‘ती’चं सौंदर्य बाह्य रूप, रंगावर नेसलेल्या साडीवर का?

‘ती’चं सौंदर्य बाह्य रूप, रंगावर नेसलेल्या साडीवर का?
‘ती’चं सौंदर्य बाह्य रूप, रंगावर नेसलेल्या साडीवर का?

आज आपण सगळेच बाह्य सौंदर्यावर भुलत चाललो आहोत. केवळ बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आपण आपला वेळ, पैसा सारं काही खर्ची घालतो आहोत. ‘सुंदर स्त्री’ ही केवळ तिच्या बाह्य रूप, रंगावर, तिने नेसलेल्या साडीवर किंवा तिच्या भुरभुऱ्या केसांवर ओळखली जावी, हे खरोखर आपलं दुर्दैव आहे.

वर्तमानपत्रात काल पहिल्या पानावर आलेल्या सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीकडे माझं लक्ष गेलं आणि काही काळासाठी  मी चिंतनात मग्न झाले.

लहानपणी आई हीच आपल्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ती असते. तिच्या मायेचं सौंदर्य आपल्या मनावर बहरलेलं असतं. तेव्हा आपली आई काळी आहे का गोरी, सुंदर आहे का कुरूप याबद्दल आपल्याला काहीसुद्धा वाटत नाही. त्यावेळी आपलं मन निर्मळ व निरागस असतं.

पण जसजसे आपण १२-१३ वर्षांचे होतो. तशी आपल्या मनातली सौंदर्याची व्याख्या बदलताना दिसते. एवढी वर्ष आपल्या मनात ‘role model’ म्हणून असलेली आईची जागा कोणत्यातरी सिनेमाच्या सुंदर नायिकेने किंवा मॉडेलने घेतलेली असते . प्रत्यक्षात कधीच न पाहिलेल्या, न भेटलेल्या आणि फक्त सिनेमाच्या पडद्यावरच बघितलेल्या नायिकेला आपण आपल्या मनाच्या कप्प्यात अढळ स्थान देतो. तिच्याप्रमाणे बोलण्याचा, पेहेराव करण्याचा प्रयत्नही करत असतो. आपल्या शरीराची जसजशी जाणीव आपल्याला होत जाते तसतसं आपण आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. मग त्यासाठी लागणाऱ्या शेकडो beauty creams, parlour आपण करतो. समाजामध्ये सुंदर दिसण्यासाठी make up पासून diat पर्यंत सर्व करतो आणि हळूहळू आपल्या मनामध्ये तुलनेची भावना उत्पन्न होते. त्यातूनच जन्म घेतो तो ‘न्यूनगंड’.

आपल्यासमोर अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या वर्णाबद्दल, स्वतःच्या स्थुलपणाबद्दल न्यूनगंड बाळगून आहेत. ज्या अजूनही समाजात मोकळेपणाने वावरत नाहीत आणि या कारणामुळेच अनेकदा त्यांच्यासमोर आलेली संधी हुकते.

जगात जशी गोरी माणसं आहेत तशीच कृष्णवर्णीयसुध्दा आहेत. कारण शेवटी ती निसर्ग निर्मितीच आहेत. त्यामुळे एखाद्याने ज्याप्रमाणे आपण कृष्णवर्णी आहोत याचा न्यूनगंड बाळगणे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्याचा अभिमान बाळगणेही  बरोबर नाही. कारण जे स्वतः कमावलेलं नाही, जे निसर्गाकडूनच आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल अहंकार बाळगण्याचा आपल्याला अधिकार नाही.

आज आपण सगळेच बाह्य सौंदर्यावर भुलत चाललो आहोत. केवळ बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आपण आपला वेळ, पैसा सारं काही खर्ची घालतो आहोत. ‘सुंदर स्त्री’ ही केवळ तिच्या बाह्य रूप, रंगावर, तिने नेसलेल्या साडीवर किंवा तिच्या भुरभुऱ्या केसांवर ओळखली जावी, हे खरोखर आपलं दुर्दैव आहे. स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या ही एवढी संकुचित का असावी?

मनुष्याचं देखणेपण हे केवळ शारीरिक किंवा बाह्य रुपावर अवलंबून आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण फारच छोट्या दिलाचे आहोत. आपली वृत्ती कृपण आहे आणि डोळे स्वार्थी. रूपवान असणं, सुंदर असणं यात काहीच गैर नाही. मात्र माणसाचं व्यक्तिमत्व त्यावर ठरत नाही. व्यक्तिमत्व ठरतं ते त्याच्या कर्तृत्वावर, व्यक्तीच्या आंतरिक सौंदर्यावर. आजकाल सौंदर्याच्या मागे पळता-पळता आपण आपल्या जन्माचं उद्दीष्ट साध्य करणं विसरतो आहोत की काय? असा प्रश्‍न स्वत:लाच विचारायची गरज आहे.

बाह्य सौंदर्यावर एखाद्याची किंमत किंवा मूल्य ठरत नसतं. ते ठरतं मिळवलेल्या आत्मबळावर, स्वतःच्या प्रतिभेवर गाठलेल्या ध्येयाने. एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीच्या चेहेऱ्यावर जे तेज बहरलेलं असतं त्यामुळेच तिचं सौंदर्य खुलतं. सुंदर दिसणं त्याहीपेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं. आपल्या हिंदुस्थानात आजवर राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, सिंधुताई, किरण बेदी यांसारख्या अनेक सुंदर स्त्रिया होत्या आणि आजही आहेत. ज्यांनी त्यांचं सौंदर्य त्यांच्या कार्यक्षमतेनं घडवलं, फुलवलं व जपलं. त्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेने, बुद्धिमत्तेने अनेक यशाची शिखरं पादाक्रांत केली. आज आपण युवा तरुणींनीसुध्दा केवळ फोटोशॉप किंवा एडिट करून परिपूर्ण केलेल्या मॉडेल्सच्या देह सौंदर्याच्या मागे न लागता स्वतःमधील आंतरिक सौंदर्याला म्हणजेच आपल्यातील कलागुणांना, क्षमतांना ओळखायला हवं. स्वतःच्या हिंमतीवर आणि आत्मबळावर आपलं बाह्य सौंदर्यापलीकडे असलेलं अस्तित्व निर्माण करून ते जपायला हवं. आपलं देखणेपण रूप, रंग हे केवळ एक कवच असतं. ते दीर्घकाळ टिकतच नाही. दुर्दैवाने एखाद्या अपघातात किंवा म्हातारपणी चेहेऱ्यावर सुरकुत्या रेलल्या की ते नाहीसं होतं, गळून पडतं. पण आंतरिक सौंदर्य मात्र आपल्या अस्तित्वाशी जोडलं जातं, जन्मभर आपल्या बरोबर असतं आणि म्हणूनच बाह्य सौंदर्य टिकवतानाच आंतरिक सौंदर्य, गुणात्मक सौंदर्य आपल्याकडे असलं पाहिजे. समाजापुढे आणि विशेषतः युवापिढी समोर ‘स्त्री’ ची व्याख्या रूपवान, नाजूक व सुंदर अशी होण्यापेक्षा गुणवान, खंबीर आणि सामर्थ्यवान अशी व्हावी. स्त्री गुणवान असली तरच घर चैतन्यमयी होतं. अशी सामर्थ्यवान, धाडसी व प्रगतशील स्त्रीच आपल्या देशाला हवी आहे. हो ना?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com