जेईई परीक्षेचे केंद्र बदलणे शक्य

Dainik Gomantak
सोमवार, 13 एप्रिल 2020

जेईई मेन्सची नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्जही भरले होते. त्यातील काही विद्यार्थी टाळेबंदीच्या कालावधीत इतरत्र अडकले आहेत.

पणजी
आता जेईई मेन्स या परीक्षेचे परीक्षा केंद्र बदलण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. कोविड १९ च्या प्रादूर्भावामुळे ही परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. विद्यार्थ्यांना आता त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) दिली आहे.यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदत आहे.
जेईई मेन्सची नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्जही भरले होते. त्यातील काही विद्यार्थी टाळेबंदीच्या कालावधीत इतरत्र अडकले आहेत. टाळेबंदीनंतरही प्रवास करणे त्यांना शक्य होणार की नाही याबाबत आताच खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या लगतचे परीक्षा केंद्र निवडता यावे यासाठी ही मुभा देण्यात आली आहे. कोविड १९ विषाणू प्रसार रोखण्यासाठीच्या टाळेबंदीमुळे ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असे जाहीर करण्यात आले आहे.
कोविड १९ च्या टाळेबंदीमुळे विद्यार्थी आहे तेथेच अडकले आहेत. अनेक विद्यार्थी शिकवणी वर्गांसाठी राज्याबाहेरही गेलेले आहेत. परीक्षेच्या आधी अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत ही शिकवणी सुरु असते.त्यामुळे विद्यार्थी शिकवणीच्या ठिकाणापासून जवळच परीक्षा देता यावे याचे नियोजन करण्यासाठीही ही संधी देण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांनी निवडलेले पूर्वीचे परीक्षा केंद्र त्यांना आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन एनटीएने यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे केंद्र निवडण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संधी दिली आहे. एनटीएच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी त्यांच्या सोयीचे शहर केंद्रासाठी निवडू शकणार आहेत. दोनशेहून जास्त ठिकाणी ही परीक्षा आजवर घेतली जात आहे.

संबंधित बातम्या