Diwali Festival: दीपोत्सव म्हणजे आकाशगंगेचा उत्सव

दिवाळी अमावास्येला येते हा योगायोग नसून त्यामागे अत्यंत स्पष्ट खगोलशास्त्रीय व पर्यावरणीय कारणे आहेत.
Diwali Festival: दीपोत्सव म्हणजे आकाशगंगेचा उत्सव
Divali Festival: दीपोत्सव म्हणजे आकाशगंगेचा उत्सवDainik Gomantak

मानवांना डोक्यावर आकाशात हे काय पसरले आहे, तेच कळत नव्हते. पण, हे कुणीतरी अज्ञात, अगम्य महान शक्तीने लावलेले मिणमिणते दीपक असावेत, अशी अंतस्थ जाणीवही त्यांना झाली असणार. आकाशातील विशिष्ट तारकासमूहांच्या रचना पाहून जसे काल्पनिक आकार तयार झाले व 12 राशींना मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या वगैरे नावे दिली गेली, त्याचप्रमाणे ह्या विस्तीर्ण झगमगत्या पट्ट्यांचे गूढ होते. जेव्हा मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या मातीपासून (टेराकोटा) पणत्या, दिवे उत्पादित करण्याची परंपरा सुरू झाली तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीय उपखंडात दीपोत्सवाची दैदीप्यमान परंपरा सुरू झाली. दिवाळी अमावास्येला येते हा योगायोग नव्हे. त्यामागे अत्यंत स्पष्ट खगोलशास्त्रीय व पर्यावरणीय कारणे आहेत.

जशी कोजागिरी पौर्णिमा हे मोसमी पावसाळा संपल्यानंतरचे पहिले खरे पूर्ण व भव्य चंद्रदर्शन असते त्याचप्रमाणे कोजागिरीनंतर पंधरवड्याने येणारी काळीकुट्ट अमावस्या सूचीत करीत असते की संपला एकदाचा नैऋत्येकडचा मोसमी पावसाळा. हवा धुऊन स्वच्छ झाली. वातावरणातील प्रदूषण कमी झाले. दृश्यमानता म्हणजे दिवसा व रात्रीची व्हिजिबिलिटी वाढली. त्यामुळे फार दूरवरचे स्पष्ट साध्या डोळ्यांना दिसू लागले. सगळीकडे विद्युत्दीपांचा, पथदीपांचा झगमगाट होण्यापूर्वी आपल्याकडे दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री सगळा मिट्ट अंधार असायचा. अशा अंधाऱ्या अमावास्येला जर मध्यरात्री वा पहाटे झुंजुमुंंजू होण्यापूर्वी आपली नजर आकाशाकडे गेली तर छाती दडपून जाई. अबब, क्षितीजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला आपल्या आकाशगंगेचा दुधाळ, शुभ्र पट्टा दिसे. आज इंटरनेटवर आकाशगंगेची पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून घेतलेली लाखो चित्रे उपलब्ध आहेत. पण, दिवाळीच्या अमावास्येला हे सर्व अलौकिक बघताना प्राचीन मानवसमूहांना काय वाटले असेल ह्याची कल्पना मी करीत होतो. त्यांच्या त्या दिव्य आत्मसाक्षात्कारी ब्रग्मांडनेणिवेचे रूपांतर नंतर दीपोत्सवात झाले. नभस्थ ज्योतींना नमन करण्याचाच उद्देश त्यामागे होता. दीपोत्सवाचे मूळ प्राचीन भारतीय खगोलपूजनात आहे असे माझे संशोधन आहे. ह्यासंबंधी थेट काहीही लिखित पुरावा नसला, तरी संपूर्ण भारतीय उपखंडात जिथे जिथे कोट्यवधी पणत्या पेटविल्या जातात त्यामागे आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांशी स्पर्धा करण्याचा प्रातिनिधिक उद्देश असावा. त्यामुळेच दिवाळी कधीही पौर्णिमेच्या शुभ्र रात्री येणार नाही.

दीपोत्सवाला काळी कुळकुळीत अमावास्याच हवी. आकाशगंगेचे प्रतीक मागे पडून कालांतराने अनेक दंतकथा, आख्यायिका तयार झाल्या खऱ्या, पण ज्यांनी आयुष्यात किमान एकदातरी दिवाळीच्या अमावास्येला रात्री आकाशगंगेचे डोळे भरून डोळे विस्फारून दर्शन घेतले असेल त्यांच्या लक्षात येईल की खरोखरीच नक्षत्रांगणातील ताऱ्यांशी स्पर्धा करणारा भारतीयांचा दीपोत्सव आहे व तो भारतीय ऊर्जा व प्रकाशतेज संस्कृती स्वीकारलेल्या सर्वच हिंदू, बौध्द, जैन व शीख धर्मियांकडून उत्साहाने साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी कला अकादमीच्या दर्यासंगम परिसरात ‘लोकोत्सव’ ह्या कार्यक्रमाच्या जोडीने कलाकार व कलावस्तूंचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात पोखरण, राजस्थानचा एक कुशल कुंभार भेटला. ह्याचे गाव पूर्वी सिंधु - सरस्वती संस्कृती म्हणजे मोहेंजोदोरो- हडाप्पा संस्कृतीच्या परिसरात होते. मी त्याची कला पाहून चकीत झालो. कारण, अजूनही पाच हजार वर्षांपूर्वीचे तेच नमुने, तीच भांडी, त्याच पणत्या, दिवे, पात्रे वगैरे तयार करून त्याने मांडली होती. मला आश्चर्य वाटले ते पणत्यांचा आकार पाहून. उत्खननातसुध्दा अशाच पणत्या व दिवे सापडले होते. दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात मी ते पाहिले होते. बिचाऱ्या त्या कुंभाराला हा काहीच पूर्वेतिहास ठाऊक नव्हता. पूर्वपरंपरेने 200 पिढ्या चालत आलेले काम तो इमानेइतबारे करत होता. अशा अनंत प्राचीन परंपरा भारतात टिकून आहेत त्यातील आकाशगंगा पूजनोत्सवाची म्हणजे दीपोत्सवाची खूप प्राचीन परंपरा आहे.

देवदैवतांच्या, मूर्तिपूजेच्या जन्मानंतर लोक दीपोत्सवाचे मूळ कारणच विसरून गेले असावेत. खेडेगावातील लोक सोडले तर भारतातील नागरी परिसरात, दिव्यांनी उजळलेल्या एकाही शहरात आकाशगंगेचे दर्शन शक्य नाही त्यामुळे शहरी लोकांना दीपोत्सवाचा-आकाशगंगा पूजनाकडे असलेला संबंध समजणार नाही. प्रकाशाचा वेग दर सेकंदामागे तीन लाख किलोमीटर्स असतो. एका वर्षात किती सेकंद असतात त्याचा हिशेब करा म्हणजे एक प्रकाश वर्ष म्हणजे किती प्रचंड अंतर ते कळेल. आता आपण आपल्या आकाशगंगेकडे वळूया. हिचा जन्म 10 अब्ज वर्षापूर्वी आला. तिचा विस्तार आहे, तब्बल एक लाख प्रकाशवर्षे. ह्या आकाशगंगेत दोनशे अब्ज तारे असल्याचा अंदाज आहे. ह्या दोनशे अब्ज ताऱ्यांतील एक मामुली तारा आहे आपला सूर्य. वय पाच अब्ज वर्षे आणि सौरमालेचे आपले लटांबर घेऊन आपला सूर्य आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती दर 22 कोटी वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आपल्या सूर्याच्या जन्मापासून आकाशगंगा केंद्राभोवती 22 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आहेत. 23 वी चालू आहे. प्रत्येक प्रदक्षिणेत आपण आकाशगंगेच्या वेगवेगळ्या विभागात असतो. त्यामुळे नवेनवे तारकापुंज रात्रीच्या आकाशात दिसतात.

आता दीपोत्सव पणत्या, दिवे, आकाशकंदील वगैरे लावून साजऱ्या करणाऱ्या सामान्य माणसाला त्याचे ब्रम्हांडातील स्थान व आकाशगंगेचे महत्त्व कसे काय कळणार? काहीतरी फार फार अगडबंब, तेजपुंज आकाशात रात्री दिसते व ते काय आहे ते समजत नाही एवढीच त्याची धारणा असते. त्यामुळे आपण हे दिवे वगैरे कशासाठी लावतो त्याचाही तो सखोल विचार करून स्वतःला आकाशगंगेशी व पर्यायाने संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडून घेत नाही. जवळजवळ सर्वच धर्म, धर्मगुरु, धर्ममार्तंड, आध्यात्मिक गुरुंनीही आकाशगंगेपासून फारकत घेतली आहे व त्याचा त्यांना फायदा आहे. आकाशगंगा हे काय प्रकरण आहे हे निष्पाप बालबोध मनाला कसे समजणार? तो एक वेगळा अनुभव असतो. मला हा अनुभव वयाच्या आठव्या वर्षी दिवाळीच्या पहाटेच आला. आजही 55 वर्षांनी मी ते दृश्य विसरलेलो नाही. त्यावेळी गावात वीज आलेली नव्हती पण सरकारकडून पहाटे दुधाच्या बाटल्या विकण्याची सोय करण्यात आली होती.

सकाळी साडेपाच ते सात दरम्यान दुग्धविक्री केंद्रावर ‘टोकन’ व रिकाम्या बाटल्या दिल्यावर नव्या बाटल्या मिळायच्या. फार वेळ रांगेत उभे राहू नये म्हणून पहाटेच पेंगुळलेल्या अवस्थेत मी असताना माझ्या आईने रिकाम्या बाटल्या, पिशवी, टोकन व पैसे देऊन दुग्धविक्री केंद्रावरून दूध आणण्यासाठी मला पिटाळले. जवळजवळ दीड किलोमीटर्स चालावे लागायचे. तोंड धुऊन मी निघालो. रस्त्यात गुडुप्प अंधार. कुत्री भुंकत होती. हवेत खूप गारवा होता. आठ वर्षाच्या मुलाच्या मनात दिवाळीच्या सकाळच्या फराळाचे सोडून आणखी काय विचार असणार? आईने गरमागरम तळलेल्या पुऱ्या व खमंग बटाट्याच्या भाजीचा बेत केला होता. तेच चित्र डोळ्यासमोर येत असताना मी एका मोकळ्या जागेत पोहोचलो व अचानक माझी नजर डोक्यावरच्या आकाशाकडे गेली. आकाशगंगेचा तो लुकलुकणारा, दिव्य झळाळता पट्टा बराच वेळ थांबून अनिमिषपणे मी बघतच राहिलो. अनंताची ती एक दिव्य अनुभूती होती.

Divali Festival: दीपोत्सव म्हणजे आकाशगंगेचा उत्सव
चैतन्यमयी मैफल

तो एक आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार होता. त्या वयातही मला एकाएकी माझ्या नगण्यपणाची जाणीव झाली. दुधाच्या बाटल्या घेऊन एका तंद्रीतच मी घरी पोहोचलो तेव्हा उजाडू लागले होते. नंतर खगोलशास्त्र व आकाशगंगेचे खूप ज्ञान मिळवले पण दीपोत्सव म्हणजे आकाशंगेचा उत्सव हे सिध्द झाले.

- डॉ. नंदकूमार कामत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com