चराचरात देवत्व पाहणारी संस्कृती

दीपावली काळात कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाहाचा समारंभ परंपरेने केला जातो.
चराचरात देवत्व पाहणारी संस्कृती
चराचरात देवत्व पाहणारी संस्कृतीDainik Gomantak

चरचरात देवत्व पाहणारी आपली संस्कृती आहे. चराचर आपले सोयरे आहेत, अशी अपेक्षा संत ज्ञानदेवांनी व्यक्त केली. भूतदया, वनस्पती प्रेम हा त्यातीलच एक मूलमंत्र आहे. तुळस ही एक उपयुक्त आरोग्यदायी व औषधी वनस्पती आहे. हिंदूचे घर हे शोधण्याचे घरासमोरील तुळशीवृंदावन ही त्याची खूण आहे. त्यामुळेच या वनस्पतीला आमच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. त्याचाच एक भाग म्हणून दीपावली काळात कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाहाचा समारंभ परंपरेने केला जातो.

यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. जालंधर एक पराक्रमी राक्षस होता. त्याची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता होती. तिच्या पातिव्रताच्‍या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. मात्र, श्री विष्णूने त्याला पराभूत करण्यासाठी जालंधरचे रूप धारण केले व वृंदेच्या पातिव्रतेचा भंग केला. त्यामुळे युद्धात जालंधर मारला गेला. वृंदा स्वतः सती गेली. त्या ठिकाणी जी वनस्पती उगवली तीच तुळशी असे मानले जाते. त्यामुळेच विष्णूला तुळशी प्रिय झाली. द्वापारयुगात कृष्णावतारात वृंदा या महान पतिव्रतेने रूक्मिणीचे रूप धारण करून श्रीकृष्णाशी विवाह केला. त्या वेळेपासून तुलशीविवाह समारंभ परंपरेने साजरा केला जातो, असे मानले जाते. श्रीराम तुळस, विष्णू तुळस, कृष्ण तुळस, अशा तुळशीच्या वेगवेगळ्या जाती आहेत.

चराचरात देवत्व पाहणारी संस्कृती
Culture of Goa: गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया

तुळस ही वातावरण संक्रमण काळात होणाऱ्या रोगांवर उपयुक्त औषधी वनस्‍पती आहे. थंडी, ताप, खोकला, त्याचप्रमाणे उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांवर तुळशीच्‍या बियांचा वापर करण्यात येतो. तुळशी ही सौंदर्यवर्धक आहे. गांधीलमाशी, विंचू दंश यावर उतारा म्हणूनही तिचा वापर केला जातो. तुळशीच्या झाडापासून प्राणवायू बरोबरच अन्य उपयुक्त वायूंचा भरपूर पुरवठा होतो. त्यासाठी सकाळी तुळशीवृंदावनासमोर सडा रांगोळी काढून तिच्या भोवती पाच फेऱ्या मारण्याची प्रथा आहे. तुळशीविवाहाच्या निमित्ताने पतिव्रता धर्माचे स्मरण आम्ही करत असतो. तुळशी विवाहात कोकणात दिंड्याची काठी कृष्णाच्या रूपात वापरली जाते. दिंड्याच्या कोवळ्या पानांची पेस्ट पूर्वीच्या काळी केसांना लावून केस काळेभोर ठेवले जात होते. ते चिरतारूण्याचे प्रतिक आहे. त्याशिवाय या मोसमात तयार होणाऱ्या चिंचा, आवाळे, ऊस यांचाही नैवैद्य तुळशी विवाहात वापरला जातो. चिंचा, आवळे हे ‘क’ जीवनसत्व प्राप्त करून देणारे स्त्रोत आहेत. तर ऊस, गुळ, पोहे हे थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला उष्णता प्राप्त करून देतात. त्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन व पारंपारिक सणांचा कार्यकारणभाव समजून सण साजरे केल्याने त्याचे इच्छीत फळ प्रत्येकाला प्राप्त होण्यास मदत मिळेल, यांत शंका नाही.

- सुभाष राम महाले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com