जनांचा ओघ वाढला...

गोव्याचा पर्यटन मोसम जोरात सुरू आहे.
जनांचा ओघ वाढला...
जनांचा ओघ वाढला...Dainik Gomantak

गोव्याचा पर्यटन मोसम (Tourist season) जोरात सुरू आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येची आकडेवारी पाहून पर्यटन खाते खुशही होत असेल. पण या साऱ्या पर्यटकांमध्ये उत्तम खर्च करणारे पर्यटक आहेत किती? आज अशाप्रकारे चांगला खर्च करणारे पर्यटक श्रीलंका, (Sri Lanka) मालदिव (Maldives) यांसारख्या ठिकाणांना पसंत करतात. का? पर्यटन क्षेत्राशी जोडलेल्या अनेक व्यावसायिकांच्या मते यामागचे कारण आहे, गोव्याच्या किनाऱ्यावर आज वाढलेली अस्वच्छता! विशेषत: काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा तिथे असलेला खच!

बागा-कळंगुट किनाऱ्यावर शनिवार-रविवार पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. हे पर्यटक ‘विकेंड’ घालवायला एक-दोन दिवसा पुरते गोव्यात आलेले असतात. गटाने जे येतात ते बहुतेकदा पुरुषच असतात. त्यांना कधी एकदा किनाऱ्यावर पोचतो असे झालेले असते. किनाऱ्यावर पोचल्यानंतर एखाद्या शॅकमध्ये प्रवेश करतात आणि मग त्यांच्याकडून बियरची मागणी होते. बियर येते पण या पर्यटकांना शॅकमध्ये बसून शांतपणे प्यायचे नसते. अगदी लाटांच्या काठाशी बसून प्यायची त्यांची इच्छा असते. ते बीअरची बाटली किंवा कॅन घेतात आणि सरळ वाळूतून चालायला सुरुवात करतात. काही शॅकचे मालक त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न करतात पण त्या ज्यांच्यावर स्वैर स्वच्छंदतेचे भूत स्वार झालेले असते त्यांच्या कानात तो सल्ला शिरत नाही.

जनांचा ओघ वाढला...
Hearty Brunch: गोव्यातील हे 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

खरं म्हणजे गोव्यात उघड्यावर दारू पिण्याविरुद्ध कायदाही आहे, जो 2 वर्षांपूर्वी बनवला गेला आहे. दोन हजार रुपये ते दहा हजार रुपयांचा दंड या अपराधासाठी आहे पण दारूच्या रिकाम्या बाटल्या वाळूत सातत्याने शिरत राहतात. गेल्यावर्षी 2020 साली, नववर्षाच्या पूर्वसंध्येला पाण्याच्या भरतीने किनारे खचले आणि त्यानंतर वाळूवर पसरून असलेला रिकाम्या बाटल्यांचा खच उघड्यावर आला. सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर पसरली गेली. कोणाकडून फेकण्यात आल्या होत्या या बाटल्या त्या वाळूत? उघड्यावर दारू पिणाऱ्याविरुद्ध कारवाई करून जमा झालेल्या दंडाच्या रकमेची माहिती घेऊ गेल्यास अशा कारवाया नगण्य प्रमाणात झाल्याचे आढळून येते. कायदा आपल्या जाग्यावर आहेच पण कायद्याची अंमलबजावणी करणारेही आपल्या जागी ढिम्म बसून आहेत.

किनाऱ्याची स्वच्छता राखणे ही महाकाय जबाबदारी बनली आहे. ही स्वच्छता राखण्यासाठी 2014 सालापूर्वी सरकार साधारण 2 कोटी रुपये खर्च करत होते. आज हा खर्च सुमारे 12 कोटींवर पोहोचला आहे. एजन्सीकडून लोकप्रिय अशा किनाऱ्यांची साफसफाई होते मात्र इतर किनारे, जसे, बांबोळी, शिरदोन, ओडशेल वगैरे दुर्लक्षित राहतात. तिथे तर कुठलीही देखरेख नसते. पर्यटकांना रान मोकळे असते.

पर्यटनक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक म्हणतात, 2005 पूर्वी गोव्यात येणारे पर्यटक दीर्घकाळासाठी येत. त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे किनाऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडत नव्हता. मात्र हल्ली ही संख्या वारेमाप वाढली आहे. 2018 साली 80 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोवा राज्य प्रदूषण मंडळाच्या माहितीनुसार त्या काळात दररोज सरासरी 530 टन कचरा गोळा केला गेला. एका स्वयंसेवी संघटनेने तर त्या वर्षी केवळ तीन दिवसाच्या किनारा सफाईतून 3.20 टन कचरा गोळा केला होता.

जनांचा ओघ वाढला...
Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?

गोव्याच्या किनाऱ्याना पर्यटक (Tourist) गर्दी करून भेट देतात यात गोव्याचा (Goa) आर्थिक फायदा नक्कीच आहे. पण ज्या शाश्वत पर्यटनासंबंधी आपण नेहमी बोलतो त्या शाश्वत पर्यटनापासून गोवा दूर जात आहे हे मात्र नक्की.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com