कोरोनाची अशीही किमया...३० वर्षांनंतर पुन्हा भेटले दुरावलेले मित्र

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

महाविद्यालयीन जीवन म्हणजे मयूरपंख लाभलेले दिवस. त्या दिवसात मैत्री होते, मतभेद होतात पण सारे काही नंतर विसरले जाते. जिवाला जीव देणारेही नंतर जीवनाच्या प्रवाहात कुठेतरी गडप होतात.

पणजी : महाविद्यालयीन जीवन म्हणजे मयूरपंख लाभलेले दिवस. त्या दिवसात मैत्री होते, मतभेद होतात पण सारे काही नंतर विसरले जाते. जिवाला जीव देणारेही नंतर जीवनाच्या प्रवाहात कुठेतरी गडप होतात. वर्षानुवर्षे संपर्क राहत नाही, कोविड महामारीच्या काळात सारे जग ऑनलाइन झाल्यावर त्यातील एकेक करून सारे संपर्कात येतात. समाज माध्यमांवर पुन्हा दोस्ती फुलते आणि ते एकत्र येण्याचा निर्णय घेतात.

कोणत्याही चित्रपटात शोभेल अशी ही कथा प्रत्यक्षात साकारली गेली आहे. वेर्णा येथील फादर आग्नेल तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन १९८८ मध्ये नोकरी, व्यावसायानिमित्त देश-विदेशखात विखुरलेले विद्यार्थी कोविड महामारीच्या काळात ऑनलाइन संपर्काच्या माध्यमातून समाज माध्यम मंचावर एकत्र आले. त्यांनी प्रत्यक्ष भेटायचे ठरवले आणि ते प्रत्यक्षातही आणले. कोविड महामारीच्या काळात अनेकांना कटू अनुभव आले असतील, पण या विद्यार्थ्यांना मात्र समाज माध्यमांवरील संदेशांची देवाणघेवाण एकत्रीकरणासाठी उपयुक्त ठरली आहे.

महाविद्यालयीन जीवन मागे सोडून ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी महाविद्यालयीन जगतातील त्यांच्या आठवणी अगदी ते प्रसंग कालच घडल्यासारख्या ताज्या होत्या. त्या कडू गोड आठवणी त्यांनी जागवल्या, दिवस एकत्र मौज मजेत घालवला आणि वर्षातून एकदा तरी भेटण्याचे नक्की करत त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. समाज माध्यमांवर संपर्कात राहण्याच्या अभिवचनासोबतच.

संबंधित बातम्या