एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदी ज्युआन फरांडो

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

दुखापतीमुळे फुटबॉल खेळण्याचे सोडल्यानंतर फरांडो वयाच्या १८ वर्षी फुटबॉल प्रशिक्षक बनले. स्पेनमधील बार्सिलोना येथील फरांडो आगामी मोसमातील आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवास मार्गदर्शन करतील.

पणजी, :

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील लीग विनर्स शिल्ड विजेत्या एफसी गोवाने नव्या मोसमासाठी ज्युआन फरांडो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ३९ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक गतमोसमात डच्चू देण्यात आलेल्या सर्जिओ लोबेरा या स्पॅनिश प्रशिक्षकाची जागा घेतील.

दुखापतीमुळे फुटबॉल खेळण्याचे सोडल्यानंतर फरांडो वयाच्या १८ वर्षी फुटबॉल प्रशिक्षक बनले. स्पेनमधील बार्सिलोना येथील फरांडो आगामी मोसमातील आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवास मार्गदर्शन करतील. गतमोसमात आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत अव्वल राहत एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवाने पटकाविला होता.

``एफसी गोवा कुटुंबाचा भाग बनण्यासाठी मी कमालीचा उत्साही आहे. क्लबचा दृष्टिकोन आणि खेळण्याच्या शैलीने मी खूपच प्रभावित आहे आणि मला संधी दिल्याबद्दल मी क्लबचे आभार मानू इच्छितो,`` असे मनोगत ज्युआन फरांडो यांनी स्पेन येथून व्यक्त केले आहे. ``गोव्याच्या फुटबॉलविषयक आवडीबद्दल मी बरेच काही ऐकले आहे. सर्व चाहत्यांच्या पाठिंब्याने चांगले फुटबॉल खेळण्याची आशा बाळगतो आणि क्लबसाठी यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,`` असे फरांडो पुढे म्हणाले. एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनीही ज्युआन फरांडो यांचे संघात स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या