भक्तीचे बुद्धिबळात हॅटट्रिकचे लक्ष्य

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

सलग दोन वर्षे राष्ट्रीय महिलांत विजेतीऑलिंपियाडचेही ध्येय

किशोर पेटकर

पणजी 

गोव्याची बुद्धिबळातील इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिने राष्ट्रीय सीनियर महिला स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहेतसेच देशाचे ऑलिंपियाडमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे तिचे ध्येय आहे.

भक्तीने दोन वर्षांपूर्वी जयपूर येथे राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक पटकाविला. राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळात जेतेपद मिळविणारी पहिली गोमंतकीय हा विक्रम तिच्या नावे नोंदीत झाला. गतवर्षीही भक्तीने धडाका राखला आणि तमिळनाडूतील चेट्टिनाड येथे सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. राष्ट्रीय विजेती या नात्याने तिला भारताचे जागतिकआशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहेपण या तिन्ही स्पर्धा जगव्यापी कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडल्या आहेतआता कोविड-१९ मुळे या वर्षी डिसेंबरमध्ये नियोजित असलेली यंदाची राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा होणार का याबाबत साशंकता आहे.

भक्ती म्हणाली, ‘‘राष्ट्रीयतसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळावर महामारीचे सावट असल्याने स्पर्धा अनिश्चित आहेतपण भविष्यात खेळल्या जातील हे पक्के आहे. या स्पर्धा नजरेसमोर ठेवून मी नेहमीप्रमाणेच तयारीत मग्न आहे. स्पर्धा कधी होतील हे माहीत नाहीपण मी सरावात खंड पडू दिलेला नाही. (रघुनंदन) गोखले सरांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. याशिवाय मी स्वतः ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग घेतेत्यामुळेही कार्यरत आहे आणि सरावही होतो.’’ २८ वर्षीय भक्ती फेब्रुवारीपासून मडगाव येथे घरीच आहे. 

‘‘बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. तो मान फार मोठा असेल. ऑलिंपियाड पात्रतेसाठी मी प्रेरित असून त्यादृष्टीनेच मेहनतीवर भर आहे,’’ असे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताकडून खेळलेल्या भक्तीने आपल्या भावी उद्दिष्टाविषयी सांगितले. 

 

ऑनलाईन स्पर्धांत यश

कोविड-१९ लॉकडाऊनमुळे बुद्धिबळ स्पर्धा खंडित आहेतपण जगभरात ऑनलाईन स्पर्धा जोमात सुरू आहेत. भक्तीही ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धांत नियमितपणे खेळते. ‘‘ऑनलाईन स्पर्धांमुळे घरीच असलेल्या बुद्धिबळपटूंची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे बुद्धिबळपटूंचा खेळापासून संपर्क तुटलेला नाही. हा खेळ शरीरसंपर्क नाही आणि इनडोअर आहे. त्यामुळे घरबसल्या स्पर्धात्मक बुद्धिबळात भाग घेता येतो. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच ऑनलाईन स्पर्धांत भाग घेतला आहेत्यापैकी साधारणतः दहा स्पर्धांत जेतेपद मिळविले आहे. ऑनलाईन स्पर्धांमुळे प्रत्यक्ष बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाल्यानंतरस्पर्धेच्या वातावरणाची कमतरता अजिबात जाणवणार नाही हे नक्की,’’ असे सध्याच्या कार्यरत भारतीय महिला बुद्धिबळपटूंत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भक्तीने सांगितले. 

 

सकारात्मकता अत्यावश्यक

कोरोना विषाणू महामारीमुळे घरी असलेतरी तंदुरुस्तीबाबत आपण जागरूक असल्याचे भक्तीने सांगितले. ‘‘मी नेहमीच सकारात्मकतेने विचार करतेत्यामुळे कठीण प्रसंगी नैराश्येवर मात करणे शक्य होते. सध्याच्या प्रतिकुल परिस्थितीत हाच दृष्टिकोन महत्त्वाचा आहे,’’ असे भक्ती म्हणाली. फिडेने गतवर्षी तिच्या आयएम किताबावर शिक्कामोर्तब केले. गोमंतकीयांत हा किताब मिळविणारी ती पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली. २०१२ साली ती वूमन ग्रँडमास्टर (डब्ल्यूजीएम)तर २०१० साली वूमन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) बनली होती. भक्तीला दोन वेळा (२०१२ व २०१७) सीनियर महिला राष्ट्रीय विजेतेपदाने हुलकावणी दिलीपण खचून न जातातिने जिगर कायम राखलीत्यामुळेच मागील सलग दोन वर्षे तिला राष्ट्रीय विजेतेपदाचा करंडक मिरवता आला. गतवर्षी तिने खुल्या गटातील राष्ट्रीय ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. त्यामुळे खुल्या गटात पदक जिंकणारी भारतीय महिला बुद्धिबळपटू हा आगळा पराक्रम तिच्या खाती जमा आहे.

 

भक्तीची चँपियन’ कामगिरी...

- राष्ट्रीय सीनियर : २०१८२०१९

- राष्ट्रीय चॅलेंजर : २०११२०१७

- राष्ट्रीय ज्युनियर : २००७२००९

- आशियाई सीनियर : २०१६

- राष्ट्रकुल महिला : २०१४

- आशियाई ज्युनियर : २०११

- आशियाई ज्युनियर ब्लिट्झ : २०१२

- आशियाई १८ वर्षांखालील : २०१०

- आशियाई १४ वर्षांखालील : २००६

- राष्ट्रकुल १६ वर्षांखालील : २००६

 

संबंधित बातम्या