टाळेबंदी तरी रस्त्यावरील वाहनांत वाढ

dainik gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

टाळेबंदी तरी रस्त्यावरील वाहनांत वाढ 

पणजी,

देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने शिथिलता केल्याने आठवड्यापासून रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढ आहेत तसेच लोकांची वर्दळ वाढली आहे. गोवा कोरोनामुक्त झाल्याच्या भ्रमात लोक आता शहरात बनिधास्तपणे फिरण्यास लागले आहे. पोलिस नाकांबदीच्या ठिकाणी वाहन चालकांची तपासणी व चौकशीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे, मात्र ‘कोविड-१९’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई न चुकता करत आहेत.
सरकारी कार्यालये सुरू केल्यानंतर अनेकजण स्वतःची वाहने घेऊन घराबाहेर पडले आहेत. दुचाकीवरून एका व्यक्तीलाच जाण्याची तसेच चारचाकीतून चालक व एकाच व्यक्तीला बसण्याची परवानगी असल्याने प्रत्येकजण एक वाहन घेऊन रस्त्यावर येऊ लागले आहे. भाजी व फळे विक्रेत्यांबरोबर आता मासळी व चिकन विक्रीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला मासे तसेच फळे विक्रेते बसत असल्याने अनेक लोक खरेदीसाठी रस्त्यावर वाहने घेऊन येत आहेत. पूर्वी रस्त्याच्या जंक्शनवर असणारे पोलिसही गायब झाले आहे त्यामुळे कामाविना रस्त्यावर वाहनाने फेरफटका मारणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या काळात वाहन चालक पोलिसांच्या भीतीनेच रस्त्यावर येत नव्हते. त्यावेळी फक्त जीवनावश्‍यक वस्तू व औषधे खरेदी करण्यासाठीच वाहन चालकांना पोलिस परवानगी देत होते. मात्र आता सरकारी कार्यालयांसह काही खासगी कार्यालयांनाही सामाजिक अंतर व चेहरा मास्क घाऊन पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचा वापर करून परवानगी दिल्याने अनेकांनी आपापली कार्यालये सुरू केली आहेत. मात्र या नियमांचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारवर यंत्रणा नाही.
देशात व शेजारील राज्यांमध्ये ‘कोविड-१९’ चा प्रसार दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात आहे व गोवा काही प्रमाणात आजच्या घडीस सुरक्षित आहे तो लोकांची वर्दळ सुरूच राहिल्यास हे धोकादायक ठरू शकते. राज्याने सीमेवरील बंदी शिथिल करताना सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेश खुला केला आहे. त्यामुळे या वाहनांबरोबर येणारे चालक व हेल्पर्स तसेच हल्लीच ट्रॉलर्समधून कारवार येथून आलेले खलाशी तसेच हुबळी येथून सातजण रेल्वेने गोव्यात प्रवेश करण्यास यशस्वी ठरले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचा हा परिणाम आहे. सीमा बंद असतानाही कर्नाटकमधून काहीजण पायवाटेने गोव्यात घुसले आहेत मात्र त्यांचा ठावठिकाणा कोठे आहे याची माहिती सरकारकडे नाही. येत्या आठवड्यात पंतप्रधान देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत व परिस्थिती जाणून घेतील तेव्हा राज्य सरकारसमोर लॉकडाऊन मागे घ्यावा की त्यात आणखी शिथिलता आणावी यावरील निर्णय राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

‘चलन’ संख्या वाढविण्याकडे कल
दुचाकीवर दुसरा स्वार असला किंवा दुसऱ्या स्वाराने हेल्मेट घातले नसल्याच सध्या कारवाई करण्यात दंग आहेत. चारचाकी वाहन चालकासोबत बाजूल बसलेल्या व्यक्तीला फक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येते. २० एप्रिलपासून सुधारित ‘कोविड-१९’ नियमांची अंमलबजावणी पोलिसांनी सुरुवातीच्या काळात कडकपणे केली मात्र त्यांच्या कारवाईतही मरगळपणा आला आहे. फक्त ‘चलन’ची (दंडवसुली) संख्या वाढवण्यात पोलिस व्यस्त आहेत.

संबंधित बातम्या