उतरव इथे... माथ्यावरचे ओझे!

‘दवरणे!’ जिथे पाठीवरचे, डोक्यावरचे किंवा हातातले ओझे अलगद उतरवायची सोय असते.
उतरव इथे... माथ्यावरचे ओझे!
उतरव इथे... माथ्यावरचे ओझे!Dainik Gomantak

गोव्याच्या (Goa) ग्रामीण भागातून रस्त्यावरून (Road) जाताना रस्त्याच्या कडेला अनेकदा चिऱ्यांच्या दगडांची (Stone) एका प्रकारची भक्कम रचना दिसते. प्राचिन काळच्या आपल्या दळणवळणाची ही रचना म्हणजे महत्त्वाचा हिस्सा आहे याची जाणिवही आपल्या गाडीतून सुखाने प्रवास (Travel) करताना आपल्याला होत नाही. पण जुन्या काळात दगडांची ती रचना म्हणजे माथ्यावर ओझे वाहून दूरवर पायी चालणाऱ्यांसाठी एक विसाव्याचे ठिकाण होते. मैलोगणिक चालून थकलेला जीव आसुसलेल्या डोळ्यांनी त्या विसाव्याच्या ठिकाणाची प्रतिक्षा करत चालायचा आणि मग दूरवरून ते ठिकाणी दिसले रे दिसले, हुश्‍श करुन मनात म्हणायचा,‘आयले रे दवरणे’!’

‘दवरणे!’ जिथे पाठीवरचे, डोक्यावरचे किंवा हातातले ओझे अलगद उतरवायची सोय असते. ओझे मागच्या मागे उतरवायचे आणि माथ्यावरच्या झाडाच्या सावलीखाली दवरण्याच्या एका बाजूला हलक्याने पाठ टेकवत श्र्वास मोकळे करायचे, थोडा दम खायचा, थोडा ताजेतवानेपणा अंगात भरून आला की पुन्हा वाटेला पायाखाली घ्यायचे. ‘दवरणे’ ही त्याकाळच्या व्यवस्थेने पांथस्थांसाठी वाटेवर केलेली एक सुखद सोय होती. ‘दवरणे’ जर चाररस्त्यावर असले तर मग इकडून - तिकडून येऊन तिथे अंग मोकळे करत बसलेले, आपले मनही चारचौघात मोकळे करायचे. दवरण्यावर कानी आलेल्या वार्ता चार दिशांनी जायच्या.

उतरव इथे... माथ्यावरचे ओझे!
गोव्याच्या ‘शीत कढी’ला मिळणार GI नामांकन

‘दवरणे’ हे नाव देखील अप्रुपाचे. ज्यावर ‘दवरतात’ ते दवरणे. दवरणे म्हणजे एक प्रकारचा चौथराच, ज्यावर एकाचवेळी चार-पाच गाठोडी सहज मावायची. दवरणी बांधताना त्या काळच्या जाण्ट्यांनी त्या स्थळाचा नीट अभ्यासही केलेला असायचा. सावली मिळेल, कोरडा पडलेल्या घश्‍यासाठी जवळच पाण्याचा स्त्रोत असेल अशा साध्या- साध्या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर ‘दवरणे’ खऱ्याखुऱ्या विसाव्याच्या जागा बनायच्या. वाटसरूंना तिथे बसावेसे वाटायचे.

काहीवेळा दवरण्यापाशी एखाद्या वाटसरूला रात्रही सारावी लागायची. अशावेळी मग दवरण्यासमोर जाळही पेटायचा. आगीच्या त्या धगीत आणि उबेत ‘दरवणे’ मग त्या वाटसरूला रात्र जागवीत धीर द्यायचे. वाटसरूंना दवरण्याच्या माथ्यावर सावली देत असलेल्या महाकाय वृक्षात देवही दिसायचा. तो त्या झाडाखाली एखादी विडी किंवा भाकरतुकडा ठेऊन त्या ठिकाणाबद्दल आपला भक्तिभाव व्यक्त करायचा. वर्षे लोटल्यानंतर त्या ठिकाणालाही मग देवत्व यायचे.

उतरव इथे... माथ्यावरचे ओझे!
Travel Tips: जर तुम्ही विमानाने प्रथमच प्रवास करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

आज काळ बदललाय. गाड्या मोटारीतून ये-जा सुरू झाली आणि दवरण्याच्या कपारीमधून उगवणाऱ्या नादान रोपट्यांनी एकेक चिरा निखळायला सुरुवात केली. मोटारीत बसून जाताना कधीकाळी आपल्या माथ्यावरचे ओझे सुसह्य केलेल्या त्या दवरण्याकडे जेव्हा आपली नजर देखील वळेनाशी झाली तेव्हा दरवणे अधिकच खचले.

खरं म्हणजे लौकिकार्थाने माणसाच्या डोक्यावरचे ओझे अजून उतरलेले नाही. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे. ओझे अधिक चिरंतन झालेले आहे आणि माणूस आकांताने आपले नवे ‘दवरणे’ शोधतो आहे. प्रवास चालूच आहे. ‘दवरणे’ सापडेल काय ?

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com