कोरोना’चा अबकारी महसुलालाही झटका

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधला असता सहाय्यक आयुक्त नवनाथ नाईक यांनी सांगितले की, सरासरी प्रतिमहिना खात्याला २५ ते ३० कोटी रुपये महसूल मद्य व्यवसाय या उद्योगातून मिळतो.

पणजी, 

‘टाळेबंदी’मुळे मद्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. अबकारी खात्याला सुमारे ४५९ कोटींचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य संपलेल्या आर्थिक वर्षात (२०१९-२०) शक्य दिसत नाही. फेब्रुवारी २०२० पर्यंत सुमारे ३८२ कोटी महसूल जमा झाला आहे. ‘टाळेबंदी’ पुन्हा वाढविल्याने मद्य विक्रेत्यांकडे असलेल्या मद्यसाठ्याची मुदत संपत आल्याने कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधला असता सहाय्यक आयुक्त नवनाथ नाईक यांनी सांगितले की, सरासरी प्रतिमहिना खात्याला २५ ते ३० कोटी रुपये महसूल मद्य व्यवसाय या उद्योगातून मिळतो. त्यामध्ये परवान्यांचे नूतनीकरण, नवीन परवाने तसेच घाऊक व किरकोळ मद्य विक्रेत्यांकडून ऑनलाईनवरून जमा होणारा कर याचा समावेश असतो. दरवर्षी राज्यात पर्यटकांची उपस्थिती सुमारे २५ ते ३० लाख असते. त्यामुळे मद्य विक्रीची उलाढालही कोट्यवधीची असते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात खात्याकडे ४५२ कोटींचा महसूल जमा झाला होता. आर्थिक वर्ष २०१९ ते २० साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, जगभरात तसेच देशामध्ये ‘कोविड-१९’ मुळे त्याचा फटका पर्यटन क्षेत्राला बसला. मद्य व्यवसाय हा गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असतो. सध्या पर्यटकच नसल्याने तसेच मद्यालये बंद आहेत, अशा परिस्थितीत आर्थिक वर्षात तरतूद केलेले महसुलीचे लक्ष्यही गाठणे अंधूक बनले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीऐवजी आता मद्य व्यापाऱ्यांना येत्या मे अखेरीपर्यंत मद्य विक्रीचा अहवाल सादर करण्यास मुभा देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२०२० चा महसूल (कोटी रुपयांमध्ये)
एप्रिल - २४.४
मे - ३७.४
जून - ३४.३
जुलै – ३७.३
ऑगस्ट - २९.३
सप्टेंबर - २८.३
ऑक्टोबर – २३.६
नोव्हेंबर - ३२
डिसेंबर - ५३.४
जानेवारी - ३०.९
फेब्रुवारी - ५१.७
मार्च - टाळेबंदी
०००००००००००००

संबंधित बातम्या