लॉकडाऊनकाळात 500 हातांना रोजगार

Dainik Gomantak
रविवार, 7 जून 2020

कांदिवली पूर्व येथील महिंद्रा ट्रॅक्‍टर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती

कांदिवली

कांदिवली पूर्व येथील महिंद्रा ट्रॅक्‍टर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आल्याने सुमारे 500 तरुणांच्या हाताला काम मिळाले. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही तरुणांना महिंद्रासारख्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाल्याने तरुणांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
महिंद्रा ट्रॅक्‍टर कंपनीमध्ये मार्च 2020 पासूनच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 50 टक्के कर्मचारी कार्यरत होते. 23 मार्चपासून केंद्राने लॉकडाऊन घोषित केल्याने अतिमहत्त्वाच्या सेवा सोडून संपूर्ण उत्पादन पूर्णतः बंद केले; मात्र बाजारात ट्रॅक्‍टरची मागणी वाढल्याने तसेच इतर राज्यांतील महिंद्रा कारखान्यांत उत्पादनासाठी मुंबईतून माल जात असल्याने 7 मेपासून हळूहळू उत्पादन सुरू करण्यात आले. शारीरिक व्याधी, आजार असलेल्या कामगारांना घरीच बसवून पगार दिला जात आहे. अशा स्थितीत तरुण मुलांची आयटीआय, डिप्लोमा, डिग्री, खासगी कोर्स आणि 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना कंपनीने मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. कोरोनासारख्या वैश्‍विक महामारीमुळे लॉकडाऊन काळातही रोजगार मिळाल्याने तरुणांकडून आपल्याला कोरोना पावल्याचे बोलले जात आहे.

तरुणांना शिक्षणानुसार पगार
शिक्षणानुसार 12 ते 15 हजार पगार मिळणार असल्याने आम्ही भाग्यवान आहोत. आनंद महिंद्रा यांना भारत सरकारने 2020 चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. लॉकडाऊन काळात तरुणांना काम देऊन आपल्या कार्यात अजून एक मानाचा तुरा रोवला असल्याची प्रतिक्रिया काही तरुणांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या