निर्धार हवा बदलाचा, ध्यास नव्याचा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

सरकारने चर्चेला सुरवात करण्याआधी एक पाऊल पुढे टाकत पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पणजीत नरकासूर प्रतिमा उभारणीसाठी कोरोनासंहिता असेल, अशी घोषणा केली आहे. स्पर्धा होणार नाहीत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. नरकासूर स्पर्धांना, नरकासूर प्रतिमांना येणारे व्यावसायिक रुप लक्षात घेता तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. मडकईकर यांच्या सतर्कता, सजगतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कोरोना दरम्यान सक्रिय कामगिरी करणाऱ्या नगरपालिका अध्यक्षांत श्री. मडकईकर अव्वल राहिले आहेत.

सरकारने चर्चेला सुरवात करण्याआधी एक पाऊल पुढे टाकत पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पणजीत नरकासूर प्रतिमा उभारणीसाठी कोरोनासंहिता असेल, अशी घोषणा केली आहे. स्पर्धा होणार नाहीत, असेही त्यांनी जाहीर केले आहे. नरकासूर स्पर्धांना, नरकासूर प्रतिमांना येणारे व्यावसायिक रुप लक्षात घेता तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. मडकईकर यांच्या सतर्कता, सजगतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कोरोना दरम्यान सक्रिय कामगिरी करणाऱ्या नगरपालिका अध्यक्षांत श्री. मडकईकर अव्वल राहिले आहेत.

कोरोनाचा स्वानुभव घेऊन शहाणे झालेल्या पणजीच्या महापौरांनी दसऱ्याआधीच नरकासूरांसंदर्भात विधान करण्यालाही महत्त्व आहे. नरकासूरांसाठी कोरोना संहिता लवकरात लवकर लागू करताना त्यांनी ऑॅनलाईन नरकासूर संकल्पना साकार करण्याचा विचार जरूर करावा.

दिवाळीच्या पूर्वदिवशी गोव्यात गल्लोगल्ली दिसणारा हा असूर कोणता आहे? राज्य सरकारचे माजी सचिव विवेक रे यांनी आमचे वास्तव्य आल्तिनोला असताना मला विचारलेला प्रश्न. दिवाळीचा फराळ श्री. रे यांना देण्यासाठी गेल्यानंतर गोव्यातील इतिहासासंदर्भात गप्पा रंगत. ते बंगाली असल्यामुळे फराळ असो किंवा नरकासूर असो त्याचा संदर्भ कोलकातातील परंपरा, पद्धतींसाठी जुळवण्याचा प्रयत्न ते करीत. उत्तर भारतातील रावणासारखीच नरकासूराची प्रतिमा कशी बनते, याचेही त्यांनी निरीक्षण नोंदवलेले. 

सत्यभामेने श्रीकृष्णाच्या मदतीने देव - दानवांवर कुरघोडी करणाऱ्या राक्षस नरकासूरावर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून नरकचतुर्दशी नरकासूर दहनाने साजरी होते, या आख्यायिकेतून गोव्यात नरकासूर प्रथा सुरू झाली असावी. चाळीस - पन्नास वर्षांपूर्वी पणजी व आसपासच्या भागात मिळून दहा पंधरा नरकासूर प्रतिमा तयार व्हायच्या. त्या वाहने, ट्रकांवर बांधून गावोगाव फिरवल्या जात किंवा आहे त्या ठिकाणी प्रतिमांभोवती युद्धाचे ढोल बडवले जात. रात्रभराच्या धिंगाण्यानंतर पहाटे नरकासूरांचे दहन आणि मग अभ्यंगस्नान, फराळ. मागील पंचवीस तीस वर्षांत नरकासूरांचे होणारे व्यावसायिकरण, राजकारण काबूत आणण्यासाठी कांही संस्था आजही कार्यरत आहेत. दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या अथक प्रयत्नानंतरही नरकासूरांच्या वाढत्या प्रस्थावर नियंत्रण आलेले नाही. कदाचित कोरोनासंहिता नरकासूरांचे नवे पर्व आणेल, नरकासूर ऑॅनलाईन होईल अशी अपेक्षा आहे.

नरकासूरांसाठी कोरोना संहिता लवकर हवी. कारण, दसऱ्यानंतर लगेच प्रतिमांसाठी लगबग होते आणि त्यासाठी श्री. मडकईकर यांच्या घोषणेचे स्वागत व्हावे. शक्य झाल्यास यंदा झिरो नरकासूर वर्ष म्हणून घोषित करता येईल का? याविषयावर चर्चा व्हावी. नरकासूरांना फाटा देत नसेल, तर एक गाव, एक वाडा - प्रभाग एक नरकासूर, असे परिमाण घालून द्यावे. नरकासूरांची प्रतिमा बनवणाऱ्यांनी मास्कचा सक्तीने वापर करावा, ज्येष्ठ व लहान मुलांचा समावेश किमान असावा, स्पर्धा ऑॅनलाईन व्हाव्या, ऑॅनलाईन नरकासूर मेळा, दर्शनाची कल्पना मूर्तरुपात येऊ शकेल का? याचा अभ्यास व्हावा. नरकासूर प्रतिमांची गर्दी एकाच रस्त्यावर होऊ नये, पहाटे साडेपाच वाजेपर्यंत नरकासूर दहन झालेच पाहिजे, रात्री दहा वाजल्यानंतर नरकासूर प्रतिमांच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीतावर बंदी हवी. नरकासूरांसाठी शुल्क आकारणी मोठ्या रक्कमेची हवी कारण सार्वजनिक ठिकाणी कचरा, राखेची उचल महापालिकेद्वारे होते, त्याचा त्रास कामगारवर्गाला होतो. नरकासूर प्रतिमांवर किमान खर्च व्हावा, पैशांची उधळपट्टी थांबवावी. तो पैसा सत्कार्यासाठी देणे शक्य आहे. निवडणूकपूर्व वर्ष असल्यामुळे नरकासूर प्रतिमांसाठी विविध रुपाने निधी मिळू शकेल, याची खात्री मतदारांना असते. राजकारण्यांनी नरकासूर प्रतिमांवर खर्चाला कात्री लावल्यास पैशांची बचत होईल. 

नरकासूर भविष्यात ऑनलाईन झालाच पाहिजे. व्‍हिडिओ गेममधून गोव्याचा अपना नरकासूर होऊ शकेल का? तशाच प्रकारातून नरकासूर रोबो साकार करून त्याचे दहनही रिमोटवर करण्याची किमया घडू शकेल. गोव्यात आधुनिक नरकासूर पर्व ऑॅनलाईन नरकासूरांतून आणण्याची ही संधी आहे. पणजी महापालिकेने प्रयोगांसाठी सज्ज व्हावे, चलो ऑॅनलाईन नरकासूर हाक त्यांतून मारता येईल, पण थोडी सावधगिरी घेऊनच. कोरोना आहे हे ध्यानात ठेवूनच. नरकासूर ऑॅनलाईन व्हावा यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी योगदान देऊ शकतात. फक्त निर्धार हवा बदलाचा, ध्यास नव्याचा.

- सुहासिनी प्रभुगावकर
 

संबंधित बातम्या