Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती

म्हापशापासून पूर्वेकडे 12-13 किलोमीटरवर वसलेले बेट म्हणजे राण्यांचे जुवे.
Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती
Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती Dainik Gomantak

गोव्यात राणे घराण्याला शौर्याची मोठी परंपरा आहे, त्याबरोबरच परंपरा, चालीरीती आणि नीतिनियम जपण्यामध्येही ते पुढे आहेत. आता नव्या जमान्यात विविध कामांच्या निमित्ताने हे सारे कुटुंबीय गोवाभर पसरलेले आहेत, मात्र गणेश चतुर्थीला ही मंडळी आपल्या मूळ गावी येतात. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत चतुर्थीचे पाच दिवस गणरायाच्या संगतीमध्ये भक्तिभावाने आपले मान, मतभेद बाजूला सारून एकत्र राहतात, हेच ते चतुर्थीचे पवित्र दिवस होय.

म्हापशापासून पूर्वेकडे 12-13 किलोमीटरवर वसलेले बेट म्हणजे राण्यांचे जुवे. या बेटावर असलेल्या राण्यांच्या वाड्यावर गणपतीची स्थापना केली जाते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्व भक्तांना एक महिना आधीपासूनच लागलेले असतात. गणेश चतुर्थी हा गोव्यातील सर्वांत मोठा उत्सव आहे. गोव्यात दिवाळीपेक्षाही गणेश चतुर्थीला अधिक महत्त्व दिले जाते. काहीजणांकडे दीड दिवस, तर काही जणांकडे पाच दिवस गणपतीची स्थापना केली जाते. राण्यांच्या जुव्यावर पाच दिवस गणपतीची स्थापना केली जाते. नादोडा रेवोडा गावाजवळून वाहत असलेल्या शापोरा नदीच्या मधे हे राण्यांचे जुवे वसलेले आहे. चारही बाजूंनी संथगतीने वाहत असलेले पाणी पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. यामध्ये वसलेले छोटेसे बेट, नारळाच्या झाडांनी या बेटाच्या सौंदर्यात अधिकच भर घातलेली आहे. या बेटाची लांबी एक किलोमीटर तर रुंदी अर्धा किलोमीटर आहे. या बेटावर जाण्यासाठी आता एक पूल बांधण्यात आला आहे. पूर्वी या बेटावर जाण्यासाठी बोटीचा वापर केला जात होता.

Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती
Ganesh Chaturthi 2021: प्राणप्रतिष्ठा दुपारपूर्वी करावी

हे बेट राणे घराण्याच्या इतिहासाचे एक प्रतीक आहे. गोव्याच्या मुक्ती लढ्यात स्वतःचा इतिहास नोंदवून ठेवणारे राणे हे मूळ दीपाजी राणे यांचे वंशज असून, ते मूळचे साखळीचे आहेत. बंडाच्या वेळी सर्व राणे एकत्र न राहता पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी काहीजण खडकीला, काहीजण कुंभारखणला, तर काहीजण या जुवे बेटावर येऊन राहिले. सुमारे 300 वर्षांपूर्वी हे बेट वसले गेले आहे. 300 वर्षांपासून येथे गणेश उत्सव साजरा केला जातो. या बेटावर शेवटच्या टोकावर राण्यांचा वाडा आहे. अन्य 21 कुटुंबेही तेथे स्थायिक झालेली आहेत. गणेश चतुर्थीला या सर्व घरांमध्ये खूप सुंदर देखावे तयार केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण गोव्यातील लोक न चुकता बेटाला भेट देतात. जुव्यावरील राण्यांचे घर म्हणजे रावजी राणे, विठ्ठलराव राणे व भाऊराव राणे या तिघा भावंडांचे होय. या तिघा भावांची मुले, त्यांच्या मुलांची मुले असा हा वेल विस्तार पुढे वाढत गेला आहे. आता सर्व कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेले आहेत, पण गणेशोत्सवासाठी सर्वजण न चुकता जुव्यावर येतात. डिचोली, वडावल, म्हापसा, पर्वरी या ठिकाणाहून हे राणे कुटुंबीय चतुर्थीच्या दिवसात पाच दिवस येथे राहायला येतात.

चतुर्थीच्या आधी नागपंचमीला 21 कुटुंबे चिकणमातीचे 21 गोळे राण्यांच्या दारी आणून ठेवतात. मूर्तिकार या मातीतून गणेशाची मूर्ती तयार करतो. गणेशाची मूर्ती येथे वाड्यावर तयार केली जाते. धारगळचे मूर्तिकार श्रीकृष्ण धुमाळ हे यावर्षी मूर्ती बनवत आहेत. पहिल्यापासूनच हे धुमाळ कुटुंबीय राणे घराण्याच्या गणपतीची मूर्ती तयार करत आहेत. चतुर्थीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी या गावातील लोकांतर्फे भजनाचा कार्यक्रम होतो. या भजनी मंडळींसाठी कोणता फराळ द्यायचा हे पूर्वापार लिखित स्वरूपात नोंदवून ठेवलेले आहे. पाचव्या दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणूक निघते. आमच्या गणपतीसाठी खास रथ तयार केला जातो. आमच्या घरची गणपतीची मूर्ती या रथात बसवली जाते. नंतर मिरवणुकीला सुरुवात होते. मग एकेक करीत बेटावरील 21 ही घरातील गणेशमूर्ती याच रथात घेतल्या जातात. हा रथही राणे कुटुंबातील मुलांनी ओढायचा अशी एक प्रथा आहे.

Goa Ganpati Festival: राण्यांच्या जुव्याचा गणपती
Ganesh Chaturthi Special Recipe: करा बाप्पांच्या आवडीचा हा खास नैवेद्य

हा रथ तीरावर आला की तेथे भजनाचा कार्यक्रम होतो. सर्वांना पंचखाद्याचा नैवेद्य वाटला जातो. दोन मोठ्या कारवानचा तराफा करून सांगड बांधली जाते. सर्व गणेशमूर्ती या सांगाड्यावर बसवून संपूर्ण बेटाला एक फेरी मारली जाते. धारगळ नजीकच्या किनाऱ्यावर सर्व मूर्तींचे विसर्जन केले जाते. पूर्वी सहाव्या दिवशी गावभोजनाची पद्धत होती, ती आता बंद झाली आहे. आता सहाव्या दिवशी लोकांना फराळ वाटला जातो. नोकरी-व्‍यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिलेले राणे कुटुंबीय गणेशोत्सवासाठी मात्र दरवर्षी जुवे येथे एकत्र येतात. आणि गणेश उत्सव उत्साहात साजरा करतात राण्यांच्या तीन प्रमुख कुटुंबांपैकी दरवर्षी एका कुटुंबाने चतुर्थीची जबाबदारी घ्यायची असते. पूर्वीपासूनच असा नेम आहे.

विद्या राणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com