Restaurants in goa: खास असे 'नवतारा'

कॅथलिक कुटुंबात जन्माला आलेले कार्लोस तवॊरा आणि शाकाहारी रेस्टोरंट कसं?
Restaurants in goa Navtara
Restaurants in goa NavtaraDainik Gomantak

2020 साली जेव्हा पहिल्यांदा गोव्याला आले होते तेव्हा पणजीत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत शाकाहारी रेस्टोरंटस होती. शाकाहारी रेस्टोरंन्टची (Restaurants in goa) संख्या कमी असल्यामुळे तिथे बसायला जागा मिळणं अवघड असायचं. पणजी चर्च जवळील कामत, कॅफे भोसले आणि पणजी मार्केटमधलं 'नवतारा' (Navtara) या रेस्टोरंन्टस्च्या पायऱ्या आलटूनपालटून चढल्या जायच्या. तेव्हा पूर्णपणे शाकाहारी होते त्यामुळे मासळीचा वास देखील सहन होत नव्हता. शाकाहारी रेस्टोरन्टमध्ये जाऊन रोज रोज काय खायचं ? असा प्रश्न मात्र कधी पडला नाही. शाकाहारी रेस्टोरंट मोजकीच असली तरी यात खूपच वैविध्य असलेले आणि खास गोव्याची चव असलेले पदार्थ (Goan food) खाऊन हे सगळे रेस्टोरंट आवडीचे झाले. यात मला नवतारा हे जरा वेगळं वाटलं.

नवतारामध्ये बील काउंटरवर उभं असताना माझं लक्ष कायम मागच्या भिंतीकडे जातं. या भिंतीवर दोन फोटो लावलेले असतात. फोटोमधील व्यक्ती त्यांच्या पेहरावावरून कॅथोलिक असल्याचं लक्षात येतं. असे फोटो लावलेत म्हणजे नक्कीच त्यांचा 'नवतारा'शी संबंध असणार असं मनातल्या मनात समीकरण तयार होऊन जातं. लवकर काहीतरी खाऊन पुढच्या कामासाठी पटकन बाहेर पडायच्या नादात नवतारातील भिंतीवरचे फोटो विसरले जातात. परत कधीतरी असंच नवतारामध्ये गेल्यावर मात्र यावेळी बील काउंटरवरील माणसाला विचारायचं असं ठरवूनच जाते. छान पोटभर खाऊन बिल देण्यासाठी काउंटरवर जाताच फोटोबद्दल विचारायचं आठवतं. पण काउंटरवरचा ठोंब्याला फोटोतील गृहस्थांबद्दल फारसं माहित नसतं. ' शायद रेस्टोरंट के मलिक का फोटो है ' एवढंच तो सांगतो. मी देखील जाऊ दे ना म्हणून तिथून निघून जाते.... अनेकवेळा झालं. मध्यंतरी म्हापसामध्ये नव्याने सुरु झालेल्या नवतारामध्ये गेले होते. तिथेही भिंतीवर तेच फोटो परत बघायला मिळाले. परत उत्सुकता जागी झाली. यावेळी मी तिथल्या मॅनेजरशी बोलले. नवताराच्या कोणत्याही शाखेत जा, तिथं भिंतीवर हे दोन फोटो दिसतातच. कोण आहेत हे? विचारताच त्याने अतिशय वेगळीच माहिती दिली. नवताराच्या भिंतीवर बघायला मिळणारा फोटो हा कार्लोस तवॊरा यांचा असून ते नवताराचे संस्थापक होते. नवताराच्या कोणत्याही शहरातील शाखेत जा, तिथे प्रत्येक ठिकाणी कार्लोस यांचा फोटो आहे. आपल्या रेस्टोरन्टच्या संस्थापकांच्या प्रति आदर व्यक्त करण्याची ही पद्धत आहे.

Restaurants in goa Navtara
Restaurants in Goa: मदर रेसिपीज

कॅथलिक कुटुंबात जन्माला आलेले कार्लोस तवॊरा आणि शाकाहारी रेस्टोरंट कसं? हा प्रश्न पडणं अगदीच स्वभाविक होतं. कार्लोस हे मुळात व्यावसायिक वृत्तीचे, अतिशय धडपडीचे होते. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करून बघितले आणि शेवटी एक चांगलं शाकाहारी रेस्टोरंट सुरु करायचं या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले. त्यांचा हा निर्णय त्यांनी त्यांच्या मित्रांना - नातेवाईकांना सांगताच सर्वांनी त्यांना वेड्यात काढलं. गोव्यात पर्यटक येतात ते मासळी खायला - दारू प्यायला. शाकाहारी रेस्टोरंट सुरु करणं म्हणजे निव्वळ नुकसानीत जाणं. अनेकांनी सल्ला दिला की असा विचारही करू नको. पण कार्लोस यांनी पणजीतील सर्व रेस्टोरंन्टस्चा अभ्यास केला होता. एकप्रकारे सर्व्हेच म्हणता येईल. हा अभ्यास करत असताना त्यांना असं दृष्य दिसलं की पणजीत जी काही मोजकी शाकाहारी रेस्टोरंन्टस आहेत त्या बाहेर ताटकळत उभे असलेल्या लोकांची भली मोठी रांग लागलीय. त्यांच्या लक्षात आलं की हे सारे शाकाहारी असल्यामुळे या बिचाऱ्यांना याच रांगेत उभं राहण्यावाचून पर्याय नाहीये.असेही भरपूर पर्यटक येतात जे शाकाहारी आहेत आणि त्यांना चांगलं जेवण मिळेल अशा रेस्टोरंन्टसची फारच कमतरता आहे. आपण ही कमतरता दूर केली पाहिजे हे त्यानी ठरवलं. गोव्यातील शाकाहारी खाद्यपदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्याचा निर्णय कार्लोस यांनी घेतला आणि यातूनच नवताराची निर्मिती झाली. कार्लोस यांच्या नवताराची पहिली शाखा पणजी मार्केटमध्ये सुरु झाली. फक्त शाकाहारी पदार्थ मिळणारं, अतिशय स्वच्छ जागा, चविष्ट पदार्थ या साऱ्यांमुळे अगदी कमी कालावधीत नवतारा लोकांमध्ये प्रसिद्ध झालं. कार्लोस तावॊरा या अतिशय महत्वाकांक्षी उद्योजकाने 22 ऑगस्ट 1986 रोजी त्याच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटचे शटर धाडसाने उघडले. रेस्टोरंटच्या व्यवसायात बारकाइने स्वतः लक्ष घालणं आणि शिस्त यामुळे नवतारा स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक विश्वासार्ह नावं बनलं.पणजी नंतर मडगाव, कलंगुट, पर्वरी, म्हापसा इथेही नवतारा सुरु झालं. कॅथलिक माणूस आपल्या रेस्टोरन्टमध्ये उत्तम दर्जाचे दक्षिणी पदार्थ देतो याचं मोठं कौतुक झालं. सकाळी गरम गरम फिल्टर कॉफी आणि गरम गरम वाफाळलेली इडली वडा - सांबार, डोसा खायला लोक गर्दी करू लागले.

Restaurants in goa Navtara
Restaurant in Goa: नैवेद्याची खिचडी...

मी पहिल्यांदा नवतारामध्ये गेले होते तेव्हा चहा मागवला. चहाची कपबशी ज्या पद्धतीने त्यांनी आणून दिली ती बघून आपण कोणीतरी खास आहोत असा भास झाला. चहाच्या कप खाली छानसा जाळीदार नक्षीचा कागद होता. असा चहा देण्याची ही युरोपिन पद्धत मी पहिल्यांदाच नवतारामध्ये अनुभवली. साधासा चहा पण तो देखील किती छान पद्धतीने दिला जातो याची चर्चा होणं साहजिकच आहे ना. लोकांना अशा छोट्या छोट्या गोष्टी आवडून जातात. नवतारामध्ये चहा प्यायला मला हे एक सुंदर निमित्त मिळालं. इथले सगळे दक्षिणी पदार्थ तर अप्रतिम आहेतच पण त्याबरोबर पंजाबी आणि मुघलाई पदार्थ देखील वैशिट्यपूर्ण आहेत. मुघलाई आणि ते देखील शाकाहारी पदार्थ मिळणं अवघड असतं पण नवतारामध्ये खास अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला. शाकाहारी पदार्थ खाणाऱ्यांना देखील अनेक उत्तम पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत हाच त्यामागचा उद्देश. यात कार्लोस यांची पुढची पिढी म्हणजेच त्यांचा मुलगा आदित्य यांचा मोठा सहभाग आहे. आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेण्यासाठी आदित्य यांनी याच विषयातलं रीतसर शिक्षण घेतलं. आता ते नवनव्या कल्पना राबवत असतात. त्यांना आपल्या वडिलांचा प्रचंड अभिमान आहे. त्यांनी 1997 मध्ये, नवतारा व्हेज रेस्टॉरंटचे गोव्यात 'मल्टी क्युझिन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट' म्हणून सुरु केलं. पंजाबी, मुघलाई, गोवा, चायनीज, उत्तर आणि दक्षिण भारतीय असा मोठा विस्तार केला. स्वच्छ वातावरण, अस्सल आणि कमी किमतीत शाकाहारी पदार्थ देण्याचा पहिल्यापासून असलेला प्रयत्न ही पुढची पिढी देखील करत आहे. याच वृत्ती आणि कामातील सातत्यामुळे आज नवताराच्या गोवाभर 12 शाखा झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com