किनारी भागात बेकायदा बोटींग व्‍यवसाय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

पर्यटकांच्या जीविताशी खेळ : पर्यटन खात्याकडून गंभीर दखल घेण्याची आवश्यकता

कळंगुट, बागा सिकेरीच्या किनारी भागात असे प्रकार सर्रासपणे होताना दिसतात. पर्यटकांवर अशा बोटींग फेरी मारण्यासाठी संबंधित व्यावसायिकांच्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीही होत असल्याच्या तक्रारी आहेत.

शिवोली : बार्देशातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बोटींग व्यवसाय चालल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका असल्याने पर्यटन खात्याकडून अशा बोट व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी या भागातील स्थानिकांनी केली आहे.

सध्या गोव्याच्या दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील किनारी भागात दोन हजारांहून अधिक बोटी अशा व्यवसायात गुंतलेल्या आहेत. मात्र, सरकार दरबारी नावापुरत्याच बोटी तसेच संबंधित बोट व्यवसायिकांची नावनोंदणी असल्याचे समजते.

या भागात परप्रांतीय बोट व्यवसायिकांकडून होत असलेल्या गैरकारभाराविरोधात पर्यटक संघटनांकडून दिल्लीस्थित पर्यटन मंत्रालयाच्या कार्यालयात आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती गोवा पर्यटन खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अशा बेकायदा व्यावसायिकांमुळे पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचण्याबरोबरच राज्याची बदनामी होत आहे. पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागात फिरते पथक ठेवण्याची मागणी पर्यटकांबरोबरच स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

समुद्र सफारी घडवून आणणाऱ्या बोटींग स्पोर्ट्स व्यवसायात जेट स्काय, बनाना राईड्स, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हींग, डॉल्फिन ट्रीप्स आदींचा समावेश असतो. देशातील १८०७ परवानाधारक बोटींग व्यवसायिकांपैकी गोव्यातील पन्नास टक्के बोटींचा समावेश आहे.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत दक्षिणेपासून उत्तरेतील किनारी भागात दोन हजारांहून अधिक व्यावसायिक बोटी पर्यटकांना समुद्र सफरी घडवून आणण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. यापैकी अनेक बोटी तसेच त्यावर काम करणाऱ्या परप्रांतीयांकडे कुठल्याही संस्थेचा परवाना नसतो.
सरकारी कायद्याचे उल्लंघन करून अशाप्रकारे पर्यटकांच्या जीविताशी खेळणाऱ्या बेकायदा बोट व्यावसायिकांवर पर्यटन खात्याकडून विनाविलंब कारवाई होणे आवश्यक असल्याचे कांदोळी पंचायतीचे ब्लेझ फर्नांडिस यांनी सांगितले.

भारतीय सागरी स्पोर्टस संस्थेच्या कार्यालयाकडून अशा समुद्र सफरी घडवून आणणाऱ्या बोट व्यावसायिकांना परवाना दिले जातात परंतु अनेकदा अशा व्यवसायात गुंतलेल्या व्यावसायिकांकडून केवळ एकाच बोटीचा परवाना घेतला जातो व त्यानंतर अन्य बोटींचा अशा समुद्र सफरींसाठी उपयोग केला जातो.

तथापि सरकारच्या पर्यटन खात्याच्‍या अधिकारी तसेच इतर शासकीय यंत्रणांनी बेकायदा व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या भागातील लोकांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि संबंधित समुद्र सफरी घडवून आणणाऱ्या व्यावसायिकांमध्ये तालमेल असल्यानेच अशा बेकायदा व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याचे कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांनी सांगितले. समुद्र सफरीच्या नावाने पर्यटकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या व्‍यवसायावर सरकारचा अंकुश आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बोट व्यावसायिकांचे राज्यव्यापी संघटन नसल्यामुळे अनेक परप्रांतीय बोट व्यावसायिकांकडून बेकायदा बोटींग चालते. अशा बोटींग फेरी मारण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी ओडीशा तसेच आसाम राज्यातील असतात. स्‍थानिक तसेच हिंदी भाषेचे ज्ञान नसलेल्या अशा कर्मचाऱ्यांकडून देशी पर्यटकांना सतावण्याबरोबरच पैशांच्या देवाणघेवाणीवरुन मारहाण करण्याचेही प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. मनमानेल तसा व्यवहार करणाऱ्या अशा परप्रांतीय बोट व्यावसायिकांविरोधात तत्काळ कारवाई होण्याची गरज आहे.
पॉल सिल्वेरा, सिकेरी वॉटर स्पोर्ट्स बोट असोसिएशन अध्यक्ष
 

संबंधित बातम्या