‘भूदान पोचमपल्ली’ साडी सिलसिला!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

तेलंगणा राज्यातील भुवनगिरी जिल्ह्यातील ‘भूदान पोचमपल्ली’ गावाला ओळख प्राप्त करून दिली ते पोचमपल्ली साडीने. पण ही साडी पाहिली की प्रश्न पडतो की ही साडी ‘पोचमपल्ली’ की ‘इकत’?

तेलंगणा राज्यातील भुवनगिरी जिल्ह्यातील ‘भूदान पोचमपल्ली’ गावाला ओळख प्राप्त करून दिली ते पोचमपल्ली साडीने. पण ही साडी पाहिली की प्रश्न पडतो की ही साडी ‘पोचमपल्ली’ की ‘इकत’? काहीजण या साडीला ‘इकत’ साडी असेही म्हणतात. पण ‘इकत’ म्हणजे नक्की काय ? इंडोनेशियन भाषेत ‘इकत’ याचा अर्थ आहे ‘बांधणे’! ‘इकत’ ही मूळची इंडोनेशियातील ‘टाय अँड डाय’ पद्धत आहे. गुजरातमधील ‘बांधणी’ प्रकारात कापड विशिष्ट पद्धतीने बांधून रंगात बुडविले जाते; पण ‘इकत’ प्रकारात कापड विणायच्या आधीच, धागे विशिष्ट पद्धतीने बांधून नैसर्गिक रंगात बुडविले जातात आणि मग कापड विणले जाते.(Introduced the village of Bhudan Pochampalli in Bhuvanagiri district of Telangana with the Pochampalli saree)

‘इकत’ म्हणजे साडीवरील नक्षीकाम विणण्याची खास पद्धत. ‘इकत’ प्रकार पटोला साडीत, ओडिशाच्या साडीत आणि पोचमपल्ली सिल्क साडीतही असतो. म्हणून त्या साड्यांना ‘पटोला इकत’, ‘ओडिशा इकत’ किंवा ‘पोचमपल्ली इकत’ असेही म्हणतात. आता ‘इकत’ डिझाइन म्हणजे काय ते पाहूयात. पोचमपल्ली साडी विणता-विणता, ‘इकत डिझाइन’ साडीवर उतरवणे म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. साडीचे सिल्कचे उभे-आडवे धागे हातमागावर लावण्यापूर्वी एका स्टॅन्डवर आडवे लावून घेतले जातात. सगळ्या आडव्या धाग्यांवर साडीच्या ठरवलेल्या डिझाइनप्रमाणे खुणा करून घेतल्या जातात. धागे रंगात बुडवण्यापूर्वी, डिझाइनप्रमाणे जिथे रंग नको असेल तिथे ‘रेझिस्ट’ पद्धतीने दुसरे दोरे घट्ट बांधून घेतले जातात आणि मग ते सगळे धागे रंगात बुडवले जातात. याला ‘रेझिस्ट डाईंग’ असं म्हणतात.

सगळे धागे वाळले, की मग पहिले बांधलेले दोरे सोडून, डिझाइनप्रमाणे परत खुणा करून दुसरीकडे, जिथे दुसरा रंग नको असेल तिथे पुन्हा दुसरे दोरे बांधून दुसऱ्या रंगात धागे बुडविले जातात. हीच क्रिया साडीच्या डिझाइनमध्ये जितके रंग आहेत, तितक्या वेळा केली जाते. मग ते उभे-आडवे धागे हातमागावर मोजमाप करून अशा पद्धतीने लावून घेतले जातात, की धाग्यांवरचे ते ठरलेले डिझाइन साडीवर विणले जाते. यात प्रत्येक टप्प्यावर गणिती आकडेमोड करून काटेकोरपणे मोजमाप करून काम करावे लागते. 

साडीवर बारीक नक्षीकाम असेल, तर ‘डबल इकत’ केले जाते. यात उभे आणि आडवे दोन्ही धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ करून घेतले जातात. फक्त उभे धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ केले जातात तेव्हा त्याला ‘ताना-इकत’ म्हटले जाते. ‘ताना इकत’ला तुलनेने वेळ कमी लागतो. फक्त आडवे धागे ‘रेझिस्ट’ पद्धतीने ‘डाय’ केले जातात, तेव्हा त्या ‘इकत’ला ‘बाना-इकत’ म्हटले जाते. ‘बाना-इकत’लाही खूप कसब लागते कारण आडवे धागे घालताना प्रत्येक वेळेस डिझाइनप्रमाणे, मोजमाप करून उभ्या धाग्यात गुंफावे लागतात.

‘भौमितीय’ आकार
पोचमपल्ली साडी इकत पद्धतीने विणली जात असल्यामुळे त्या साडीवरील नक्षीकामात भौमितिक आकार जास्त प्रमाणात दिसतात. या नक्षीत हत्ती, पोपट, नृत्य करणाऱ्या मुली, पाने-फुले पण विणली जातात; पण या सगळ्यांना भौमितीय आकार दिलेला असतो. ‘इकत’ डिझाइनच्या कडा कधीच गोलाकार नसतात. जर्मन चित्रकार हर्मन लिन्ड याने १८९५ मध्ये भारतात आल्यावर ‘इकत’ पद्धतीने विणलेली साडी नेसलेल्या मुलीचे चित्र काढले होते. 

पूर्वी इराणमधील श्रीमंत घराण्यातील नवऱ्या मुलींना, सासरी जाताना दिल्या जाणाऱ्या उंची वस्तूंमध्ये इकत पद्धतीने विणलेले शाही कापड दिले जात असे. ‘इकत’ डिझाइन विणायच्या आधीच धागे ‘डाय’ केलेले असल्यामुळे, पोचमपल्ली साडीवरचे कोणतेही डिझाइन सुलट आणि उलट बाजूने सारखेच दिसते.  

संबंधित बातम्या