गोवा वैद्यकिय महाविद्यालयामध्ये दहा सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एमसीआयकडे अर्ज

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

गोवा वैद्यकिय महाविद्यालयाने (जीएमसी) १० सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे ( एमसीआय ) अर्ज केला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास, शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून या अभ्यासक्रमांना सुरूवात होईल.

पणजी: गोवा वैद्यकिय महाविद्यालयाने (जीएमसी) १० सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे ( एमसीआय ) अर्ज केला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास, शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून या अभ्यासक्रमांना सुरूवात होईल.

गोवा वैद्यकिय महाविद्यालयात तीन वर्षांच्या कालावधीतील डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (डीएम) या पदवीअंतर्गत न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, बालरोग, प्लास्टिक सर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, कार्डियाक, कार्डियोथोरॅसिस अनेस्थेसिया आणि एंडोक्रिनोलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश होणार आहे. हे अभ्यासक्रम सुरू झाल्यावर गोव्यातील वैद्यकिय विद्यार्थ्यांना राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

“आम्ही महाविद्यालयात सुरू होणाऱ्या दहा सुपर स्पेशलिटी अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी दोन जागा देण्यास एमसीआयकडे अर्ज केला आहे. परवानगी मिळाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. गोव्यात हे अभ्यासक्रम नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना डीएम अभ्यासक्रम घेण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते, त्यामुळे परवानगी मिळाल्यास राज्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण बाब ठरेल”, असे जीएमसीचे डीन डॉ एस.एम. बांदेकर म्हणाले.

गोवा वैद्यकिय महाविद्यालयाचे 500 पेक्षा अधिक खाटा असलेले सुपर स्पेशलिटी ब्लॉक जवळजवळ तयार आहे आणि 2021 च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकमुळे गोवा वैद्यकिय महाविद्यालयाला  एमसीआयने घालून दिलेल्या अटींसह नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची  मागणी पूर्ण करण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या