दक्षिण गोव्यातील ‘गड्यांची जत्रा’ पारंपरिक उत्सव

Gadyaanchi Jatra: पैंगीणमध्ये दर तीन वर्षांनी जत्रा भरवली जाते
Gadyaanchi Jatra| Goa |South Goa
Gadyaanchi Jatra| Goa |South Goa Dainik Gomantak

आख्यायिका अशी आहे की साधारण तेराव्या शतकात श्री वेताळाने पैंग़ीण गाव जिंकून घेतले व ते आपल्या इतर बारा राज्यांना जोडले. गावकऱ्यांनी त्याला गावात शांतपणे निवास करण्याची विनंती केली. बदल्यात गावकऱ्यांनी त्याला दर तीन वर्षांनी एका जत्रेचे आयोजन करण्याचे वचन दिले. तेव्हापासून पैंगीणमध्ये दर तीन वर्षांनी जत्रा भरवली जाते. जत्रेचे नाव आहे- ‘गड्यांची जत्रा’

गावातल्या प्रत्येक पारंपरिक उत्सवामागे एक कहाणी असते. कधीकाळी गावात घडलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगातून सुलाखून निघाल्यानंतर, झालेल्या आनंद सोहळ्याच्या स्मृती वर्षानुवर्षे कृतज्ञतेने समारंभपूर्वक जपणे हा तिथल्या सांस्कृतिक संचिताचा आणि सामुदायिक भावनांचा लडिवाळ भाग असतो. गावचे हे सोहळे, जत्रा-मेळावे हीच त्या गावची ओळख असते.

आज 21 मे रोजी अशीच एक जत्रा काणकोण तालुक्यातील पैंगीण या गावात भरते आहे. पूजनीय आणि गावचे आधार दैवत असलेल्या वेताळ मंदिराभोवतीच्या मोकळ्या जागेत या जत्रेचे आयोजन होते. ही जत्रा दर तीन वर्षांनी एकदा भरते.

या तीन वर्षांचा क्रम ठरलेला आहे, गड्याची जत्रा झाल्यानंतर पुढच्या वर्षी तिथे काहीच साजरे होत नाही. त्यानंतरच्या वर्षी ‘जेवणी’ हा विधी झाल्यानंतर प्रसिद्ध ‘टका’ मिरवणुकीचे आयोजन होते. ‘टका’ हे पैंगीण आणि नजीकच्या परिसरात असलेल्या खरगाळ या गावातल्या दैवतांना निमंत्रण असते.

वेताळाचे प्रतिनिधित्व करणारा या मिरवणुकीचे नेतृत्व करतो. त्याच्या मागे दोन छत्री आणि दोन तरंगे धरून चार माणसे चालतात. ज्यांना गडे म्हटले जाते. टका हा एक कपडा असतो ज्यावर मधे वेताळ आणि त्याच्या दोन्ही बाजूला इतर देवतांच्या प्रतिमा चितारलेल्या असतात. कपड्याच्या खालच्या भागात कदंबा राजवटीचे राजचिन्ह सिंह आपले पंजे उभारलेल्या मुद्रेत दिसतो. त्यानंतर तिसऱ्या वर्षी पुन्हा गड्याच्या जत्रेची पाळी येते.

ही जत्रा आज साजरी होत असली तरी या जत्रेसंबंधातल्या विधींची सुरुवात महिन्यापूर्वीच झाली आहे. महिन्यापूर्वी एक उंच झाड तोडून ते वाजत-गाजत समारंभपूर्वक मंदिराच्या ठिकाणी आणले गेले आहे. आठ मे रोजी झालेल्या आणखी एका विधीत बांबू तोडून आणि लाकडे वापरून एका दैत्याचा पुतळा बनवून तो नंतर तीन दिवसांनी सायंकाळी नष्ट केला गेला आहे. या विधीला ‘दैत्य जागर’ असे म्हटले जाते. या विधीपूर्वी ‘पेरणी जागर’ चे सादरीकरण होते. चेहऱ्यावर मुखवटे वापरून केल्या जाणाऱ्या ‘पेरणी जागर’ या लोककलेचे ते एक प्रातिनिधिक रूप आहे.

त्यानंतर 18 मे च्या सायंकाळी ‘चोरांचा जागर’ झाला. हा विधीही कधीकाळच्या जुन्या एका घटनेची पुनरावृत्ती आहे. जत्रेच्या काळात एका विशिष्ट समुदायाला देवळाच्या परिसरात राहणे सक्तीचे होते परंतु आपली गरज भागवण्यासाठी रात्रीच्या वेळी इतरांच्या जागेत जाऊन त्यानी फळे वगैरे चोरली. या प्रसंगातून ‘चोरांचा जागर’ जन्माला आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com