आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारे केला जाणार असल्‍याची माहिती संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी दिली.  

संबंधित बातम्या