पे-पार्किंग सेवेत अडथळे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कंत्राटदारापुढे सुरवातीलाच विघ्न !

पे-पार्किंग सुरळीत होण्यास लागणार आणखी काही दिवस

पणजी : पणजी शहरातील पे-पार्किंगचे कंत्राट घेतलेल्या जुवारकर असोसिएट्सपुढे सुरवातीलाच सतराशे विघ्न आली आहेत. तरीही शहरातील नागरिकांनी कोणताही वाद न घालता पे-पार्किंगला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल कंपनीचे मालक सोहम जुवारकर यांनी पणजीत येणाऱ्या वाहनधारकांचे आभार मानले आहेत.

शनिवारपासून पणजी शहरातील १८ जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्ग आणि काही महत्त्वाच्या ठिकाणांवर पे-पार्किंग सुरू झाले आहे. तीन वर्षांसाठी जुवारकर असोसिएट्सने पे-पार्किंगचे कंत्राट मिळविले आहे. पे पार्किंगच्याच्या ठिकाणी वाहनांसाठी असणारे दरफलकही कंपनीने लावले असून, पिवळ्या रंगाचे टी-शर्ट असणारी मुलेही पार्किंगचे पैसे गोळा करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

पोर्तुगालचे पंतप्रधान गोवा दौऱ्यावर आल्यामुळे पे-पार्किंगचे पैसे घेण्यास अडचणी आल्या. शिवाय १८ जून मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर रविवारीच पे-पार्किंगकरिता कामावर ठेवलेल्या मुलांपैकी एका मुलाच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले, त्यामुळे आत्माराम बोरकर मार्गावर पैसे गोळा करणाऱ्या काही मुले कामावर येऊ शकले नाहीत, असे जुवारकर यांनी सांगितले. त्यामुळे पे-पार्किंग सुरू झाल्यानंतर सुरवातीलाच आलेल्या या विघ्नांतून पुढील काही दिवसांत मुक्तता होईल, अशी आशा असल्याचे जुवारकर यांना वाटते.

ब्रह्मकुमारीजतर्फे महाशिवरात्री महोत्सव व व्याख्यानमालेचे आयोजन

तीन दिवसांत नेमकी किती वाहने पार्क पे-पार्किंगच्या कक्षेत आली हे सांगता येणार नाही. कारण शनिवार-रविवारी शहरात येणारी वाहने कमी असतात, सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊनच त्यांची सरासरी ठरवता येईल. परंतु पणजीवासीय आणि येणाऱ्या वाहनधारकांनी पे-पार्किंगबाबत आत्तापर्यंत कोणताही वाद घातलेला नाही. उलट त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, वयस्क लोकांना अद्याप या पे-पार्किंगची कल्पना नसल्याने त्यांना त्याबद्दल अगोदर कल्पना देऊनच पैसे घेतले जात आहेत.
- सोहम जुवारकर (मालक - जुवारकर असोसिएट्‌स)

 

संबंधित बातम्या