गोव्यातील इंटरनेट सेवेमधला महत्वाचा दुवा

भौगोलिक दृष्टीने बॅण्डविथ सेवा गोव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे हे गोवा सरकारने लक्षात घ्यायला हवे
गोव्यातील इंटरनेट सेवेमधला महत्वाचा दुवा

सागर गोवेकर आपल्या आधुनिक काळाचं इंगित छानपणे मांडतो, तो म्हणतो, कधी एकेकाळी रोटी, कपडा, मकान या तीन गोष्टींना आपण जगण्याच्या मूलभूत गरजा समजत होतो. काळ बदलला तसा रस्ता, वीज आणि पाणी (नळ) या गोष्टीही मूलभूत गरजांच्या यादीत समाविष्ट झाल्या. वर्तमान काळात तर आणखीन एक गोष्ट मूलभूत गरज म्हणून आमच्या आयुष्याचा भाग झाली आहे- ती म्हणजे इंटरनेट! सागरचं म्हणणं बरोबर आहे. आज जर इंटरनेट माणसाच्या आयुष्यातून वजा केलं तर तो आपणच निर्माण केलेल्या जंजाळात पार हरवून जाईल. केबल टीव्हीच्या व्यवसायापासून सुरुवात करून सागर आज इंटरनेटच्या व्यवसायात गोव्यातला आघाडीचा व्यावसायिक बनला आहे.

खरंतर केबल टीव्ही किंवा इंटरनेट या दोन्ही व्यवसायांची कुठलीही पार्श्वभूमी त्याला नव्हती पण गोष्टी जाणून घेण्याची आणि शिकण्याची जबर इच्छाशक्ती त्याच्याकडे होती. साऱ्या अडचणीवर मात करत आणि त्यातून शिकत शिकत आज त्याने आपले स्थान यशस्वीरित्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर तयार केले आहे. १९९० च्या दशकात केबल टीव्हीच्या व्यवसायात असताना त्याला जेव्हा कळले की टीव्ही केबलच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवणेही शक्य आहे, तेव्हा त्याने त्याविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, त्या काळात कोणतीही कंपनी गोव्यात बॅण्डविथ सेवा पुरवत नव्हती. गोव्यात ही सेवा पुरवण्यासाठी त्याने प्रथम ‘सिफी'शी करार केला. पण आपण स्वतंत्रपणे ही सेवा पुरवावी ही त्याची सुप्त इच्छा होती.

रिलायन्स कम्युनिकेशनकडून एके दिवशी त्याला कॉल आला. ती कंपनी त्याला अंजूणे येथे रॉ बॅण्डविथ पुरवायला तयार होती. त्याने रिलायन्सकडून २ एमबीपीएस बॅण्डविथ मिळवले ज्याचे भाडे त्या काळात ८० हजार रुपये प्रतिमहिना होते. त्यातून त्याने लोकांना ६४ केबीपीएस, १२८ केबीपीएस आणि २५६ केबीपीएस अशा पॅकेजमार्फत इंटरनेट सेवा प्रदान करायला सुरुवात केली. आज हे ऐकायला आश्‍चर्य वाटेल पण त्या काळातली ती सर्वोत्तम इंटरनेट स्पीड होती. सागरने आपल्या व्यवसायाचा प्रारंभ अंजूणे येथे केला. त्याकाळात अंजूणेमधले सायबर कॅफे परदेशी पर्यटकांमुळे भरात होते. परंतु त्यांना इंटरनेट मात्र फार तुटकपणे मिळत होते. सागरने सुरू केलेल्या बॅण्डविथ सेवेमुळे तिथल्या सायबर कॅफेना निश्‍चितच दिलासा मिळाला असेल.

आज सागरची मालकी असलेली ‘इथरनेट -एक्सप्रेस' गोव्याच्या १००० व्यावसायिकांना आणि २५,००० घरगुती ग्राहकांना १ गिगाबाईट इंटरनेट पुरवते. त्याच्याकडे ३०० तंत्रज्ञांची फळी आहे. गोव्यात असणाऱ्या इतर टायर-१ दर्जाच्या कंपन्यांकडे स्पर्धा करण्याइतकी क्षमता आज ‘इथरनेट -एक्सप्रेस' बाळगते. कॉपर केबलपासून सुरुवात करून फायबर ऑप्टीकच्या प्रांतात प्रवेश केलेली ‘इथरनेट -एक्सप्रेस' आज गोवा राज्याला खात्यात २५ लाख रुपये जी.एस.टी मासिक भरते. सागरचे म्हणणे आहे, गोवा सरकारने जरी साधन-सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) गोव्याच्या जनतेला नीट पुरवल्या तरी गोमंतकीयाचे राहणीमान आपोआपच उंचावू शकेल. काम करण्याची क्षमता गोमंतकीयांमध्ये आहेच. आज बॅण्डबिथला गोवा सरकार फारच गृहीत धरते. सागर म्हणतो, भौगोलिक दृष्टीने बॅण्डविथ सेवा गोव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे हे गोवा सरकारने लक्षात घ्यायला हवे व त्यादृष्टीने पावले टाकायला हवीत.

पुढील काळात आपल्या ‘इथरनेट एक्सप्रेस 'ची व्याप्ती महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढवण्याची सागरची मनीषा आहे. त्याशिवाय एक शाळा सुरू करण्याचीही त्याची तीव्र इच्छा आहे. त्याचा आजवरचा प्रवास आणि जिद्द लक्षात घेतली तर आपली ही उद्दिष्टे तो पूर्ण करेल यात शंका नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.