थिवीतील शेतजमीन मालकांसाठी सुधारीत दर देणे अशक्य :मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

थिवी येथे क्रिकेट स्टेडिअम उभारण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या तसेच जमीनमालकांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. या जमिनीसाठीची रक्कम सरकारने संबंधित जमीनधारकांना दिलेली नाही. 

पणजी: थिवी येथे क्रिकेट स्टेडिअमसाठी भू संपादन करण्यात आलेल्या जमिनीसाठी ठरविण्यात आलेल्या दरामध्ये सुधारणा करणे अशक्य आहे. त्यावेळी जो दर होता तो संबंधित शेतजमिनीधारकांना व जमीनमालकांना दिला जाईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य तासावेळी आज विधानसभेत आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारने ताब्यात घेतलेल्या जमीन दर वाढवून देण्याच्या मागणीवर दिले.

पर्वरी येथील शिक्षण खात्याची जागा गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयासाठी व स्टेडिअमसाठी वापरण्यात आली व आयटी खात्याचा महसूल त्यासाठी वापरण्यात आला. मोप विमानतळासाठी जी जमीन घेण्यात आली आहे त्यासाठी सुमारे एक हजार रुपये प्रति चौरस दर देण्यात आला आहे, तर थिवी येथील क्रिकेट स्टेडिअमसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीसाठी ३० ते ५० रुपये दर देण्यात आला आहे तरी त्याची रक्कम सरकारने संबंधित जमीनधारकांना दिली नाही. हा दर त्यांना वाढवून देण्याची मागणी आमदार ढवळीकर यांनी केली.

थिवी येथे क्रिकेट स्टेडिअमसाठी जागा ताब्यात घेण्यात आली होती ती विकसित करण्यात येत आहे. आता थिवीऐवजी पेडण्यामध्ये सुमारे ३५ हजार लोकांची क्षमता असलेले स्टेडिअम उभे राहत आहे. जागा घेण्यात आली असून काम लवकरच सुरू होईल. जो दर सरकारने ठरविला आहे तो थिवी येथील जमीनधारकांना दिला जाईल, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी उत्तर दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत जो दर जमीन ताब्यात घेताना होता तोच दिला जाईल. हा दर वाढवून देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले.
 

 

 

कवळे येथील रस्त्यावरून अवजड वाहने नको 

संबंधित बातम्या