खुशखबर! सणांच्या पार्श्वभूमीवर धावणार 200 स्पेशल ट्रेन्स

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

राज्य सरकारांच्या गरजा आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेने दररोज प्रवासी सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दररोज रेल्वे, वाहतूक आणि कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. तसेच आवश्यक तेथे रेल्वे  उपलब्ध करून दिल्या जातील, असे पुढे बोलताना व्ही. के. यादव म्हणाले.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 200 विशेष रेल्वे  सुरु करण्याची योजना आखत आहे. यामुळे सणांच्या काळात प्रवास करणाऱ्यांची सोय होणार आहे. याबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाचे  अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली आहे.

यादव म्हणाले की, सणांच्या काळात भारतीय रेल्वे 200 फेस्टिवल स्पेशल ट्रेन सुरु करणार आहे. गरज पडल्यास स्पेशल ट्रेनची संख्याही वाढवण्यात येईल, अशी माहितीही यादव यांनी दिली आहे. याबद्दलची बातमी न्यूज 18 ने दिली आहे.

भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 जास्तीच्या स्पेशल ट्रेनही सुरु केल्या आहेत. ज्यांना क्लोन ट्रेन्स  नाव दिले आहे. "आम्ही विविध झोनच्या महाव्यवस्थापकांची बैठक घेऊन कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला आहे. सध्या त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानंतर सणांच्या काळात किती ट्रेन सुरु करायच्या हे ठरवले जाणार आहे," असे यादव म्हणाले. 

राज्य सरकारांच्या गरजा आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेने दररोज प्रवासी सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दररोज रेल्वे, वाहतूक आणि कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. तसेच आवश्यक तेथे रेल्वे  उपलब्ध करून दिल्या जातील, असे पुढे बोलताना व्ही. के. यादव म्हणाले.

क्लोन ट्रेनबद्दल बोलताना यादव म्हणाले की, यांची क्षमता सुमारे 60 टक्के आहे. जास्त गर्दीच्या मार्गावर या गाड्यांना चालवले जात आहे. जिथे मोठी वेटींग लिस्ट असेल तिथे या क्लोन ट्रेन चालवल्या जातील. जर क्लोन ट्रेनही फुल झाली तर त्या मार्गावर आणखी एक क्लोन ट्रेन चालवली जाईल, जेणेकरून कोणताही प्रवासी  वेटिंगवर राहणार नाही.

सणांच्या काळात जास्त गजबजलेल्या मार्गावर एक किंवा दोन क्लोन ट्रेन चालवल्या जातील. रेल्वेने आतापर्यंत 40 क्लोन ट्रेनच चालवल्या आहेत. तसेच दिवाळीच्या अगोदर देशात पहिली खाजगी ट्रेन 'तेजस' सुरु होऊ शकते. आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून 'तेजस ' ट्रेन सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.

संबंधित बातम्या