कोविड-19 च्या रोजच्या रुग्ण संख्येत मोठी घट

pib
सोमवार, 22 जून 2020

यामुळे लोकांच्या मनात असलेली भीती आणि शंका यांचे निरसन होण्यासाठी मदत होऊन सरकारच्या प्रयत्‍नाप्रती त्यांच्या मनात विश्वास वृद्धिंगत झाला.

मुंबई,

कोविड-19 ला प्रतिबंध,त्याचा प्रसार रोखणे आणि व्यवस्थापन यासाठी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्रसरकार, तत्पर आणि श्रेणीबद्ध धोरणाद्वारे अनेक उपाययोजना करत आहे. या प्रयत्नात कोविड-19  विरोधात एकत्रित प्रतिसाद दृढ करण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक तत्वे आणि उपचार विषयक सूचनावली विकसित करण्यात आल्या असून त्या राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. 

अनेक राज्यांनी या प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याचा प्रभावी परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या प्रयत्नाचा प्रोत्साहनदायी परिणाम दिसुन आला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी चेस द व्हायरस म्हणजेच विषाणूचा मागोवा आणि कोविड संशयितांचा शोध घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली. 

अतिशय दाट लोकवस्तीच्या धारावीत (2,27,136 व्यक्ती/स्क्वेअर.किमी) एप्रिल 2020 मधे 491 रुग्ण होते आणि वाढीचा दर होता 12% तर रुग्ण दुपटीचा काळ होता 18 दिवस. महानगर पालिकने राबवलेल्या तत्पर उपायांमुळे कोविड-19 रुग्ण वाढीचा दर मे 2020 मधे 4.3% वर आला तर जून मधे हा दर आणखी कमी होऊन 1.02%  झाला. या उपायांमुळे रुग्ण दुपटीचा काळ वाढून मे 2020 मधे 43 दिवस तर जून 2020 मधे 78 दिवस झाला. 

80% लोकसंख्या सार्वजनिक शौचालयावर अवलंबून असणाऱ्या धारावीत महानगर पालिकेसमोर अनेक आव्हाने होती.10 बाय 10 फुटाच्या घरात किंवा झोपडीत 8 ते 10 माणसे राहतात शिवाय या छोट्या घरांना दोन किंवा तीन मजले असतात. त्यात  बरेचदा  तळ मजल्यावर घर आणि वरच्या मजल्यावर कारखाना  आणि अरुंद गल्ल्या असलेला हा परिसर. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्यात मोठ्या मर्यादा आणि प्रभावी गृह अलगीकरणाची शक्यताच नाही.

बृहन्मुंबई महानगर पालिकेने चार टी म्हणजे ट्रेसिंग अर्थात रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, (ट्रॅकिंग) मागोवा,टेस्टिंग म्हणजे तपासणी आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार या चार बाबींचे पालन केले. यामध्ये तत्पर तपासणीसारख्या बाबींचा समावेश राहिला. 47,500 लोकांची डॉक्टर आणि खाजगी दवाखान्याद्वारे घरोघरी तपासणी तर 14,970 लोकांची फिरत्या व्हॅनमार्फत तपासणी आणि 4,76,775 जणांचे  महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. वृध्द व्यक्तीप्रमाणे जास्त धोका असलेल्या वर्गातल्या लोकांसाठी फिवर क्लिनिक उभारण्यात आली. यामुळे 3.6 लाख लोकांची तपासणी करण्यासाठी मदत झाली. 8,246 जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि वेळेवर विलगीकरण या धोरणाला अनुसरून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांना इतरांपासून विलग ठेवण्यात आले. धारावीत एकूण 5,48,270 जणांची तपासणी करण्यात आली. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर मधे आणि विलगीकरण केंद्रात हलवण्यात आले.

अतिशय धोका असलेल्या क्षेत्रात तपासणीसाठी मनुष्यबळाचा प्रश्न हाताळण्यासाठी महानगर पालिकेने, प्रतिबंधात्मक उपायांसाठी धोरणात्मक सार्वजनिक-खाजगी भागीदारी करण्याबरोबरच उपलब्ध सर्व खाजगी डॉक्टरांची मदत घेतली. पालिकने खाजगी डॉक्टराना पीपीई कीट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, ग्लोव्हज असे साहित्य पुरवून अतिशय धोका असलेल्या क्षेत्रात घरोघरी तपासणी करत सर्व संशयित शोधले. पालिकेने सर्व डॉक्टराना त्यांचे दवाखाने उघडण्यासाठी प्रोत्साहन देत आलेल्या रुग्णात कोविड-19 संशयित आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला द्यावी असे सांगितले. पालिकेने खाजगी दवाखाने निर्जंतुक करण्याबरोबरच आवश्यक ते सर्व सहाय्य केले. शहराच्या आरोग्य सुविधात वृद्धी व्हावी यासाठी सर्व खाजगी रुग्णालये उपचारासाठी घेण्यात आली.

दाटीवाटीच्या या भागात जागेच्या मर्यादेमुळे गृह विलगीकरणाचा अपेक्षित प्रभावी परिणाम मिळाला नसल्याने शाळा, लग्न सभागृहे, क्रीडा संकुले यासारख्या उपलब्ध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आल्या. या ठिकाणी नाष्टा, भोजन यासाठी कम्युनिटी किचन, अहोरात्र वैद्यकीय सेवा, आवश्यक औषधे आणि साधने पुरवण्यात आली.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कोविड-19 प्रतिसाद धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर आणि कठोर अंमलबजावणी. याचे तीन प्राथमिक घटक आहेत, प्रभावी प्रतिबंधात्मक धोरण, सर्वसमावेशक तपासणी चाचण्या आणि  जीवनावश्यक आणि इतर वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करणे. केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच धारावी बाहेर रुग्णालयात हलवण्यात आले. 90% रुग्णांवर धारावीतच उपचार करण्यात आले. महापालीकेने 25,000 पेक्षा जास्त वाणसामान संच आणि 21,000 हून अधिक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची स्वतंत्र पाकिटे प्रतिबंधित क्षेत्रात वितरीत केली यामुळे लोक  बाहेर न पडता घरातच राहिल्याने विषाणूचा प्रसाराला आळा बसण्यासाठी मदत झाली. स्थानिक खासदार, आमदार आणि नगरसेवकांनीही अन्न आणि वाणसामान मोफत पुरवले. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक शौचालयात वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एसटी गाड्या चालवण्यात आल्या. अतिशय धोका असलेले क्षेत्र सर्व बाजूनी सील करण्यात आले आणि समुदायाशी संबंधित मुद्द्यांची दखल घेण्यासाठी आणि  समुदाय आणि आरोग्य कार्यकर्ते यांच्यातला दुवा म्हणून समाजातले  नेते  कोविड योद्धे म्हणून नेमण्यात आले. 

संबंधित बातम्या