Piles Symptoms: मूळव्याधीची मुख्य लक्षणे तुम्हाला माहितीयेत का?

बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला त्याची लक्षणे जाणवत नाहीत.
Piles Symptoms
Piles SymptomsDainik Gomantak

मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला कोंब आणि हा कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. तसेच हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात.

बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला त्याची लक्षणे जाणवत नाहीत. लक्षणे जाणवत असल्यास बहुतेक वेळा ती खालील स्वरूपामध्ये असतात –

शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.

गुदद्वाराजवळ खाज

गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आतमध्ये ढकलावा लागू शकतो. (Piles Symptoms)

Piles Symptoms
Locket Tips: लॉकेट गळ्यात घालण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी

मूळव्याध होण्याची कारणे:

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे जरा कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की मुळव्याधाचा त्रास होतो आणि बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारामध्ये तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –

वाढलेले वजन

45 वर्षांपेक्षा जास्त वय

गर्भावस्था

अनुवांशिकता

मूळव्याधीची लक्षणे बरेचदा उपचाराशिवायही काही दिवसामध्ये बरी होतात. गर्भावस्थेदरम्यान झालेला मूळव्याध बाळाच्या जन्मा नंतर बरा होतो. परंतु गुदद्वाराच्या जवळ आणि आत असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये खालील बदल करणे आवश्यक आहे .

आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणे –

फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ हे तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.

भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे आणि मद्यपान देखील टाळावे.

शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करू नये असे केल्यामुळे शौच अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.

काही औषधांमुळे बद्धकोष्ठ होतो आणि अशी औषधे घेणे शक्यतो टाळावीत.

वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा यामुळे बद्धकोष्ठ टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते.

या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेले मलम गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते.

जर आपली लक्षणे जास्त गंभीर असतील तर त्यावरील उपचारांसाठी बरेच पर्याय आहेत.

मूळव्याधीची मुख्य लक्षणे:

बहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसामध्ये बरी होतात. काही लोकांना लक्षणे न जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत आहे हे देखील समजलेले नसते.

परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात –

शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.

गुदद्वाराजवळ खाज

गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आतमध्ये ढकलावा लागू शकतो

शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे

गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे

मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्याशिवाय किंवा थांबल्याशिवाय मूळव्याध दुखत नाही.

Piles Symptoms
Skin Care: उजळ त्वचेसाठी दही उपयुक्त

मूळव्याध होण्याची कारणे खालीलप्रमाणे:

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते तसेच गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि त्याला सुज देखील येते.

मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –

अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा

आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ उद्भवणे.

दीर्घकालीन जुलाब

सतत जड वस्तू उचलणे

सतत खोकला किंवा वारंवार उलट्या

बैठी जीवनशैली

गर्भावस्था – बाळाच्या जन्मानंतर बरेचदा रक्तस्त्राव थांबतो.

45 वर्षापेक्षा जास्त वय – जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका देखील वाढतो.

अनुवंशिकतामूळव्याधीचे निदान:

आपल्या गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करत असतात.

गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी:

प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस काही मूळव्याधीचे कोंब आहेत का हे तपासत असतात आणि त्यानंतर आतील बाजू तपासली जाते. या तपासणीला DRE (Digital Rectal Examination) असे म्हणतात.

प्रोक्टोस्कोपी:

काही वेळा प्रोक्टोस्कोप वापरुन पुढील आंतरिक तपासणी करणे देखील आवश्यक असते. प्रोक्टोस्कोप ही एक पोकळ नळी असते तर प्रोक्टोस्कोप रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आतमध्ये घातला जातो त्यामुळे आतील भागाची तपासणी करता येते.

कोलोनोस्कोपी:

काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्याचा इतर काही त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला कोलोनोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीचा सल्ला देखील देऊ शकतात.

मूळव्याधीचे प्रकार:

गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपीनंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारची मूळव्याध आहे हे सांगतात.

पहिली पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली लहान सूज / कोंब ही सूज बाहेरून दिसत नाही.

दुसरी पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली थोडी मोठी सूज / कोंब शौचाच्या वेळी ही सूज बाहेर येत असते.

तिसरी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक लहान गाठी या गाठी पुन्हा आत ढकलता येतात.

चौथी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक थोड्या मोठ्या गाठी पुन्हा आतमध्ये ढकलता येत नाहीत.

मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे उपचारासाठी खूप आवश्यक आहे.

मूळव्याधीवरील उपचार:

मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होतो परंतु गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहेत.

आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न करणे हे सर्वप्रथम सांगितले जाते.

आहारातील बदल व स्वतः काळजी घेणे

आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे आणि यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागणार नाही.

शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –

शौचाच्या वेळी कुंथू नये तसेच जोर करु नये.

शौचानंतर मऊ toilet paper चा वापर करावा.

शौचानंतरची स्वच्छता ही हळुवारपणे करावी.

औषधोपचार:

Corticosteroid cream:

आपल्या गुदद्वाराच्या आत आणि त्याभोवती खूप सूज असेल तर डॉक्टर आपल्याला तिथे लावण्यासाठी स्टेरॉईड असलेले मलम लावण्यासाठी देऊ शकतात.

वेदनाशामक औषधे:

Paracetamol सारखी नेहमी वापरली जाणारी वेदनाशामक औषधे मूळव्याधीचे दुखणे पण कमी करू शकतात परंतु कोडीन (Codein) असलेल्या औषधांमुळे बद्धकोष्ठ होते त्यामुळे ही औषधांचा वापर करू नये. खूप दुखणाऱ्या मूळव्याधीसाठी डॉक्टर ती जागा तात्पुरती बधीर करणारी मलमे लावायला देखील सांगू शकतात. बद्धकोष्ठ असेल तर डॉक्टर रेचक, या औषधांमुळे पोट साफ व्हायला मदत होते हे देखील देऊ शकतात.

शस्त्रक्रियेविना उपचार:

आहारात बदल करून व औषधोपचार करूनदेखील मूळव्याधीच्या त्रासात जर काही फरक पडत नसेल तर आपले डॉक्टर बँडिंग किंवा स्क्लेरोथेरपीसारखे शस्त्रक्रियेविना असलेले उपचार करण्याचा सल्ला देतात.

बँडिंग:

या प्रक्रियेमध्ये मूळव्याधीच्या मुळाशी बँड लावून कोंबाचा रक्तप्रवाह बंद करण्यात येतो आणि यामुळे काही दिवसांत कोंब गळून पडतो.

इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी):

बँडिंगला पर्याय म्हणून स्क्लेरोथेरपी ही उपचारपद्धती देखील डॉक्टर वापरतात. या प्रक्रियेमध्ये गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमध्ये एक रसायन सोडतात यामुळे इंजेक्शन दिलेल्या जागेजवळील मज्जातंतू बधीर होतात आणि दुखणे कमी होते. मूळव्याधीचा कोंब कठीण होऊन तिथे व्रण तयार होतो पण साधारणपणे 4 ते 6 आठवड्यात कोंबाचा आकार कमी होतो.

मूळव्याधीची शस्त्रक्रिया:

इतर कोणत्याही उपचारांनी फरक पडत नसेल किंवा रुग्णाच्या मूळव्याधीचा प्रकार इतर उपचारांसाठी योग्य नसेल तर डॉक्टर रुग्णाला मूळव्याधीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत असतात. मूळव्याधीची शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याध काढून टाकला जाते. यासाठी संपूर्ण किंवा कमरेखालच्या भागाला भूल देण्यात येते. पारंपरिक शस्त्रक्रियेत गुदद्वार हळुवारपणे उघडले जाते आणि मूळव्याधीचा कोंब कापून काढण्यात येतो.

एक आठवड्यात रुग्ण पूर्ववत होऊ शकतो पण पुन्हा मूळव्याधीचा त्रास उद्भवण्याची शक्यता 5% असते. शस्त्रक्रियेविना केलेल्या उपचारांमध्ये ही शक्यता जास्त असते मात्र पुन्हा त्रास उद्भवू नये म्हणून आहारात केलेले बदल उदा: तंतुमय पदार्थ जास्त खाणे तसेच चालू ठेवणे यामध्ये फायद्याचे ठरते. Transanal haemorrhoidal dearterialisation (THD) or haemorrhoidal artery ligation (HALO) – या शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा कमी करण्यात येतो. यासाठी संपूर्ण भूल देण्यात येतो आमि या प्रक्रियेमध्ये Doppler ultrasound probe जोडलेले एक छोटे उपकरण गुदद्वारातून आत सारले जाते. यामुळे मूळव्याधीचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या शोधण्यासाठी मदत होते.

Stapler Haemorroidectomy:

Stapler Haemorroidectomy ही शस्त्रक्रिया पारंपरिक शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून वापरली जाते. ही शस्त्रक्रिया संपूर्ण शरिराला भूल देऊन केली जाते. गुदद्वाराबाहेर लटकणाऱ्या मूळव्याधीच्या कोंबांसाठीदेखील ही शस्त्रक्रिया केली जाते. बऱ्याच लोकांना या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा दुसरा मूळव्याधीचा कोंब बाहेर लटकण्याचा त्रास होतो मात्र पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये हे प्रमाण कमी दिसून येते. इतर उपचारपद्धतींपेक्षा या शस्त्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यता थोडी जास्त असते आणि त्यामुळे ही उपचार पद्धत पूर्वीपेक्षा थोडी कमी प्रचलित आहे. काही वेळा स्त्रियांमध्ये fistula to vagina (गुदाशय व योनीमार्ग जोडले जाणे) किंवा rectal perforation (गुदाशयाला भोक पडणे) यासारखी गंभीर गुंतागुंत झालेली देखील यामध्ये दिसून येते.

मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेतील धोके:

मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेनंतर गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता खूप कमी असली तरी काही धोके उद्धभवू शकतात –

रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या पडणे

जंतुसंसर्ग व त्यामुळे पू किंवा गळू तयार होणे

लघवी पूर्ण साफ न होणे

शौचावर ताबा न राहणे

गुदद्वारापासून त्वचेपर्यंत अनैसर्गिक मार्ग तयार होणे

गुदद्वार अरुंद होणे

मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च –

मूळव्याधीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो

खोलीचा प्रकार (Private room, semi -private room, general ward)

शस्त्रक्रियेचा प्रकार (पारंपरिक शस्त्रक्रिया / Stapler haemorroidectomy)

हॉस्पिटलची निवड इ. रुग्णाला आधी असणारे आजार उदा. मधुमेह, हृदयविकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गंभीर देखरेख आवश्यक असेल तर हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी व पर्यायाने खर्च देखील वाढू शकतो.

फिशर / गुदद्वाराजवळ जखम होणे

फिशर म्हणजे काय?

फिशर म्हणजे गुदद्वाराच्या खालच्या बाजूला त्वचेजवळ जखम होणे. कठीण शौच असेल तर गुदाशयाच्या आतील नाजूक आवरणावर दाब पडून किंवा पातळ शौचाच्या वेळी जोर केल्यामुळे फिशर होत असतो.

फिशरची लक्षणे कोणती आहेत?

वेदना:

रुग्णाला शौचाच्या वेळी व शौचानंतर वेदना होणे. फिशरच्या वेदना अतिशय तीव्र असतात आणि या वेदना काही मिनिटे ते काही तासांपर्यंत उद्भवू शकतात. गुदद्वाराच्या भोवती गोलाकार असलेले स्नायू आकुंचन पावल्यामुळे या वेदना होत असतात. या वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाच्या शौचाला जाण्याची भीती वाटू लागते आणि त्यामुळे बरेच रुग्ण शौचाला जाण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु यामुळे बद्धकोष्ठ होऊन शौच कठीण होते आणि आणखी वेदना होतात.

रक्तस्त्राव:

शौचाच्या वेळी त्या जखमेतून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

अतिरिक्त त्वचा:

काही वेळा फिशरजवळ किंवा त्याभोवती सूज येऊन अतिरिक्त त्वचा तयार होते व लटकू लागते आणि बरेचदा यातून चिकट स्त्राव येतो व त्यामुळे त्वचा खरचटल्यासारखे होते व खाज सुटते.

उपचार:

शस्त्रक्रियेविना उपचार:

तंतुमय पदार्थ खाणे: आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश केल्याने शौच सुलभ होण्यास मदत होते.

भरपूर पाणी पिणे:

रोज सुमारे 2 ते 2.5 लि. पाणी पिणे आवश्यक आहे.

औषधे:

शौच करण्या आधी व नंतर शौचाची जागा तात्पुरती बधिर करणारी मलमे लावल्यामुळे शौचाच्या वेळी वेदना होत नाहीत तसेच गुदद्वाराभोवतीच्या स्नायूंचे आकुंचन कमी करण्यासाठी तसेच सूज कमी करण्यासाठी आपले डॉक्टर ही मलमे लावण्यास सांगू शकतात.

शस्त्रक्रिया:

वर सांगितलेले उपचार करूनदेखील फिशर बरे होत नसतील तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते आणि या शस्त्रक्रियेला Lateral Sphincterectomy असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी आहे फक्त 20% लोकांमध्ये वात सरण्याच्या क्षमतेत थोडा फरक होऊ शकतो. काही लोकांचा शौचावरील ताबा किंचित कमी देखील होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com