कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता करण्यासाठी भारतीय कंपनीने केली ड्रोनची निर्मिती

dainik gomantak
शनिवार, 2 मे 2020

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, कोविड-19 चे रुग्ण आढळलेल्या भागातील कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणांच्या पर्यावरणाची स्वच्छता/निर्जंतुकीकरण संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

मुंबई, 2 मे 2020

 

कोरोना विषाणू आजार 2019 (कोविड-19) चा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याचा चढता आलेख संपूर्णतः खाली आणण्यासाठी जागतिक समुदाय संघर्ष करत आहे आणि यासाठी जगभरातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाच्या प्रयत्नांना प्राधान्य दिले आहे. साध्या हाताने पुसण्यापासून ते मोबाईल स्प्रे पद्धतीचा वापर करून सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. हे करण्यामागचे कारण म्हणजे रासायनिक जंतुनाशकांमुळे कोरोना विषाणू सहजपणे निष्क्रिय होतो.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, कोविड-19 चे रुग्ण आढळलेल्या भागातील कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणांच्या पर्यावरणाची स्वच्छता/निर्जंतुकीकरण संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. याशिवाय, कोविड-19 चा उद्रेक हा जागतिक साथीचा आजार जाहीर केल्यापासून, देशातील सर्व शहरे आणि विशेषतः विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता असणाऱ्या सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून बस/रेल्वे स्थानके, रस्ते, बाजारपेठा, रुग्णालय परिसर, बँक आदींसह सर्व सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरे अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. 

 

विस्तीर्ण क्षेत्र निर्जंतुक करणे

आघाडीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था विस्तीर्ण सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सोयीस्कर आणि प्रभावी पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहेत. कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारताच्या 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जागेचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करणे हे खूप मोठे आव्हान आहे. सर्व गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, मेट्रो स्थानके, विमानतळ, शाळा, महाविद्यालये, उंच इमारती, रुग्णालये आणि सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे ही एक मोठी मोहीम आहे. सध्या कार्यरत असलेले सफाई कामगार स्वतःच्या हाताने जंतुनाशक फवारणी करत आहेत हे एक मोठे काम आहे. परंतु हे काम करण्यासाठी डीएएएस (सेवा म्हणून ड्रोन) ही पर्यावरणीय यंत्रणा अवलंबल्यास, स्वच्छतेचे कार्य अर्ध्या वेळेत पूर्ण होईल. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात घालून व्यक्तीशा फवारणी करणाऱ्या स्वच्छता कामगार यांची अनुपलब्धता, गती आणि कार्यक्षमत तसेच सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करणे हे या स्वयंचलित स्वच्छता यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. याच दृष्टीकोनातून, गरुडा एरोस्पेस ISO-9001 मानांकित कंपनीने सार्वजनिक जागा, रुग्णालये आणि उंच इमारतींच्या स्वच्छतेच्या कामात मदत करण्यासाठी स्वयंचलित जंतुनाशक मानवरहित हवाई वाहन (युएव्ही) विकसित केले आहे. ‘कोरोना-किलर’ नाव असणाऱ्या या ड्रोनचा वापर 450 फुटांपर्यंतच्या इमारतींवर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. ड्रोनने केलेली फवारणी ही कोविड-19 चे संभाव्य वाहक बनू शकणाऱ्या कामगारांपेक्षा जलद, दीर्घकालीन आणि सुरक्षित असेल. तसेच ड्रोन उंचावर देखील फवारणी करू शकतात जे कामगारांना करणे शक्य नाही. नियमितपणे भारताची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान आधारित ड्रोनने स्वच्छता केल्यास कोविड-19 च्या प्रसाराला, भविष्यातील साथीच्या आजारांना तसेच अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांना आळा घातला जाईल.  

चंदीगड आणि वाराणसीमधील भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे ड्रोन यापूर्वीच तैनात करण्यात आले आहेत.

सध्या 26 शहरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या कोरोना-किलर 100 स्वच्छता ड्रोनची, 2016 मध्ये नीती आयोगाने पहिल्या 10 सामजिक आर्थिक नवोन्मेशात  निवड केली होती. हे ड्रोन पेटंट ऑटोपायलट तंत्रज्ञान, प्रगत उड्डाण नियंत्रक प्रणाली आणि इंधन कार्यक्षम मोटर्ससह सुसज्ज असून दिवसभर 12 तास कार्यरत राहण्यास सक्षम आहे. याच्या वैशिष्ट्यांमध्ये पुढील बाबींचा समवेश आहे : 15-20 लिटरची पेलोड क्षमता, 40-45 मिनिटांचा उडाण कालावधी आणि कमाल मर्यादा उंची 450 फुट जी भारतातील उंच इमारतींच्या निर्जंतुकीकरणासाठी पुरेशी आहे. प्रत्येक ड्रोन दिवसाला 20 किलोमीटरचे अंतर व्यापू शकतो. गरुड एरोस्पेसचे 300 कोरोना किलर -100 ड्रोन्सचा सध्याचा ताफा दररोज 6,000 किलोमीटर अंतरापर्यंत स्वच्छता मोहीम राबवू शकेल.

ड्रोन उत्पादक गरुड एरोस्पेसने कृषी सर्वेक्षण, प्राथमिक परीक्षण आणि सर्वेक्षण करणे यासारख्या विविध गरजा पूर्ण केल्या आहेत. गेल्या 4 वर्षात त्यांनी अनेक सरकारी ऑर्डरची पूर्तता केली आहे. त्यांनी एक अद्वितीय ड्रोन समूहक व्यासपीठ देखील स्थापन केले आहे जे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविल्यास विविध सहयोगी कंपन्यांमार्फत 16,000 पेक्षा जास्त ड्रोन पुरवू शकते. कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत सरकारला आणि समाजाला मदत करण्यासाठी उत्पादने आणि सेवा पुरवत या कठीण काळात भारतीय कंपन्या कशाप्रकारे स्वतःचा विकास करत आहेत हे याचे उत्तम उदाहरण आहे.

 

 

संबंधित बातम्या