उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करावेत, गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनची मागणी

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

  कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका उद्योग क्षेत्राला बसला आहे.

मडगाव,

जीवनाबरोबरच उदरनिर्वाहही महत्वाचा असल्याने प्राप्त परिस्थितीत गोव्यातील उदयोग टप्प्याटप्प्याने सुरु करावेत व लाॅकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी उद्योगांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी करणारे निवेदन गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनने (जीएसआयए) मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याना दिले आहे.  असोसिएशनने उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांना या निवेदनाची प्रत पाठवली आहे.  

    कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका उद्योग क्षेत्राला बसला आहे. गोव्यात आतापर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणाखाली असून या स्थितीत  आवश्यक ती काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने राज्यांतर्गत उद्योग - व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी दिली. 

राज्याच्या सीमा सील करून राज्यांतर्गत औद्योगिक व्यवहार सुरु करता येईल. गोव्यातील उद्योग कच्चा मालासाठी इतर राज्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे कच्चा माल बाहेरून आणावा लागेल. कच्चा माल आणतानाही बाहेरची व्यक्ती गोव्यात प्रवेश करणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असे कोचकर यांनी सांगितले. 

केवळ गोव्यातील कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून औद्योगिक प्रकल्पात काम सुरु कऱण्यात येईल व कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामाजिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन होईल याची काळजी घेण्यात येईल, असे कोचकर यांनी सांगितले. 

लाॅकडाऊनमध्ये उत्पादन बंद असल्याने औद्योगिक कंपन्या व आस्थापनांना मोठा फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांना तीन महिने कपात न करता वेतन देण्याची सूचना सरकारने केली आहे. उद्योग बंद असल्याने आर्थिक अडचणीत असल्याने कंपन्या व आस्थापनांना कर्मचाऱ्यांना वेतन देणे कठीण बनणार आहे. या स्थितीत सरकारने उद्योगांना वेतन देण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे तसेच विज बिलावर लावण्यात येणारी अतिरिक्त ड्युटी, पायाभूत सुविधा अधिभार आदी करांतून सूट द्यावी अशी मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती कोचकर यांनी दिली

संबंधित बातम्या