‘टाळेबंदी, माझ्या सर्जनशीलतेच्यादृष्टीने सुवर्णकाळच..!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

कोविड-१९’ हा संकटाचा काळ मानून नैराश्याच्या घेऱ्यात स्वतःला अडकवून न घेता सृजनशीलानी आपल्या सृजमात्मकतेला वाहून घेऊन नवसर्जनाचा आविष्कार घडविला

 पणजी : ‘कोविड-१९’ हा संकटाचा काळ मानून नैराश्याच्या घेऱ्यात स्वतःला अडकवून न घेता सृजनशीलानी आपल्या सृजमात्मकतेला वाहून घेऊन नवसर्जनाचा आविष्कार घडविला. कवी, लेखक, कलाकार यांनी तर मोकळ्या वेळेचा लाभ उठवून नवनिर्मितीचा ध्यास घेतला आणि त्यांच्या सृजनाचा नवे धुमारे फुटले. अशाच प्रकारे व्यवसायाने शिक्षिका असलेल्या व रसायनशास्त्रासारखा रुक्ष विषय शिकवणाऱ्या डायलान फर्नांडिस या शिक्षिकेने आपल्यातील चित्रकलेच्या अंगभूत गुणांना अधिक वाव देऊन निर्मितीचा पुरेपूर आनंद घेतला. ‘स्पंदन’च्या राष्ट्रीय चित्रप्रदर्शनात आपल्या चित्रकृती प्रदर्शित करण्याचा मान मिळविलेल्या डायलान यांचा आज (गुरुवारी) आवरा प्लेनेटसच्या माझी आभासी ऑनलाइन कला प्रदर्शनात सहभाग झाला व त्यांचे हे प्रदर्शन २ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. इरूम खान यांनी क्यूरेटेड केलेल्या हे प्रदर्शन FB/AURA PLANET1203 वरून पहाता येईल.

डायलान या स्वयंशिक्षित चित्रकार. चित्रकलेच्या आवडीला त्यांनी एकलव्याचा साधनेची जोड दिली व या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. सुरवातीला छंद म्हणून त्यांनी चित्रे रंगवली. रंगाबरोबर खेळण्याने मनावरील ताण कुठल्याकुठे निघून जातो याची अनुभूती त्यांनी घेत त्यात मन रमवले. त्या म्हणतात, सर्जनशीलता लॉकडाऊन रोखू शकत नाही. या काळात अनेकजण नैराश्याग्रस्त झाले. कारण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना कुटुंबापासून दीर्घकाळ दूर रहावे लागले. आर्थिक घडी बिघडली या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब मी माझ्या चित्रातून उमटविण्याचा प्रयत्न मी केला.‘निराश होऊ नका चांगले दिवस येणार आहेत’, हा संदेश मी याद्वारे दिला आहे. 
आपल्या चित्रांचा ऑनलाईन आविष्कार घडवून डायलान यांनी फॉरेव्हर स्टार इंडियन(रिअल सुपर वुमन) पुरस्कारपण गुरुवारी त्यांनी प्राप्त केला आहे.

स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी, स्वतःला अद्ययावत करण्यासाठी ‘कोरोना’मुळे लागू केलेली टाळेबंदी हा माझ्यादृष्टीने सुवर्णकाळ आहे. म्हणूनच माझ्यातील चित्रकाराला मी नवी उभारी देऊ शकले. आभासी ऑनलाइन प्रदर्शनात भाग घेऊन सर्वदूर पोचू शकले. एवढेच नव्हे, तर माझी कला इतरांनपर्यंत पोहचविण्यासाठी मी स्वतःची यू ट्यूब वाहिनी बनवू शकले. टाळेबंदीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्याने मी वेगळं काही करून वेगळा आनंद मिळवू शकले.
- डायलान फर्नांडिस, शिक्षिका

संबंधित बातम्या