टाळेबंदीमुळे घरीच बनू लागले ‘केक’

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

सोशल मिडियावरून मार्गदर्शन, पाककृतीचे प्रसारणही सुरू

प्राची नाईक
पणजी

टाळेबंदीत छंद जोपाण्‍याची नामी संधी मिळाली. स्वयंपाक करणे, आवडी - निवडी जोपासणे, स्वतःची काळजी घेणे आणि बेकिंग आदी सुरू झाले. यातील बेकिंग थोड्यांना एवढे रुचले की, काहीजण कोणतेही प्रशिक्षण न घेता उत्तम पद्धतीचे अगदी बाजारात मिळेल, अशा प्रकारचे उत्‍कृष्‍ट केक घरी बनवू लागले. अगदी मोठमोठ्या सिनेतारकांनीसुद्धा घरगुती केक बनवून वाढदिवस साजरे केले आणि केक बनवण्याला आणखी हुरूप चढला. केक निर्मितीसंदर्भात सोशल मिडियावरून मार्गदर्शन, केलेल्या ‘केक’बद्दल प्रसारण सुरू झाले. यातून अनेकांना केक बनिवण्याची सोपी पद्धत, साहित्याची माहिती मिळाली.
आजच्या काळात फक्त वाढदिवसासाठीच नव्हे, तर अगदी कोणत्याही सोहळ्याला केक लागतो. त्यामुळे केक व्यवसाय प्रचंड जोरात चालतो, असे म्हणायला हरकत नाही. पण टाळेबंदीमुळे बेकरी बंद. मग केक कुठून मिळणार? त्यामुळे घरोघरी केक बनू लागले. केक बनवणे म्हणजे फार खटाटोप करावा लागतो. त्याला वेगवेगळे सामान आणि प्रशिक्षण लागते, असे असलेले समज या टाळेबंदीत दूर झाले. जो तो केक बनवून वॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर केक बनवण्याची स्पर्धा चालू असल्याप्रमाणे छायाचित्रेही झळकू लागली.
आडपई येथील तृप्ती काशिनाथ नाईक मुळे या विद्यार्थिनीच्या घरी सहज आवड म्हणून केलेला केक, आता रोज बनू लागला आहे. तिचे सुंदर नक्षीदार काम, चविष्ट आणि सुबक केक पाहून अनेकजण तिच्याकडून केक करून घेणे पसंद करतात. ती सांगते, "मला केक करण्याची आधीपासून उत्सुकता होती. पण करून बघायला कधी वेळ मिळाला नाही. सहज म्हणून मी यूट्यूबवर पाहून केक करून बघितला. मी केलेला केक सगळ्यांना पसंद पडला आणि हळूहळू त्यावर वेगवेगळे प्रयोग करत गेले.
पेशाने वकील आणि मुंबई येथील 'पतंगा आर्ट' या आर्ट प्रोडक्शन आणि डिझाइन मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या क्षितिजाला बेकिंग फारच भावलेले आहे. ती सध्या फक्त नातेवाईक आणि मित्रांपुरते बेकिंग करत असली तरी या पुढे व्यवसायात रूपांतरित करण्याचा तिचा मानस आहे.
क्षितिजा गांवकर सांगते, " मी इव्हेंट्स आणि फिल्म लाईनमध्ये असल्यामुळे जेव्हा मुंबईहून गोव्यात आले. माझ्या स्वयंपाकघरात नव-नवीन पाककृतींचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. एक दिवस केक खावासा वाटला. यातून मी प्रयत्न केला आणि केक तयार झाला.
टाळेबंदी दरम्यान मी माहेरी असता कोणाच्या वाढदिवसासाठी केक केला फक्त ६० रुपयांमध्ये केक तयार झाला. बाजारात मिळणाऱ्या केकपेक्षा हा सहज सोपा आणि घरगुती केक किती चांगला? जरी अजूनपर्यंत मी जास्त केक केले नाहीत तरी जवळपास ४-५ केक केले आहेत. येणाऱ्या दिवसांत मी अजुनही केक करण्याचा प्रयत्न करीन असे वाजे- शिरोडा येथील साईली जयेश नाईक हिने सांगितले.

संबंधित बातम्या