कार्यात विजयश्री मिळवून देणारा दिवस : विजयादशमी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ ही काव्यपंक्ती आपल्याला दसऱ्याबद्दल बरेच काही सांगून जाते. ‘आश्विन शुद्ध दशमी’ हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा.

पल्या हिंदू धर्मामध्ये साडेतीन विशेष शुभ असे मुहूर्त आहेत. ते म्हणजे चैत्री पाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदा), अक्षय्यतृतीया (वैशाख शुद्ध तृतीया), विजयादशमी/ दसरा (आश्विन शुद्ध दशमी) हे संपूर्ण मुहूर्त व दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) हा अर्धा मुहूर्त अत्यंत आनंद देणारा, परस्परांतील स्नेह वाढविणारा आणि मुहूर्त म्हणून अत्यंत शुभ दिवस म्हणजे दसरा. या दिवशी कोणत्याही कामाकरिता मुहूर्त बघावा लागत नाही. या दिवशी प्रारंभ केलेल्या कार्यास विजय प्राप्त होतो. म्हणूनच या सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात. असा हा दसरा यंदा रविवारी २५ ऑक्टोबर २०२०  या दिवशी आलेला आहे.

‘दश’ म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीत, नऊही दिवस देवीने दहाही दिशांवर विजय मिळविला असल्याने, दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळवलेल्या विजयाचा हा दिवस. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा दिवस. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची, यश, किर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची व लुटवायचा हा दिवस. म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेचच हा दिवस येतो म्हणून याला नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस असेही मानतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन व शस्त्रपूजन ही चार कृत्ये केली जातात. शुभमुहूर्त असल्यामुळे दसऱ्यादिवशी मुद्दामहून नवी खरेदी केली जाते. नवे करार, नव्या योजनांचा शुभारंभ केला जातो. घर, गाडी, बंगला, सोने, चांदी यांची खरेदी केली जाते. नवे व्यवसाय सुरु केले जातात. 

सणांप्रमाणे दसरा सण साजरा करण्यामागेही काही पौराणिक गोष्टी निगडित आहेत. (१) दुर्गादेवीने विविध रूपे घेऊन दुष्ट महिषासुर असुराबरोबर युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस नऊ रात्रीपर्यंत (नवरात्रोत्सव) चालले व दहाव्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला; म्हणून ‘म्हैसुर’ संस्थानचा दसरा उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. (२) अज्ञातवासात असताना पांडवांनी स्वत:ची शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर ज्या दिवशी त्यांनी ती परत धारण केली, तो दिवस दसऱ्याचा होता. आजही दसऱ्यात शमीवृक्षाचे विधिपूर्वक पूजन केले जाते. (३) प्रभू रामचंद्रांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाला ठार मारून विजय प्राप्त केला. त्यांच्या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही हा सण साजरा केला जातो.

उत्तर भारतात या दिवशी रामलीलेचे आयोजन केले जाते. रावण म्हणजे दुर्गुणाचा पुतळा. दुष्ट प्रवृत्तीचा माणूस. त्याची प्रतिमा आपण जाळतो. हा दिवस वाइटावर चांगल्याचे, अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिकही महत्त्व आहे. अनेक शूर पराक्रमी राजे दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी याच मुहुर्तावर निघत असत. याला सीमोल्लंघन म्हणत. मराठ्यांच्या स्वाऱ्याही याच दिवसापासून सुरू होत. राजपुत्र सरदारही याच मुहुर्तावर लढाईवर निघत असत. पेशवे स्वत:च्या आश्रित संस्थानिकांस दसऱ्यादिवशी दरबार भरवून मानाचा पौशाख देत.

तसे पाहिले तर दसरा हा प्रारंभी एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यानंतर शेतकरी हा सण साजरा करतात. नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या वेदीवर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तिथे स्त्रिया गवताची पेंडी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला ‘बावन्न पोटी’ असे म्हणतात. म्हणजे धान्य बावन्न पट होऊ दे. ही प्रथादेखील या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक रूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी राजे आणि सामंत सरदार हे लोक स्वत:ची शस्त्रे व उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडून तिची पूजा करतात. शेतकरी, कारागीर स्वत:च्या हत्यारांची पूजा करतात. लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्याची शस्त्रेच आहेत. म्हणून या दिवशी त्यांचीही पूजा केली जाते. यंत्राची पूजा करण्याचा उद्देश म्हणजे भरपूर काम करणे. कोणत्याही गोष्टीला गंज चढणे म्हणजे कामात ढिलेपणा येणे. या दिवशी यंत्र साफसूफ करून त्याची पूजा करतात. म्हणजेच कामाला आता वेग हवा, हेच सूचित करायचे असते. विद्यार्थी या दिवशी सरस्वतीदेवीची प्रतिमा पाटावर काढून तिची म्हणजेच विद्यादेवीची पूजा करतात. या दिवसापासून जोमाने अभ्यासाला सुरवात करायची असते. तरच आपली प्रगती होईल हे लक्षात ठेवावे. या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात. ‘सोनं घ्या, सोन्यासारखं रहा’ अशा शुभेच्छा दिल्या जातात.

‘आला आला दसरा, भेदभाव विसरा’, यातूनच या सणाचा उद्देश कळतो. या दिवशी जुनी भांडणे व मतभेद सर्व काही विसरून नवीन जीवनाचा प्रारंभ करावा. म्हणूनच म्हणतात, दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा.
- रेशा रमाकांत प्रभुदेसाई , 
धुळेर-म्हापसा

संबंधित बातम्या