Restaurants in Goa: असागावचे 'गनपावडर'

अनेकवेळा गोव्यातील या असागावला गेलेय पण याला ' फुलांचं गाव' म्हणतात हे माहित नव्हतं.
असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

उत्तर गोव्यातील (North Goa) काही गावं आपलं वेगळेपण छान जपून आहेत आणि हे वेगळेपण जपताना त्यांनी काही चांगले बदल देखील स्वीकारले आहेत. म्हापसा (Mapusa) गावाच्या सीमेवरची छोटीशी टेकडी पार करून गेलो कि असागाव (Assagao) नावाचं एक सुंदर गाव लागतं. डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगानी रंगलेली इंडो - पोर्तुगीज स्थापत्यशैलीतील घरं हे एक या गावाचे वैशिष्ट्य. यागावातील दोनशे - अडीचशे वर्ष जुनी घरं बघणं एक वेगळा अनुभव आहे. तिन्ही बाजूंनी टेकडीने वेढलेलं, हिवाळ्याच्या काळात धुक्याने अच्छादलेलं हे छोटंसं गाव वेगवेगळ्या कारणांनी आकर्षित करत राहतं.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

अनेकवेळा या असागावला गेलेय पण याला ' फुलांचं गाव' म्हणतात हे माहित नव्हतं. नुकतीच एकांनी माझ्या माहितीत भर घातली. अलीकडच्या काळात या गावाला ' गोव्याची टस्कनी' (इटलीतील विविध कलांचे माहेरघर मानला जाणारा भाग) म्हणलं जाऊ लागलंय. गोव्यातील आगळ्या वेगळ्या ' तियात्र ' या नाट्यप्रकाराचे जनक लुकासिनो रिबेरो हे याच गावचे आणि म्हणूनच कदाचित ' कलाकारांचे गाव' म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

अशा वेगवेगळ्या संदर्भांची पार्श्वभूमी लाभलेलं गाव नवनिर्मिती करणाऱ्या लोकांना खुणावत असतं. पत्रकारितेची पार्श्वभूमी असणाऱ्या पण स्वतःच वेगळं रेस्टारंट असावं असं स्वप्न बघणाऱ्या सतीश वॉरिअर हे या गावाच्या प्रेमात पडले. दिल्लीतील ' हौज खास ' नावाच्या ऐतिहासिक भागात एक रेस्टोरंट चालवत होते. पण गोव्यातला निसर्ग, इथल्या शांततेनं त्यांना भुरळ पाडली.

बाहेरून येऊन गोव्यात रेस्टोरंट सुरु करणंहि सोपी गोष्ट नाही आणि ते देखील केरळी पद्धतीचं रेस्टोरंट चालवणं हि तर त्याहूनही सोपी गोष्ट नाही. सतीश वॉरिअर यांच्या ' गनपावडर ' या रेस्टोरंन्टने मात्र यासगळ्या तर्कांना खोटं ठरवलंय. सतीश वॉरिअर हे असागावमध्ये 'गनपावडर' नावाचं केरळी रेस्टोरंट चालवतात. पंधरा वर्षांपूर्वी हे रेस्टोरंट त्यांनी आपल्या मित्रांच्या सोबतीने सुरु करायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं. गोव्यात रेस्टोरंट चांगलं चालू शकतं पण गोव्यात ' केरळी ' पदार्थांचं रेस्टोरंट कसं चालेल? गोव्यात पर्यटक येतात इथली ताजी मासळी खायला. मासळीमधल्या अनेक गोवन पाककृती प्रसिद्ध आहेत.

असागावचे 'गनपावडर'
Restaurants in Goa: गोमंतकीय चव जपणारे कोकणी कँटीन

गोव्यात येऊन पर्यटक केरळी पदार्थ खातील का? असे महत्वाचे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. सतीश यांचं त्यावर एकच उत्तर होतं जर आपण लोकांना चांगला दर्जेदार पर्याय दिला तर लोक आनंदाने तो स्वीकारणार. हे देखील तितकंच खरय कि गोव्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकाला रोज काहीतरी नवीन खाऊन बघायला आवडेल. त्यात एखाद्या वेळी तरी तो असं काहीतरी वेगळं खायचा प्रयत्न करेल. 'गनपावडर'चा वेगळेपणा लोकांनी आनंदाने स्वीकारलंय.

असागावचे 'गनपावडर'
Restaurants in Goa: 'जिला बेकरी'; बेकरी उत्पादन निर्मीतीतले महत्वाचे नाव

गनपावडरमध्ये जाऊन काय खाणार?

गनपावडर अर्थातच केरळी पदार्थांचे रेस्टोरंट आहे त्यामुळे इथे केरळी पदार्थ मिळतात. इथले इडिअप्पम अगदीच खास आहेत. गोव्यात घराघरात पोळे बनवले जातात. पोळे म्हणजे आंबोली - घावन यांचाच प्रकार. पण इडिअप्पम त्यापेक्षा जरा वेगळा. मध्यभागी छान मऊ जाळीदार आणि काढला कुरकुरीत लागणारे इडिअप्पम बसल्या जागी किती खाल्ले जातात मोजदादच राहत नाही. इडिअप्पममध्ये साधे आणि अंड घातलेले इडिअप्पम असे दोन प्रकार मिळतात. साधे इडिअप्पम एकदम हलके वाटतात आणि अंड घातलेले इडिअप्पम जरासे जड वाटतात.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

अंड इडिअप्पम एक खाल्ला कि पोट भरून जातं. पण साधे तुम्ही कितीही खा. लवकर पोट भरत नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर या इडिअप्पम बरोबर व्हेजिटेबल स्टु म्हणजेच नारळाच्या दुधात आणि वाटलेल्या ओल्या नारळाच्या मसाल्यात शिवलेली भाजी खाऊ शकता आणि जर मांसाहारी असाल तर याबरोबर केरळ राज्याचा प्रतिक मानला जाणारा 'करी मीन' मासळीची ग्रेव्ही, नाहीतर केरळी पद्धतीने बनवलेलं मटण, चिकन खाऊ शकता. इडिअप्पमच्या बरोबरीने मलबारी परांठा इथली खासियत आहे. मलबारी परांठा खावाच असा असतो. इथे टिपिकल केरळी चव अनुभवयाला मिळते. केरळी पदार्थांमधील विविधता बघायची असेल तर इथले अवियल, पालकारू पप्पू, कैनाकरी, पोरियल थोरांन यासारखे केरळी पदार्थ मुद्दाम खाऊन बघायला हवेत.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ

मासळी सगळी गोव्यातलीच पण ती शिजवण्याची पद्धत टिपिकल केरळी आहे. गोव्यात क्रीमध्ये कढीपत्ता कधीच बघायला मिळणार नाही कि इथल्या करील फोडणी कधी जात नाही. पण केरळी करीमध्ये मोहरीची फोडणी आणि भरपूर कढीपत्ता घातलेला असतो. फिश फ्राय करायची पद्धत देखील वेगळी आहे. त्यामुळे कधीतरी वेगळी चव अनुभवायची हुक्की आली तर गनपावडर मधील मासळीचे प्रकार खाऊन बघयला हरकत नाही. इथल्या मेनूकार्डवर नजर टाकताच भाताचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात ते समजतं. केरळी रेस्टोरंटमध्ये मिळणारे भाताचे सगळे प्रकार इथे बनवले जातात.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर'

उत्तम प्रकारचा कर्ड राइस, लेमन राइस, चिंचेचा कोळ घालून केलेला राइस असे असंख्य प्रकार इथे मिळतात. मसालेदार जेवण जेवून झाल्यावर यातला कुठलाही भात खाणे हा उत्तम प्रकार आहे. वर्णन वाचून असं वाटेल कि हे फक्त मांसाहारी लोकांसाठी योग्य असं ठिकाण आहे. पण हा गैरसमज ठरेल. शाकाहारी खवय्यांना देखील इथे अतिशय चिवष्ट प्रकार खायला मिळतात. शिवाय इथलं वातावरण इतकी आरामदायी आहे कि आपण घराच्या अंगणात बसून अतिशय निवांतपणे गप्पा मारत जेवतोय असं वाटत राहतं. इंडो - पोर्तुगीज स्थापत्यशैली लाभलेला २०० वर्ष जुन्या व्हिलाचे रेस्टोरन्टमध्ये रूपांतर केले आहे. मूळ रचनेला कुठे हि धक्का न लावता आहे ताशा स्वरूपात ते अतिशय दिमाखात सजलंय. इथली सजावट हा देखील आकर्षणाचा मोठा भाग असतो. सजावटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रचना बघायला मिळतात. कलाकार मनाचा माणूस इथे छान रमून जातो.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

कधी काळी गनपावडरमध्ये माझं अनेकदा जाणं व्हायचं. मी ज्या संस्थेत काम करत होते त्या संस्थेचे संचालक यशवंत ठाकर यांना वेगवेगळी रेस्टोरंट आणि त्यातले आगळेवेगळे पदार्थ चाखायला खूप आवडायचे. यातूनच आमचा एक ' खादाड' ग्रुप तयार झाला होता. त्यात आमचे मित्र राजेंद्र गानू त्यांच्या पत्नी अरुणा गानू हे देखील होते. 'गनपावडर' या रेस्टोरंन्टची ओळख या दाम्पत्यामुळेच झाली. रेस्टोरंन्टची रचनाच अशी आहे कि इथे तुम्ही कुठेही बसून छान शांत - निवांतपणा अनुभवू शकता.

असागावचे 'गनपावडर'
असागावचे 'गनपावडर' Dainik Gomantak

गप्पांचे फड मजेत रंगतात. काही जागा असतातच अशा ज्या माणसांना जोडतात. गनपावडर हे असंच ठिकाण आहे. गनपावडर हे आता असागावची ओळख बनले आहे. सतीश वॉरिअर यांनी म्हणल्याप्रमाणे जर आपण उत्तम आणि दर्जेदार पर्याय लोकांना दिला तर लोक त्याला चांगलाच प्रतिसाद देतात. गनपावडरला लोकांचा फक्त चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये तर लोक आता गनपावडरच्या प्रेमात पडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com