चांगल्या विचारांची रुजवण व्हावी...

श्याम अ. गावकर
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

मित्रांनो सुमधूर जीवनाचा आस्वाद चाखण्यासाठी मनात चांगल्या सकारात्मक विचारांचे व्हायब्रेशन सुरूच ठेवायला पाहिजे. सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाला प्रोत्साहित करते. त्यासाठी जीवनाच्या प्रवासात चांगल्या विचारांना अंगीकृत करण्याची आवश्‍यकता आहे. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ ह्या म्हणी प्रमाणे आपले जीवन सार्थकी लावून, मिळालेल्या जीवनाचा अशा प्रकारे उपयोग करावा, ज्यामुळे आपले अस्तित्व इतरांना जाणवेल.

जागतिक स्तरावर सध्या मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटसच्या सोशल प्लॅटफॉर्मवरून होणारा वापर सर्वज्ञात आहे. अशा विविध स्वरूपाच्या गॅझेटस् वर इनबिल्ट ॲप्स असतात. तर स्वतःच्या मर्जीनुसार ग्राहकांना हवे असलेले ॲप्स सहजपणे डाऊनलोड ग्राहकांना हवे असलेले ॲप्स सहजपणे डाऊनलोड करता येतात. आपल्या इच्छेनुसार हे ॲप्स डाऊनलोड करण्याची सोय ग्राहकांना मोफत उपलब्ध असते. अशावेळी सहज मनाला एक गोष्ट स्पर्श करून गेली, काश... मृत्यू नावाचे एक ॲप गुगल प्ले स्टोअरवर असते तर काय झाले असते? तसं पहायला गेलो तर सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात हा विचार थोडासा भयावह नक्कीच आहे.

सध्याचा काळ तसा पहायला गेलो तर नक्कीच भयावह वाटतो. कोरोना विषाणूने जागतिक स्तर आपल्या अक्राळ-विक्राळ भयानतेने व्यापून टाकलेला आहे. अशावेळी प्रत्येक व्यक्ती बचावात्मक पवित्रा घेत कोरोना संसर्गापासून चार हात लांब राहण्याच्या प्रयत्नात आहेत ह्या साऱ्या बाबींचा विचार केल्यास एक सत्यस्थिती ही आहे की, जीवनाचे अंतिम आणि अटळ सत्य मृत्यू असून जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा ठरलेला आहे. अशा अवस्थेत संताच्या शिकवणीचा आदर करून सर्व लोकांनी अंतिम सत्य डोळ्यासमोर ठेवून काम केली तरच वाईट गोष्टी पासून आपण सर्वजण दूर राहिले जाऊ शकतो. सध्याच्या घडीला अशी परिस्थिती आहे की, माणसाने आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचा अधिक विचार करायला हवा, व त्यानुसार वागले पाहिजे. नियंत्रणाबाहेरील गोष्टीवर अधिक ध्यान देण्याची बाब मारक ठरणारी ठरेल. माणसांकडे विचार करण्याची खुप शक्ती असते. अशा परिस्थितीत सामाजिक हित लक्षात ठेवून विचार केल्यास बऱ्याच गोष्टीतून सहज सुटका होऊ शकते. कारण माणसांच्या चुकांमुळे आपली सध्या भयावह स्थिती बनली आहे.

भीतीच्या छायेखाली राहून काहीही निष्पन्न होणार नाही, हे त्रिवार सत्य असून पुढील जीवनाचा रथ हाकण्यासाठी अटळ मृत्यूच्या भीतीतून माणसाने बाहेर पडायला शिकण्याची आवश्‍यकता आहे. अशा वेळी माणसाने नित्यपणे पॉझिटिव्ह राहण्याबरोबर पॉझिटिव्ह बोलणे ही महत्त्वाचे ठरते. माणसाने आपल्या डोक्यातून नकारात्मक विचार काढून टाकले पाहिजेत, तोंडावाटे निघणारे शब्द चांगले असल्यास आपोआप माणसांमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. मनावर कसलाही ताण येत नसतो. खरंतर रोजच्या जीवनात कसलाही ताण येण्याचं काहीही कारण नसत, पण बऱ्याचदा बाहेरच्या लोकांमुळे मनावर ताण येण्याचे प्रकार घडतात. अशावेळी माणसाने चलबिचल न होता धिटाईने समोर उभ्या असलेल्या अडचणीवर मात करण्यास पुढे सरसावले पाहिजे.

मित्रांनो, परमेश्‍वराने आपल्याला दिलेले जीवन खूपच सुंदर आहे, ते तितक्याच सुंदरपणे जगण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. देवाने दिलेले जीवन  भीतीच्या सावटाखाली राहून पुढे रेटण्यापेक्षा ते भरभरून जगण्याचा सकारात्मक विचार आचरणात आणून जगण्यास नक्कीच महत्व असते. काही गोष्टी विधिलिखित असतात, त्यावर विचार करायचा नसतो. प्राक्तनात लिहिलेल्या घटना घडणारच त्या अडवण्याचा निरर्थक प्रयत्न करून जीवनातील सुखाचे क्षण वाया घालवण्यापेक्षा आपल्या कक्षेत असलेल्या बाबींवर सकारात्मकतेने विचार करूया. जन्म आणि मृत्यू संदर्भात भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवतगीतेत खूप गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे. त्या अभ्यासण्यासाठी भगवद् गीता वाचण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे.

अशा परिस्‍थितीत मनातील भीती घालवण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. मनात भीती असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही हे सत्य सर्वज्ञात आहे. कारण भीतीपोटी माणूस काहीही करू शकत नसतो. भीतीची दशहत माणसाचे मन पोखरण्याचे काम करते. अशा अवस्थेत मनात  सकारात्मक ऊर्जा निर्माण करून जन्मास आलेल्यांना मृत्यू निश्‍चित आहे हे त्रिवार सत्य मानून पुढील जीवनाची आखणी करायला हवी. त्यासाठी मनाला पुरक ठरणाऱ्या गोष्टीचा विचार करावा. शक्य असल्यास निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवावा. यामुळे मन प्रसन्न होणार व निसर्गाचा आल्हाददायक आनंद मनातील विचारांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करेल. 

मृत्यूसंबंधीची विचारचक्रे मनात सुरू होताच आपले मन वळवून आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या सहवासात घालवावे किंवा आपले छंद जोपासण्याचे प्रयत्न करावेत. मृत्यूवर ताबा मिळविण्यासाठी मनातून प्रयत्न करावेत. मृत्यूबाबत भय वाटण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे मृत्यूबाबतची अनिश्‍चितता तो केव्हा व कधी येईल याची कल्पना माणसाला नसते. शिवाय मृत्यूनंतरचे जग कसे असते याची कल्पना माणसाला नसल्याने माणसांच्या मनात मृत्यूबद्दल भय निर्माण झालेला आहे. त्यासाठी आपल्या वाटेला आलेल्या जीवनाचा पुरेपूर फायदा उठवित मस्त जीवन जगण्यात खरी मजा असते.

‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहॉं कल क्या हो किसने जाना’ हे किशोर कुमार यांच्या आवाजातील चित्रपटातील हे सदाबहार गीत आपण नक्कीच ऐकले असेल किती सुरेखपणे जीवनाचा सार या गीतामधून सांगण्यात आलेला आहे. त्या गीतामधील सकारात्मकता समजून घेण्याची आवश्‍यकता आहे असे मला याठिकाणी नमूद करावेसे वाटते.

मित्रांनो सुमधूर जीवनाचा आस्वाद चाखण्यासाठी मनात चांगल्या सकारात्मक विचारांचे व्हायब्रेशन सुरूच ठेवायला पाहिजे. सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाला प्रोत्साहित करते. त्यासाठी जीवनाच्या प्रवासात चांगल्या विचारांना अंगीकृत करण्याची आवश्‍यकता आहे. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ ह्या म्हणी प्रमाणे आपले जीवन सार्थकी लावून, मिळालेल्या जीवनाचा अशा प्रकारे उपयोग करावा, ज्यामुळे आपले अस्तित्व इतरांना जाणवेल. आपल्यानंतर आपले नाव जनमानसात आदराने घेतले जावे त्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज आहे. 

अशा प्रकारचे यश संपादन करण्यासाठी जीवनात संघर्ष करण्याची गरज असते. आराम करण्याला विशेष महत्त्व नसते तर सतत चांगल्या विचारांची रेलचेल मनात सुरू ठेवण्याची आवश्‍यकता असते. अशावेळी चांगल्या सवयी अंगीकृत केल्या नाहीत तर नकळत वाईट सवयी आपल्या दैनंदिन जीवनावर आघात करण्याचे काम करतात, त्यासाठी सद्‍सदविवेक बुध्दीने वागण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या