देव दीपावली

देव दीपावली तर गोव्यात ‘व्हडली दिवाळी’ असे संबोधले जाते.
देव दीपावली
देव दीपावली Dainik Gomantak

सणांची राणी दीपावली! दीपावली नावातच दीपपूजन हा या सणाचा मुख्य विचार असल्याचे संकेत स्पष्ट होतात. दीपावली एकाच दिवसाचा आनंद घेऊन येत नाही तर अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयापर्यंत रांगोळ्यांचे चमकदार ठिपके मांडल्याप्रमाणे ती त्या दरम्यानचे प्रत्येक दिवस साजरा करत जाते. रंक-रावाच्या उंबरठ्यावर ती अशी सतेज येऊन उभी राहते.

एखादी शुभ तिथी तसेच एखाद्या पौराणिक कथेचा संदर्भ हा भारतीय सणाचा मूलाधार आहे. दीपावलीच्या दिवसात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक एक पौराणिक कथा जोडलेली दिसून येते. कार्तिकातल्या एकादशीपासून चातुर्मास उर्फ पावसाळा संपतो व चातुर्मासामध्ये खाद्यपदार्थांवर घातलेली बंधनेपण शिथिल होतात. दुसरे दिवशी द्वादशी. या दिवाळीला देव दीपावली तर गोव्यात ‘व्हडली दिवाळी’ असे संबोधले जाते.

देव दीपावली
Diwali Festival: दीपोत्सव म्हणजे आकाशगंगेचा उत्सव

हा दिवस पतिव्रता वृंदा हिच्या स्मृतीसाठी पाळला जातो अशीही एक पौराणिक कथा प्रचलित आहे. तिचा पती जालंधर हा महाप्रतापी दैत्य. वृंदेचे पातिव्रत्य जोवर अभंग असेल तोवर त्याला मरण नाही असा त्याला वर होता. अखेर देवादिकांच्या कल्याणासाठी श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन तिचे पातिव्रत्य भंग केले. परपुरुषाचा तिला स्पर्श होताच जालंदराचे रक्षक कवच नष्ट होऊन तो मरण पावला आणि दु:खी वृंदा सती गेली.

विचार केल्यास ही कथा दुःखदायक आणि अपमानकारक. श्रीविष्णूच्या चारित्र्याला यात डाग लागल्याने तोही कष्टी झाला होता. तिच्या चितेजवळ तो दु:खमग्न बसून राहिला मग त्याजागी देवानी तुळशीचे रोप रोवले. तुळस औषधीयुक्त, सावळी, गुणसंपन्न अशा प्रकारची असल्याने श्रीविष्णूला ती फार आवडू लागली. वृंदेला पुनर्जन्म मिळतो रुक्मिणीच्या रूपात. श्रीकृष्ण हा तर श्रीविष्णूचा पूर्णावतार. वृंदेवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी कृष्णरुपी श्रीविष्णू रुक्मिणीशी म्हणजे वृंदेशी विवाह करतो. हा विवाह द्वादशीस झाला. त्याची प्रतीकात्मक आठवण म्हणून तुळशीच्या विवाह कृष्णमूर्तीशी लावण्याची प्रथा सुरू झाली. काही ठिकाणी तुळशीचा विवाह कृष्णमूर्तींशी लावतात. काही ठिकाणी, विशेषत: गोव्यात तसेच कोकणात, ‘दिंड्यांची’ तुळशीचा विवाह लावण्याची प्रथा आहे. त्या निमित्ताने तुळशीवृंदावनाला रंगरंगोटी करून आणि फुलामाळानी शृंगारून नवं रूप दिलं जातं. काही ठिकाणी तिला हिरवं वस्त्र परिधान केले जाते. बोर, चिंचा, आवळे असा गावरान मेवा तिच्या दिमतीला असतो. तुळशीला कन्या मानून तिचे कन्यादान करण्याची भावनाही यात आहे.

देव दीपावली
ऑल अबाउट ‘वारसा’

दिवाळीला टांगलेला आकाश कंदील तुळशीच्या लग्नाचा पण साक्षी होतो. याप्रसंगी पणत्यांची शोभिवंत आरासही केली जाते. सुवासिनी तुळशीसमोर भक्तिभावाने तेलात बुडवलेली कापसाची जोडवी (वाती) लावतात. या सणांमध्ये तुळशीवृंदावनासमोर एक दीप (समई) ठेवतात. विवाह मंगल कार्याचा तो दैवी साक्षीदीप असतो.

तुळशीच्या लग्नानंतरच मग लग्नसराईला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. पावसाळा संपलेला असतो. लग्नकार्यांचे मुहूर्त शोधून काढले जातात. तुळशीचं लग्न झालं, आता तुमच्याही लग्नाच्या तयारीला लागा अशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे घरातले जाणते विवाहोत्सुक तरुण-तरुणींना आठवण करून देतात. यातही तुळशीविवाहाचे महात्म्य आहे हेही खरंच.

- नारायण महाले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com