देशाचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माचा प्रसार व्हावा
brahmakumari shivratri programme in panaji

देशाचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी अध्यात्माचा प्रसार व्हावा

पणजी : संपूर्ण जग भारताकडे एक आध्यात्मिक शक्ती असलेले राष्ट्र म्हणून पाहत आहे. देशाचे हे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या भावी पिढीमध्ये अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार होणे अत्‍यावश्‍‍यक आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयतर्फे येथे आयोजित केलेल्या महाशिवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना केले.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे महाशिवरात्रीचे औचित्य साधून कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर ‘१०८ शिवलिंगां’चा देखावा तसेच विविध माहिती देणाऱ्या दालनांचे उद्‍घाटन तसेच महाशिवरात्री उत्सव आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या हस्ते दालनांचे उद्‍घाटन करण्‍यात आले. यावेळी डॉ. सावंत यांनी आपले अध्यात्मविषयक विचारही व्यक्त केले.

डॉ. सावंत व कवळेकर यांनी या भेटीवेळी दालनांविषयी माहितीही जाणून घेतली. अध्यात्माबद्दल आपले विचार व्यक्त करताना मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती व विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्‍व आहे आणि सणांमध्ये अध्यात्माची थोर व्याख्या दडलेली आहे. येथील संस्कृती व सणांमुळेच देशात शांतता व सलोखा नांदत आहे. त्यासाठीच संपूर्ण जग भारताकडे एक अध्यात्मिक शक्ती असलेले राष्ट्र म्हणून पाहत आहे.

अशा प्रकारच्या महोत्सवाने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास आणि राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्यास मदत होते, असेही त्यांनी पुढे नमूद केले. मागील साडे आठ दशकांपासून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय संपूर्ण विश्‍वात अध्यात्मिकतेचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. प्रेम, शांती, सद्‍भावनेचा विचार घेऊन पुढे चालणाऱ्या या विश्‍वविद्यालयाचे कार्य प्रशसंनीय असेच असून सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी यावेळी केले. ब्रह्मकुमारीजतर्फे आयोजित केलेल्या या शिवरात्री महोत्सवात विविध विषयांवर माहिती देणाऱ्या दालनाची प्रशंसा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यावेळी केली.

योगिक शेती ही संकल्पना आजच्या घडीला उपयुक्त अशीच असून अशाप्रकारे प्रयोग गोव्यातही मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत, असे ते म्हणाले. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे तसेच किटकनाशक द्रव्यामुळे अन्न व खाद्य पदार्थातून मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पूर्वीची शेतीपद्धती व आताच्या शेती पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जमीनीची सुपिकता नष्ट होत चालल्याने आजचा शेतकरी रासायनिक खत वापरून भरपूर पीक घेण्याच्या तयारीत आहे. पुढे त्याचे काय परिणाम होणार याचे त्याला काही सोयरसुतक नाही. ही घातक प्रणाली असून, रासायनिक खताचा कमीत-कमी वापर होऊन सेंद्रीय खताचा जास्त वापर व्हायला हवा तसेच योगिक शेतीचेही प्रयोग राज्यात व्हायला हवेत, असेही बाबू कवळेकर यांनी नमूद केले.

योगिक शेती ही संपूर्ण नैसर्गिक प्रणाली व प्रक्रिया असून शुद्ध व श्रेष्ठ संकल्पांच्या कंपनांच्या माध्यमातून जन्माला येणारे हे पीक असून या प्रणालीत कोणत्याही रासायनिक खताचा वापर व किटकनाशकाचा वापर केला जात नाही. या माध्यमातून येणारे पीक मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरल्याची कित्येक उदाहरणे आहेत. या प्रणालीचा गोव्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग करावा, असे आवाहन कवळेकर यांनी केले तसेच ब्रह्मकुमारीजच्या या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्‍गार काढले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com