योगसाधना: ताडासनाचे शरीराला अनेक फायदे

योगसाधना: ताडासनाचे शरीराला अनेक फायदे
Tadasana

सकाळी झोपेतून उठल्यानंतर थेट आधी मोबाईल बघण्यापेक्षा किंवा कुठल्या कामाला सुरुवात करण्यापेक्षा जर काही मिनिटे योगासने केली तर त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याला भरपूर लाभ मिळेल. पर्वतासन कसे करावे आणि त्याचे फायदे कोणते हे आपण कालच्या लेखात वाचले. आज आपण ताडासनामुळे शरीराला आणि मनाला होणारे फायदे कोणते, ते पाहुयात..

ताडासन करण्याची योग्य वेळ
या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर आसन करू नये. सकाळी उठल्यानंतर ताडासन केल्यास ते शरीरासाठी जास्त लाभदायक ठरते. 

ताडासन कसे करावे?
- दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून किंवा दोन्ही पायांमध्ये थोडेस अंतर ठेवून जमिनीवर किंवा योग मॅटवर सरळ उभे राहा. 
- हातांच्या बोटांची गुंफण करत श्वासोच्छवास सुरू ठेवत दोन्ही हात हळूहळू वरच्या बाजूस न्यावेत.
- आता पायांच्या टाचा वर उचला आणि पायांच्या बोटांवर उभे राहून शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. हे करत असतानाच पायांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर वरच्या बाजूस स्ट्रेच करावे.
- ताडासनाच्या या अंतिम स्थितीत आपापल्या क्षमतेनुसार राहावे. त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे. थोड्या वेळानंतर पुन्हा या आसनाचा सराव करा. 
- ताडासन करताना हात आणि पाय कधीही वाकवू नयेत. 

ताडासनाचे फायदे कोणते- 
- शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी या आसनाची फार मदत होते.
- ताडासन करताना मणक्याचा पूर्ण भाग ताणला जातो आणि सैल सोडला जातो.
- पाठीच्या मज्जातंतूंवरील ताण कमी होण्यास मदत होते.
- हाडांची वाढ योग्यरित्या होते.
- ओटीपोटातील स्नायू बळकट होतात.
- गरोदर स्त्रियांचे ओटीपोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
- हे आसन करताना स्नायू ताणले जात असल्याने लहान मुलांची उंची वाढण्यासाठीही ताडासन करण्याचा सल्ला दिला जातो.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com