किशोर पेटकर
पणजी
पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर भविष्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळविणे शक्य असेल. गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) मैदानाच्या पाचही मुख्य खेळपट्ट्या तयार केल्या असून आता सरावासाठीही दोन खेळपट्ट्यांचे नियोजन केले आहे.
पावसाळ्यापूर्वी भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या मुख्य पाच खेळपट्ट्या तयार करून हिरवळ रोपणाचे लक्ष्य जीसीएने गाठले आहे . आता दोन्ही साईटस्क्रिनजवळ सराव खेळपट्ट्या तयार करण्याचे नियोजन आहे. खेळपट्टीपासून सीमारेषेचे अंतर स्पर्धात्मक क्रिकेटला आवश्यक इतके आहे, त्यामुळे येथे भविष्यात रणजी करंडक क्रिकेट सामने खेळविण्याचा पर्याय गोवा क्रिकेट असोसिएशनसमोर असेल, असे जाणकारांचे मत आहे.
रणजी करंडक क्रिकेटपासून गेली १४ वर्षे भाऊसाहेब बांदोडकर मैदान दूर आहे. १७ ते २० जानेवारी २००६ या कालावधीत गोव्यातील या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर शेवटचा रणजी सामना झाला होता. मात्र काळाच्या ओघात या मैदानावरील सुविधा अत्याधुनिक क्रिकेटमध्ये मागे पडल्या. त्यामुळे काही काळ मडगाव क्रिकेट क्लबचे डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियम, तर २०१० पासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदान रणजी स्पर्धेतील गोव्याचे नियमित केंद्र बनले. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरच गोव्याने रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला होता. १९९६-९७ मोसमात त्यांनी बलाढ्य कर्नाटकचा डाव व ८१ धावांनी पाडाव केला होता.
कांपाल येथील पणजी जिमखाना वास्तूचे नूतनीकरण झाले आहे. आता ही वास्तू अत्याधुनिक बनली असून आधुनिक क्रिकेटसाठी योग्य असेल. दोन्ही संघांसाठी ड्रेसिंग रुमही दर्जेदार आणि सर्व सुविधांनी युक्त आहेत. त्यामुळे खेळाडूंना तक्रारीची सोय राहणार नाही, असे क्रिकेट जाणकारांना वाटते. पणजी जिमखान्याच्या नूतनीकरणानंतर भाऊसाहेब बांदोडकर मैदान वापरासंबंधी जीसीएने त्यांच्याशी सामंजस्य करार केला असून त्यातूनच खेळपट्ट्यांचे काम पूर्णत्वास आले आहे.
भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरील रणजी क्रिकेट सामने
- एकूण सामने : २४, गोवा विजयी : ३, गोवा पराभूत : ९, अनिर्णित : १२
- पहिला सामना : गोवा विरुद्ध तमिळनाडू, १९८६-८७, अनिर्णित
- शेवटचा सामना : गोवा विरुद्ध हिमाचल, २००५-०६, हिमाचल ६ विकेट्सनी विजयी
- सर्वोच्च धावसंख्या : तमिळनाडू ६ बाद ९१२ घोषित, विरुद्ध गोवा (१९८८-८९)
- नीचांकी धावसंख्या : गोवा सर्वबाद ५५, विरुद्ध हैदराबाद (१९९७-९८)
- वैयक्तिक सर्वोच्च : ३१३ धावा डब्ल्यू. व्ही. रमण, तमिळनाडू विरुद्ध गोवा (१९८८-८९)
- डावात उत्कृष्ट गोलंदाजी : ७-२४ नरेंद्रपाल सिंग, हैदराबाद विरुद्ध गोवा (१९९७-९८)