शॅक चालकांना मिळणार शुल्कात 50 टक्के सुट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील किनारपट्टीलगतच्या शॅकच्या परवान्याचे वाटप अजूनही झाले नसल्याने शॅक्स चालक नाराज झाले होते. परंतु आता शॅक्स चालकांसाठी दिलासादायक बातमी प्रर्यटन खात्याने दिली आहे.

पणजी : शॅकचे चालक झाले होते निराश; कारण पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील किनारपट्टीलगतच्या शॅकच्या परवान्याचे वाटप अजूनही झाले नसल्याने शॅक्स चालक नाराज झाले होते. परंतु आता शॅक्स चालकांसाठी दिलासादायक बातमी प्रर्यटन खात्याने दिली आहे. राज्यातील किनाऱ्यांवर प्रर्यटन खात्याकडून शॅक्ससाठी सीमांकनाचे काम तसेच परवान्याच्या नुतनीकरणास सोमवारपासून प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती पर्यटन खात्याच्या सुत्रांनी जाहीर केली.

दरवर्षी पर्यटन हंगाम सुरु होण्याच्या आधीच राज्यातील किनाऱ्यावरील शॅक परवान्यांचे नुतनीकरण सप्टेंबर महिन्यापूर्वी केले जात असते. त्यामुळे किनाऱ्यावर शॅक उभारणीचे काम पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच पूर्ण केले जाते. पर्यटन खात्याकडून शॅक परवान्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शॅकचे परवाना शुल्क कमी करण्याची मागणी केल्यामुळे या प्रक्रीयेला उशीर झाला होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी राज्यातील शॅक शुल्कात ५० टक्के सूट दिल्यामुळे शॅक चालक आनंद व्यक्त करीत आहे. 

उत्तर व दक्षिण गोवा मिळून ३५० हून अधिक शॅक्स उभारले जातात. राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली तेव्हापासून काही शॅक्स मालकांनी शॅक उभारणीची तयारी दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यावर केली आहे. मात्र उत्तर गोव्यात अजूनही तशी घाईगडबड आढळून आली नाही. कोरोनाच्या संकटामुळे अनेक शॅक चालकांनी यंदा शॅक उभारणी नको अशी भूमिका घेतली  आहे. परंतु आता सरकारने शॅक शुल्कात घवघवीत 50 टक्के सूट दिल्याने शॅक उभारणीला येत्या आठवड्यापासून सूरूवात होणार असल्याचे पर्यटन खात्याच्या सुत्रांनी सांगितले आहे. 

संबंधित बातम्या