स्वार्थी मानसिकता

स्वार्थी मानसिकता
स्वार्थी मानसिकता

व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला ठरवून काही गोष्टी कराव्या लागतील. सकारात्मक विचार करणारे दोस्त, वातावरण ह्याला आपण पसंती दिली  पाहिजे. आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. जसे चिखलातून कमळ निवडावे तदवत आपल्याकडे घडणाऱ्या चांगल्या गोष्टी  कमळाप्रमाणे आपण निवडायच्या असतात. व्यक्तिमत्व विकासात अशांना प्राधान्य देण्यात आपला विकास दडलेला आहे.

एका चर्चासत्रात मुख्य वक्त्याने एक प्रयोग करून घेतला. त्याने दहाएक श्रोत्यांना स्टेजवर बोलावून  घेतले आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हाती फुगे दिले. त्यानंतर त्याने असे जाहीर केले की, सर्वांना पाच मिनिटे दिली जातील आणि ज्याच्या हातचा फुगा शिल्लक राहील तो जेता व  त्याला खास बक्षीस आपण देईन, अशी घोषणाही केली. प्रयोगाला सुरवात झाली आणि जो तो आपला फुगा सुरक्षित ठेवून दुसऱ्याचा फुगा  फोडण्यात गर्क होता. सर्वांचे फुगे एकमेकांनी फोडले. अगदी सुरक्षित ठेवू पाहणाऱ्यांचाही प्रयोग संपला तेव्हा मुख्य व्यक्त्याने सांगितले कि, ह्या प्रयोगात सर्वानाच बक्षीस मिळण्याची सोय होती. जर कुणीच कुणाचाही फुगा फोडला नसता तर... पण, तसे झाले नाही. ह्यातून  आपली  जिंकण्याची स्वार्थी मानसिकता स्पष्ट दिसत होती. नव्हे, जाहीर झाली होती. 

आपल्याला निकोप स्पर्धेची सवय नसल्याने जो तो जिंकण्याचा प्रयत्न करतो खरा. पण, कसा? दुसऱ्याचे खच्चीकरण करून, दुसऱ्याला  खाली पाडून. हे केवळ कॉर्पोरेट विश्वातच आढळते असे नाही, तर समाजातच हे चित्र प्रकर्षाने दिसते. स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी किंवा आपली नोकरी सुरक्षित रहावी म्हणून हा आटापिटा चाललेला असतो. एका आंतरराष्ट्रीय शर्यतीच्या स्पर्धेत एक स्पर्धक मागे पडला होता अक्षरक्षः कुणाचातरी पाय लागून तो मैदानावर, त्या ट्रॅकवर पडला होता, अशावेळी जो प्रथम येणार हे नक्की होते त्याने त्या स्पर्धकाला हात  देऊन उठविले व धावण्यास  आरंभ  केला.  दुर्दैवाने त्या शर्यतीत तो  क्रमांक  मिळवू शकला नाही. पण, आयोजकांनी त्याच्या ह्या खिलाडूवृत्तीची दखल घेऊन खास पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला. जीवनाचीदेखील आपण विचित्र शर्यत करून ठेवली आहे. त्यातून  जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशात त्या पडलेल्या स्पर्धकासारखे अनेकजण भरडून जातात. काही चक्क ह्या जीवनातल्या स्पर्धेशी  कंटाळून जीवन संपवितात. व्यक्तिमत्व विकासाला ह्या दृष्टीने बघणे सर्वस्वी चुकीचे  आहे. आपण ज्यावेळी दुसऱ्याला जिंकण्यासाठी मदत  करतो, तेव्हा आपण मोठे झालेले असतो. जिंकणाऱ्याच्या हृदयात आपण स्थान निर्माण करतो. जीवनमूल्यांची उपासना खऱ्या अर्थाने आपण  करत असतो. इतिहास अशा वीरांची नक्कीच दखल घेत असतो त्यांच्या ह्या वागणुकीवर कुणी काव्य कुणी कथा कादंबरी वा नाटकही  लिहितो. थोडक्यात तो अमर होतो. आपणाला जीवनपटाचे  नायक व्हायचे आहे कि, खलनायक हे  आपण ठरवायचे आहे. दुसऱ्यांना जिंकू  देण्याची मानसिकता असेल तर समस्यादेखील गौण होऊ लागतात. असे  वागणारे  एकत्र  आल्याने बिंदूचा सिंधू  होतो. मानवाचा महामानव  होऊन जातो. दुसऱ्याच्या आंनदात आपण आंनदी असावे ही शिकवण नसल्याने मानसिकता संकुचित व्यक्ती व विकासाला अतिशय मारक  आहे, ह्याची कल्पना आपल्याला फार उशिरा येते. काहींना येतच नसते. मग आपले आयुष्य चार चौघांसारखे संपून जाते. खरुड्यात मोजणाऱ्यांत आपण एकहोऊन जातो. आपले सभोवतालचे वातावरणही तेवढेच कारणीभूत असते. आता हेच बघा ना, आपण दैनंदिन वर्तमानपत्र वाचतो त्यातही मनाला आल्हाद देणाऱ्या बातम्या असतात. पण, आपण त्या सोडून मन विषन्न करणाऱ्या बातमीकडे वळतो. माझा एकमित्र आहे नेहमी वृप्तपत्र वाचतो. पण, प्रथम तो कुठलेही वाचत असेल तर श्रद्धांजलीचे. एकदा त्याला न राहवून विचारले आरे, ते पण प्रथम वाचतोस? नंतर वाचले म्हणून काही बिघडते का? ह्यावर तो म्हणाला असे कसे? कोणी गेला आहे ह्याची माहिती नको का. मला  तिथल्या तिथे निरुत्तर केले. त्याचेही  एका दृष्टीने  खरेच. ते पृष्ठ नंतर वाचले तर फरक पडणार होता का? पण, त्याला अग्रक्रम का द्यावा? इतर वृत्त वाचून नंतर ते वाचता येत नाही का? एकेकांचे विचार वेगळे, एकेकाचा दृष्टीकोन वेगळा हेच खरे. पण व्यक्तिमत्व विकासासाठी  आपल्याला ठरवून काही गोष्टी कराव्या लागतील. सकारात्मक विचार करणारे दोस्त, वातावरण ह्याला आपण पसंती दिली  पाहिजे. आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. जसे चिखलातून कमळ निवडावे तदवत आपल्याकडे घडणाऱ्या चांगल्या गोष्टी  कमळाप्रमाणे आपण निवडायच्या असतात. व्यक्तिमत्व विकासात अशांना प्राधान्य देण्यात आपला विकास दडलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com