हप्तेखोर पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करा

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020
हप्तेखोर पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करा

पणजी,

राज्यात रेती उपसा करण्यास बंदी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याप्रकरणी याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातून रेती वाहतूक होऊन त्यासाठी हप्ते घेतले जात असल्यावरून सत्तेतील मंत्र्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. पोलिस निरीक्षक जर हप्ते घेतल्यास मुख्यमंत्र्यांनी रेती वाहतूक तसेच या अधिकाऱ्याच्या मालमत्तेसह दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.
रेती व्यवसायसंदर्भात मार्गदर्शक तत्वे व धोरण तयार न झाल्याने रेती व्यवसाय बंद आहे तरीही रेती वाहतूक होत आहे. या रेतीवाहू ट्रक चालकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये हप्ता पेडणे पोलिस निरीक्षकांकडून घेतला जात आहे असा आरोप मंत्री मायकल लोबो यांनी केला आहे. त्यासंदर्भातचा पुरावाही त्याच्याकडे असल्याचे त्याने दावा केला आहे. या अधिकाऱ्याची पेडणे पोलिस ठाण्यातून बदली करावी अशी मागणी लोबो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पेडण्याचे आमदार व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे या अधिकाऱ्याला पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या उलट उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या अधिकाऱ्याची बाजू घेताना कोणताच भ्रष्ट होत नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत जे सत्य आहे बाहेर यावे यासाठी चौकशीचे आदेश द्यावेत. या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची तसेच इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जावी असे आमदार ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, सावर्डे येथील रगाडा नदीतील उत्खनन प्रकरण सध्या प्रलंबित आहे. यामध्ये धारबांदोडा पंचायत सदस्य गुंतलेला आहे व या कामासाठी वापरलेली यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची नजर आहे. ही व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे व जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवार आहे याची चौकशी केली जावी. या नदीतील बारीक खडी काढून ती क्रश करून मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. हे प्रकार असेच सुरूच राहिले व बंद झाले नाही तर एक दिवस नद्या गायब होतील असे ढवळीकर यांनी मत व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या