"केपेच्या विकासासाठी पालिकेचा मास्टर प्लान"

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

केपे नगरपालिकेचा सर्वागिण विकास करण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात येणार असून केपे पालिका क्षेत्रात सर्वात जास्त भेडसावणारी पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी तसेच पालिका क्षेत्राचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे अशी माहिती केपे नगरपालिकेचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनी दिली

नावेली : केपे नगरपालिकेचा सर्वागिण विकास करण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात येणार असून केपे पालिका क्षेत्रात सर्वात जास्त भेडसावणारी पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी तसेच पालिका क्षेत्राचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे अशी माहिती केपे नगरपालिकेचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनी दिली.पालिका मंडळाच्या बैठकीत या संबंधी ठराव संमत करून सुडाला मास्टर प्लान तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

केपे पालिका क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे २० हजार असून मतदारांचा आकडा सुमारे १३ हजार एवढा आहे.एकुण घरांची संख्या ६ हजार एवढी आहे.पालिका बी क्लास असुन एकुण ११ नगरसेवकांचे पालिका मंडळ आहे.

लवकरच काराळी -केपे येथे वहातुक कार्यालय (आरटीओ) तसेच केपेत कदंब महामंडळाचे नवीन बस स्थानक सार्वजनिक बांधकाम खात्या मार्फत बांधण्यात येणार आहे पालिका इमारतीच्या मागच्या बाजूला डोंगरावर वालांकिणी क्रॉस या जागेचे पर्यटन खात्या मार्फत पर्यटन दृष्टया सौंदर्यीकरणा करण्यात येणार आहे.सध्या नवीन  पोलिस स्थानक इमारतीचे बांधकाम सुरू आहे असे नाईक यांनी सांगितले.सुडा मार्फत पालिकेच्या मासळी मार्केट प्रकल्पाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी ६.७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.प्रभाग ६ मध्ये १.२ कोटी रुपये खर्चून मोवतीभाट इग्रामळ येथे कम्युनिटी सभागृह बांधण्यात येत आहे याच इमारतीत पाच दुकानांचा समावेश आहे 

केपे नगरपालिकेने जास्तीत जास्त पालिका क्षेत्रातील सवच्छतेवर जास्त भर दिला असल्याची माहिती पालिका अभियंता नितिन कोठारकर यांनी दिली.पालिका क्षेत्रातील स्वच्छते संबंधी स्वतः नगराध्यक्ष नाईक जातीने लक्ष घालत आहेत.पालिका क्षेत्रात कुठेही कचरा फेकला जात नाही परंतू जर कुणी फेकला तर दंड आकारला जातो त्यामुळे कुणी कचरा फेकत नाहीत.केपे पालिका क्षेत्रातील लोक स्वच्छते संबधी जागृत आहेत.
पालिका क्षेत्रात दारोदारी कचरा गोळा केला जातो यासाठी पालिकेचे ३६ सफाई कामगार काम करतात.पालिकेजवळ कचरा गोळा करण्यासाठी ४ रिक्षा व ४ मोठे ट्रक आहेत.दर दिवशी सुमारे ४ टन कचरा पालिका क्षेत्रात तयार होतो पावसाचे दिवस असल्याने या दिवसात कचर्‍याचे प्रमाण थोडे कमी असल्याचे कोठारकर यांनी सांगितले.

दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो व पाडामळ- शिरव ई येथे पालिकेने कचरयावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो या प्रकल्पात कचर्‍यावर प्रक्रिया करून खत तयार करून खताची विक्री केली जाते असे कोठारकर यांनी सांगितले.केपे नगरपालिका कचर्‍याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावत असून पालिका क्षेत्रातील नागरिकां कडून चांगले सहकार्य पालिकेला मिळत आहे.पालिका मंडळातील सर्व नगरसेवकां कडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हे शक्य होत असल्याचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनी सांगितले.

नगराध्यक्ष नाईक यांनी आपल्या प्रभागात पालिके मार्फत चिल्ड्रन्स पार्क उभारण्याचा आपला प्रस्ताव आहे.काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात आपण हा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी सुमारे १७.५००चौ. मी. जागा संपादन करण्यात येणार होती मात्र,काही कारणांमुळे तो रखडला आता पुन्हा एकदा नव्याने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या