संजीवन स्वर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

केवळ अद्‌भुत, स्वर्गीय... असे ज्यांच्या आवाजाचे वर्णन केले जाते त्या गानकोकीळा लतादीदींचा आज ९१ वा वाढदिवस ! दीदींनी गायलेल्या प्रत्येक गाण्याची मोहिनी रसिकांवर आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केलेल्या भावना...

लतादीदीचा आज वाढदिवस !दरवर्षी आम्ही सगळी मंगेशकर मंडळी एकत्र येतो आणि दीदींचा वाढदिवस साजरा करतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे फारसे काही करणार नाही. आदिनाथ केक आणणार आहे आणि आम्ही दोन -चार मंडळीच दीदींसोबत त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आमच्या इमारतीतील काही मंडळी इमारतीला फुले-हार वगैरे लावणार आहेत. परंतु कोरोनामुळे कुणालाही इमारतीत प्रवेश नाही. सध्या दीदी आणि मी घरी जुने सिनेमे पाहात असतो आणि टीव्हीवरील जुन्या मालिका. दीदींना सीआयडी, अदालत वगैरे मालिका खूप आवडतात आणि चित्रपटांमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे चित्रपट आवडतात. दीदींना क्रिकेटची खूप आवड आहे. सध्या आयपीएल सुरू आहे. दरवर्षी दीदी आयपीएल पाहायच्या. परंतु यावर्षी आयपीएलमध्ये प्रेक्षकच नसल्यामुळे ती गंमत येत नाही, त्यामुळे दीदी आयपीएल पाहात नाहीत.

दीदींबद्दल जेवढे बोलायचे तेवढे थोडे आहे. कारण हा आवाज म्हणजे एक दैवी चमत्कार आहे. तिने आतापर्यंत कित्येक भाषांत गाणी गायली आहेत आणि विविध प्रकारची गाणी गायली आहेत. तिने गायलेले ‘लग जा गले’ हे गाणे तिला खूप आवडते. खरं तर हे गाणे खूप कठीण आहे. पण ते दीदीने खास आपल्या शैलीत गायले आहे. त्यानंतर हेच गाणे गाण्याचा प्रयत्न कित्येक गायकांनी केला. पण तो कुणालाही फारसा जमला नाही. माझेदेखील एखादे गाणे दीदीला आवडले की ती उत्तम दाद देते आणि माझे काही चुकले असेल तर मनमोकळेपणे सांगते. ‘जय संतोषी मां’ या चित्रपटातील ‘करती हूं तुम्हारा व्रत मैं’ हे माझे गाणे दीदींना खूप आवडते. तसेच, मराठीतील ‘पिंजरा’ चित्रपटातील ‘छबीदार छबी’ हे गाणे तिला आवडते. बाळासाहेबांची (हृदयनाथ मंगेशकर), मदन मोहन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा बहुतेक संगीतकारांबरोबर दीदींनी काम केले आहे. मला दीदीने गायलेली सगळीच गाणी मला फार आवडतात. दीदीने गायलेली ज्ञानेश्वरी, मीराबाई, भगवत्‌गीता अप्रतिम आहे. आता घरी आम्ही दोघीही गप्पा मारतो त्या गाण्यांबद्दलच ! आम्ही विविध गाण्यांवर एकमेकींशी खूप बोलतो. आमच्या घरात आशा, मीना अशा आम्ही सगळ्याच जणी जेवण खूप उत्तम बनवितो. परंतु दीदींच्या हातचं कोथिंबीरीचं मटण आणि गाजराचा हलवा अप्रतिम !

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या