गोव्यात दिवाळीला दिला जातो पोह्यांचा आगळा वेगळा फराळ

गोव्यात दिवाळीला एक वेगळा पदार्थ बनतो जाणून घेवूया गोव्यातील या पदार्थाविषयी.
 Learn about Fov recipe food in Goa
Learn about Fov recipe food in Goa Dainik Gomantak

दिवाळीची धामधूम आपल्याला सगळीकडे पहायला मिळते आहे. त्यातच घराघरांमधून दिवाळीच्या चकली, चिवडा, लाडू अशा पदार्थांचा सुवास यायला लागला. मात्र गोव्यात या पदार्थांचा नाही तर एका वेगळ्याच पदार्थाचा सुवास दरवळतोय. गोव्यात दिवाळी साजरी होते पण वेगळ्या पद्धतीनं. भारतात सगळीकडे दिवाळीला महत्व आहे. गोव्याच्या शेजारील राज्यात जेवढ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते तेवढ्याच उत्साहाने गोव्यातही दिवाळी साजरी केली जाते. मात्र गोव्यात दिवाळी साजरी करण्याची एक वेगळी प्रथा परंपरा आहे. इथल्या सणांचा राजा म्हणजे गणपतीचा ‘चवथी’ सण असतो. मात्र तरी देखील गोव्यात दिवाळीचं देखील एक वेगळं महत्व आहे. आता गोव्यात दिवाळीला कोणता पदार्थ बनतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेव्हा जाणून घेवूया गोव्यातील या पदार्थाविषयी.

 Learn about Fov recipe food in Goa
Restaurants in Goa: मदर रेसिपीज

पोह्यांचा आगळा वेगळा फराळ

पावसाळा संपून हिवाळा लागणारा हा काळ असतो. शेतीभातीची कामं संपली असते. भाताचं नवं पीक आलेलं असतं. गोव्यात नव्या तांदळाचे पोहे करण्याचं काम याच काळात सुरु होते. पूर्वी बऱ्याच घरांमध्येच पोहे तयार करायचे त्याला कांडपज्याला म्हणजेच ‘लाट’ म्हणायचे. आणि ते घरातच सारवलेल्या जमिनीत बसवलेलेअसायचे. घरातील एक महिला त्या लाट्याला पायाने जोर देऊन दाबायची आणि त्याखाली उकडलेल्या तांदळाचे दाणे पोहे करायला ठेवायची. तर यावेळी दुसरी महिला ते पोहे नीट चेपटे व्हावेत यासाठी मदत करायची. हे करत असताना गोव्यातील प्रत्येक घरातून भाताचा मंद असा तोंडाला पाणी सोडणारा सुगंध आजूबाजूला दरवळत असायचा. कोणाच्या तरी घरी पोहे बनवले जात आहेत याची सूचना या मंद सुगंधाने आजूबाजूला लगेच पसरत होती. पोहे तयार होत असताना घरातील लहान मुलं हातातील सगळी कामं सोडून खेळण, फिरणं सोडून ते पोहे कसे बनतात यापेक्षा ते खायला कधी मिळणार याकडे लक्ष ठेवून असायचे. आता मात्र असा प्रकराचे पारंपारिक पद्धतीचे पोहे घरी बनवणं बंद झालं. आता दुकानातून तयार पोहे आणले जातात मात्र दिवाळीच्या रम्य आठवणीत या घरात बनणाऱ्या पोह्यांची आठवण मागच्या पिढीतील प्रत्येकाने जपून ठेवली आहे. पहाटे नरकासुराचं दहन झालं कि घरी येऊन अभ्यंग स्नान करायचं आणि सगळ्यांनी या ‘फोव’चा फराळ करायचा. हीच प्रथा गोव्यात अजूनही कायम आहे.

 Learn about Fov recipe food in Goa
Restaurant in Goa: नैवेद्याची खिचडी...

अनेक पद्धतींचे फोव यादिवशी बनवले जातात. याचे प्रकार ऐकूनच तुम्हाला नवल वाटेल

  • ज्या पोह्यांमध्ये गूळ, ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घातलेलं असतं ते गोडाशे फोव.

  • ज्या पोह्यांमध्ये हिरवी मिरची ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं घातलं जातं ते तिखशे फोव.

  • ताकात कालवलेल्या पोह्यांमध्ये हिरवी मिरची बारीक वाटून, कोथिंबीर घालून तौर केले जातात त्याला ताकाचे फोव म्हणतात.

  • सोलकडी तयार करून त्यात पोहे कालवले जातात त्याला कडीचे फोव म्हणतात.

  • कांदा तिखट मिठाची फोडणी घालून केलेले पोहे म्हणजेच फोण्ण फोव.

  • पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो या अनेक प्रकारातील किमान पाच प्रकार तरी गोव्यातील घरा-घरात नरक चतुर्थीला बनवले जातात.

इथे वर्षभरात घरात फारसे कधी पोहे केले जात नाही मात्र दिवाळीच्या दिवशी हे पोहे इथल्या जनमानसात रूळले आहे म्हणून गोवेकरांचं आणि या पोह्यांचं घट्ट समीकरण तयार झालं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com