इरफान अभिनयाचा सखोल अभ्‍यासही करायचा

तेजश्री कुंभार
रविवार, 3 मे 2020

नाटकांच्‍या इतिहासाचं भलं मोठं पुस्‍तक होतं. पुस्‍तकांबद्द‍ल आणि नाटकांबद्दलच्‍या गप्‍पानंतर समजलं की लघुपटात तोच माझ्‍यासोबत मुख्‍य भूमिकेसाठी असणार आहे. नंतर तो आमच्‍या घरातील सदस्‍य झाला.

पणजी,

इरफानची आणि माझी मैत्री २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीची. इतक्‍या वर्षांच्‍या या मैत्रीमध्‍ये त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्त्‍वाबद्दल समजलेली महत्त्‍वाची बाब म्‍हणजे इरफान अभिनयासह सखोल अभ्‍यासही करायचा आणि हीच त्‍याच्‍यात अभिनयात खरेपणा येण्‍यासाठी कारणीभूत बाब असल्‍याची माहिती प्रसिध्‍द अभिनेत्री आणि मानसोपचार तज्ज्ञ मीनाक्षी मार्टीन्‍स यांनी दिली. दै. ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या खास मुलाखतीत त्‍यांनी इरफान यांच्‍यासोबतच्या आठवणी उलगडल्‍या.
इरफानसोबतच्‍या मैत्रीची सुरवात एफटीआयआयच्‍या लघुपटापासून झाली. जेव्‍हा आमची भेट एफटीआयआयच्‍या कॅम्‍पसमध्‍ये झाली तेव्‍हा त्‍याच्‍या हातात नाटकांच्‍या इतिहासाचं भलं मोठं पुस्‍तक होतं. पुस्‍तकांबद्द‍ल आणि नाटकांबद्दलच्‍या गप्‍पानंतर समजलं की लघुपटात तोच माझ्‍यासोबत मुख्‍य भूमिकेसाठी असणार आहे. नंतर तो आमच्‍या घरातील सदस्‍य झाला. इथपर्यंत की माझी मुले माझ्‍या अनेक तक्रारी त्‍याच्‍याकडे करीत असतं आणि तो संयमाने त्‍या ऐकतही असे, असं मार्टीन्‍स यांनी सांगितले.
इरफानला गोवाही खूप आवडत असे. राजस्‍थानसारख्‍या ठिकाणी लहानपण गेल्‍याने गोवा त्‍याला अद्‍भूत वाटे. शिवाय त्‍याला हापूसचीही आवडत होती. नंतर त्यानेही जमीन घेतल्याचे कळले आणि समाधान वाटले. इरफानचे वाचन प्रचंड होते. त्‍याचा आयुष्‍याकडे पाहण्‍याचा नजरियाही अत्‍यंत बेधडक होता. तो नेहमी अस्‍वस्‍थ असायचा. हा अस्‍वस्‍थपणा त्‍याच्‍या कामाप्रती आणि अभिनयाप्रती तसेच समाजाप्रतीही असायचा. जे काम मला समाधान देईल, ते मी करेन, असे तो नेहमी म्‍हणायचा आणि म्‍हणून तो इतरांपेक्षा वेगळा होता, असे त्यांनी सांगितले.

इरफानमुळे मिळाली मालिका
इरफानचे शिक्षण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्‍ये झाले होते. त्‍यामुळे त्‍याच्‍या ओळखी अतिशय चांगल्‍या होत्‍या. जेव्‍हा कधी ऑडिशन असे तेव्‍हा त्याची कल्‍पना मला तो देई. त्‍याच्‍या ओळखीच्‍या लोकांकडे मला काम मिळावे म्‍हणून शब्‍द टाकत असे. त्‍यामुळे मला ‘हम मुंबई नही जायेंगे’ आणि ‘जबान संभालके’ या मालिकांमध्‍ये काम मिळाल्याचे मीनाक्षी मार्टीन्स यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांच्‍यामुळे माझा पहिला चित्रपट
ऋषी कपूर यांच्‍यासोबत कामाचा अनुभव अत्‍यंत चांगला होता. आर. के. स्‍टुडिओच्‍या एका चित्रपटासाठी मी सहाय्‍यक दिग्‍दर्शक म्‍हणून काम केले आहे. त्‍याच महिन्‍यात त्‍यांच्‍याच एका चित्रपटासाठी माझी निवड मुख्‍य अभिनेत्री म्‍हणून झाली. मात्र, तो चित्रपट होऊ शकला नाही. त्‍यानंतर त्‍यांनी प्रयत्‍न केल्‍यामुळे आणि माझे नाव सुचविल्‍याने मला ‘गौरी’ हा माझा पहिला चित्रपट प्रमुख अभिनेत्री म्‍हणून करता आल्‍याचे मीनाक्षी मार्टिन्‍स म्‍हणाल्‍या.

 

संबंधित बातम्या