अंतरंग: हिमालयातील युद्धात माहीर : एस्टॅब्लिशमेंट-२२

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) तत्कालीन प्रमुख भोलानाथ मलीक यांच्या सूचनेवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्या स्थापनेचे आदेश दिले. त्यालाच विकास बटालियनही किंवा एस्टॅब्लिशमेंट-२२ किंवा फक्त २२ म्हणतात

चीनशी सीमावर्ती भागांतील हालचालींवर देखरेखीसाठीच आणि भविष्यात पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी १९६२ मध्ये एस्टॅब्लिशमेंट-२२ निर्मिती झाली. इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) तत्कालीन प्रमुख भोलानाथ मलीक यांच्या सूचनेवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्या स्थापनेचे आदेश दिले. त्यालाच विकास बटालियनही किंवा एस्टॅब्लिशमेंट-२२ किंवा फक्त २२ म्हणतात, कारण त्याचे पहिले इन्स्पेक्‍टर जनरल मेजर जनरल सुजनसिंग उबन यांनी दुसऱ्या महायुद्धात २२ माऊंटन डिव्हिजनचे युरोपात नेतृत्व केले होते. 

असे आहे एसएफएफ
मुख्यालय उत्तराखंडमधील छाकराता. सुरुवातीला ते आयबीच्या नंतर रिसर्च अँड ऍनालिसीस विंग (रॉ) यांच्या अखत्यारित होते. ते लष्कराचा भाग नसले तरी रचना, कार्यपद्धती लष्करासारखीच. महिलांचाही सहभाग आहे. भारतीय लष्करातील मेजर जनरल दर्जाचा अधिकारी त्याचा महासंचालक असतो. यात तिबेटी, लडाखी, बॉन, सिक्किमी आणि आता गुरखा यांना सामील करून घेतलेले जाते. 

पन्नासच्या दशकात सीआयए आणि भारतीय गुप्तचरांनी नेपाळामधील मस्तांग येथे तळ केला होता. चीनने तिबेट ताब्यात घेतला तेव्हा याच तळावरील तिबेटींनी चौदाव्या दलाई लामांना भारतात आणले होते. सुरुवातीला यात तिबेटी, खामपास यांना सामील करून घेतले. तिबेटी नेते छुशी गगद्रकही त्यात होते. यात सुरुवातीला १२ हजार जण होते. त्यांना सहा महिने ‘सीआयए’ आणि ‘रॉ’ यांनी प्रशिक्षण दिले. भोलानाथ मलीक यांच्यासह दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेले बिजू पटनाईक यांनीही याला नावरुपाला आणले. 

निमा तेनझिन हुतात्मा
पूर्व लडाखमध्ये चीनच्या हालचालींना प्यांगयाँग त्सो भागातील हालचाली रोखण्यासाठी १ सप्टेंबर २०२० रोजी कंपनी निमा तेनझिन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोहीम राबवली, त्यात तेनझिन सुरुंगाच्या स्फोटात ठार झाले, तरीही तेथील फिंगर चारवर ताबा मिळवून तेथे चौकी ठोकण्यात एसएफएफ आणि लष्कराला यश आले. तेथून काहीशे मीटरवर चीनची चौकी आहे. 

लडाख स्काऊट, नुब्रा गार्ड 
याच एसएफएफच्या धर्तीवर सरकारने लडाख स्काऊट आणि नुब्रा गार्ड या निमलष्करी दलाची निर्मिती केली. एसएफएफच्या सहा बटालियन असून, त्यातल्या प्रत्येकात सहा तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीला तिबेटी मेजर किंवा कॅप्टन असतो. सिग्नल आणि मेडिकल तुकडीत महिला असतात. 

बांगलादेश युद्धात कामगिरी
बांगलादेश युद्धावेळी मिझोराममध्ये एसएफएफची तुकडी पाठवून तिच्याद्वारे चितगाव टेकड्यांच्या परिसरात कारवाया केल्या गेल्या. त्यांना कापताई धरण फोडणे, काही पूल उडवण्याची कामे दिली आणि ती चोख पार पाडली. त्यांनी चितगाव टेकड्यातील गावे ताब्यात घेतली, पाकिस्तानी सैन्याला ब्रह्मदेशात जाण्यापासून रोखले आणि शरण यायला भाग पाडले. 

ब्ल्यू स्टार, कारगिल युद्ध
एसएफएफकडे १९८४ मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवेळी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तमधील कारवाईची जबाबदारी दिलेली होती. नंतर इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी असताना हत्या झाल्याने व्हीआयपीच्या सुरक्षेची जबाबदारीही एसएफएफकडे होती. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या