संघर्ष कोरोनाशी

विजयसिंह आजगावकर
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. सर्वांनाच ‘त्राही माम्’ करून टाकलेय. ह्या विषाणूचा संसर्ग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय.

कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. सर्वांनाच ‘त्राही माम्’ करून टाकलेय. ह्या विषाणूचा संसर्ग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. आतापर्यंत जगात ९ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर आपल्या भारतात ९ लाखाहून अधिक लोक कोरोनाबाधित सापडलेत. ही बाब अतिशय गंभीर असून सर्वच क्षेत्रांवर याचा विपरीत परीणाम झालाय. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत बनली असून, हे चित्र पुढे काही काळ असेच चालू राहिल्यास ‘आर्थिक आणिबाणी’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच चीन व पाकिस्तान हे दोन्ही देश भारताच्या कुरापती काढत असल्याने युध्दाची परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकारला आपले संपूर्ण लक्ष भारताला सुरक्षित  ठेवण्यावर केंद्रित करावे लागेल. सांगण्याचा मुद्दा हा की, प्रत्येक भारतीय नागरिकाने याचा बारकाईने विचार केला पाहिजे. अन् त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आरोग्य खात्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. एवढेच नव्हे तर शासन, प्रशासन, पोलिस खाते तसेच प्रसार माध्यमांकडून वेळोवेळी नागरिकांना यासंदर्भात सूचना केल्या जात आहेत. तरीसुद्धा आजही समाजातील काही बेजबाबदार माणसे आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना दिसताहेत. काही वेळेला असेही चित्र पाहावयास मिळते की अशिक्षित माणसे जीवाला घाबरून तोंडावर मास्क कटाक्षाने बांधतात. पण, स्वतःला सुशिक्षित व सुसंस्कारीत म्हणवून घेणारी माणसे तोंडावरचे मास्क हनुवटीवर लावून फिरत असतात. अशा परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण झाले तर सरकारला दोष देणे चुकीचे ठरेल. काही ठिकाणी शारिरीक अंतर ठेवणे मुशकील होत असले तरी मास्क हनुवटीवर लावून फिरणे वा प्रवास करणे चुकीचे आहे. खरे म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला पाहिजे. समाजातील काही माणसे नियमांचे कडक पालन करताना दिसताहेत तर काही माणसे बेजबाबदारपणे वागताना दिसताहेत. मग कोरोनाचे संक्रमण थांबणार कसे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे व दिवसाकाठी शंभराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने सरकारी यंत्रणांवर ताण पडत आहे. सध्या गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा ५००० हून अधिक झालेला आहे. सगळ्याच भागात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास दिरंगाई न करता आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत आपली चाचणी करून घेतली पाहिजे. शासन तसेच आरोग्य यंत्रणेने देखील कोणत्याही परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची हेळसांड होऊ नये म्हणून कठोर पावले उचलली पाहिजेत. रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे काम आहे. त्यात कसूर होऊ नये यांची सर्वतोपरी काळजी आरोग्य यंत्रणेने घेतली पाहिजे. काही रुग्ण सरकारी इस्पितळामध्ये न जाता खासगी रुग्णालयात का धाव घेतात यावर आरोग्य विभागाने चिंतन करण्याची गरज आहे. त्याचे कारण शोधून काढले पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाल्यास कोरोनाग्रस्तांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी जतना व सरकार दोघांनीही आपापल्या परीने काळजी घेतली पाहिजे.

कोणताही रोग असो. तो अनेक वर्षे पृथ्वीतलावर राहणार नाही. याचे कारण असे की योग्य वेळ येताच या पृथ्वीतलावरील एका तरी संशोधनकाला त्या रोगावर प्रभावी औषध शोधण्याची बुद्धी ही होणारच हे ठरलेलेच आहे. फार पूर्वी देवी रोग, प्लेग, स्पॅनिश, फ्लू यासारख्या आजारांनी थैमान घातले होते. आज हे रोग नावालाही सापडत नाहीत. कोरोना असो वा ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगांचचे उच्चाटन आज ना उदया होणारच आहे. फक्त आशावाद व सकारात्मक दृष्टीकोन हवा. 

संबंधित बातम्या