सिंधुदुर्ग येथील सिद्धेश्‍वर ग्रामोत्सव मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेत आदर्श पेडणे संघ विजेता

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सिद्धेश्‍वर ग्रामोत्सव मंडळ आयोजित गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य निमंत्रीत कबड्डी स्पर्धेतील विजेत्या आदर्श स्पोर्टस क्‍लबच्या संघासोबत क्‍लबचे अध्यक्ष सदानंद सावळ देसाई, प्रशिक्षक महेश गवळी व व्यवस्थापक निखिल सावळ देसाई

पेडणे : सिंधुदूर्ग येथील सिद्धेश्‍वर ग्रामोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक येथील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेत पेडणेच्या आदर्श ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावून आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. संघाने आदर्शवादी कामगिरी करीत चार वर्षात तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपला दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आदर्श स्पोटर्स क्‍लबचे ‘अ’ व ‘ब’ असे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

तळवडे येथील मैदानावर विद्युत झोतात संपन्न झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना पहाटे पाच वाजता खेळविण्यात आला. त्यात पेडण्याच्या आदर्श ‘अ’ संघाने बलाढ्य चंदगड केणी संघावर ३४-३१ अशी मात करून अंतिम विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात आदर्श संघाने जयसिवारा कोल्हापूर संघावर २८-१८ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आदर्श व संघाला उपांत्यपूर्व फेरीत उत्स्फूर्त क्रीडा मंडळ मुंबई संघाकडून निसटता ४ गुणांनी पराभव पत्करावा लागला.

विजेत्या आदर्श ‘अ’ संघाला रोख पारितोषिक व चषक तसेच उपविजेत्या चंदगड केणी संघाला रोख बक्षीस व चषक, तसेच उपांत्य फेरीतील पराभूत जयसिवारा कोल्हापूर व राज इको फार्म संघाला रोख रुपये व चषक देण्यात आले तर शिस्तबद्ध संघ म्हणून जयमानसरोवर वेंगुर्ला संघाला बक्षीस देण्यात आले.

तत्पूर्वी, झालेल्या स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदूर्गचे आमदार दीपक केसरकर, गोवा कबड्डी असोसिएशनचे माजी चेअरमन व आदर्श स्पोटर्स क्‍लबचे अध्यक्ष सदानंद सावळ देसाई, मंडळाचे अध्यक्ष बाळू कांडरकर, संजू पै आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व दिप प्रज्वलीत करुन स्पर्धेचे रितसर उद्‌घाटन करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभाला मंडळाचे अध्यक्ष बाळू कांडरकर, विलास नाईक, संजू पै, सदानंद सावळ देसाई, सिंधुदुर्गातील राष्ट्रीय पंच जावेदखान, शरद शिरोडकर, गोव्याचे दिलीप कुंडईकर, अजित सामंत, मानुएल फर्नांडिस आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक येथील एकूण सोळा संघानी सहभाग घेतला होता.

 

लोबेरांच्या अनुपस्थितीत एफसी गोवाची परीक्षा

संबंधित बातम्या