Shigmo 2021: गोंयचो शिमगोत्सव असता तरी कसो?

Shigmo 2021: गोंयचो शिमगोत्सव असता तरी कसो?
Shimgo 2021 Gomantakiya celebrating Public festival Shigmotsav

गोमंतकात सार्वजनिक जे उत्सव साजरे केले जातात, त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन हे केवळ ग्रामीण भागात साज-या होणाऱ्या उत्सवातूनच पाहायला मिळते. विविध धर्माचे उत्सव मग ते ख्रिश्‍चन मुस्लीम व हिंदू असो, दरवर्षी ठरावीक वेळी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या वेळी त्यांचे संम्मीलन घडते. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ, कार्निव्हल, ईद  यापैकीच शिगमोत्सव हा गोमंतकीयांचा प्रमुख सण आहे. या सणामुळे एकमेकांच्या गाठीभेटी होऊन मैत्री वृंद्धिगत होण्यास मदत होते.

प्राचीन आदिवासी संस्कृतीची पाळेमुळे शिमग्याने जतन केली जातात. लोकभावनेच्या बळावर ही संस्कृती आजपर्यंत टिकून माहिती आहे.कृषिप्रधान संस्कृतीमुळे या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऋतूमानाप्रमाणे शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजात हा सण अधिक जवळचा वाटतो. कोकणातील हा शिमगा गोव्यातही सुरू झाला. त्याने गोमंतकीय लोकजीवनातील कलात्मक कलेला साद घातली. उत्सवाच्या रूपाने समाजपुरुषाला विनम्र आवाहन केले. 

गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांची जोशपूर्ण आतषबाजी शिमग्याच्या निमित्ताने ऐकायला मिळते. या उत्सवावेळी प्रत्येक गावात नवचैतन्य संचारते, ढोल, ताशे, समेळ, घुमट, कासाळे, झांज, यांचा आवाज सर्वसामान्य खेळ गड्यांच्या मनात आनंद लहरी उमटवतो, तोडा तोणयामुळे, तारगडी ही लोकनृत्ये सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या वाड्यावरून बाहेर पडतात. मेळ म्हणजे. लोकनृत्य, गायन सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या वाड्यावरून बाहेर पडतात. मेळ म्हणजे लोकनृत्य, गायन सादर करणारा  कलाकारांचा समूह पूर्वी प्रत्येक गावागावांतूनच नळे तर वाड्यावाड्यावरून असे मेळ बाहेर पडत असत. देवभक्तीच्या भावनेने हे सर्व काही साजरे केले जाते. ईश्‍वरी अधिष्ठानामुळे आपल्याला ही कला सादर करण्याची इच्छा झाली. असे प्रत्येकाला वाटू लागते. गोव्यातील शिमगा म्हणजे गावांगावांतील रोमटामेळ आणि लोकनृत्ये!

गोमंतकात शिगमोत्सव दोन प्रकारे साजरे केले जातात. पहिला धाकटा व दुसरा थोरला. शिमग्याला गुलाला, असेही म्हणतात. नवमीपासून सुरू होणाऱ्या शिगमोत्सवाला गावातील देवस्थानच्या मांडावर सारे गावकरी जमतात. तेथे ढोल, ताशे घेऊन ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालतात नंतर नमनाची गाणी गायली जातात, शिमग्याचे नमन वैशिष्टपूर्ण असते. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती असतात. समईच्या पेटत्या ज्योतीला साक्ष ठेवून शिमग्यात म्हटल्या जाणा-या गाण्यांना ज्योती, म्हटले जाते. मांडावरील नमन होताच गावच्या देवासमोर नमन घातली जाते. ढोल, तासे, कासाळे ही वाद्ये सूर धरून धरून वाजू लागतात.

मेळ 

बहुतेक मेळात मानाची एक गुढी असते. तिचे प्राणपणाने रक्षण करा असे पूर्वजांनी सांगून ठेवलेले असते. मेळातल्या माणसाने गुढी कशी आणावी याचेही संकेत ठरलेले असतात.
गुढीची पूजा वगैरेकरून तिला पुष्पमाला आणि केल्या जातात. मेळातील साहित्य म्हणजे गुढ्या, छत्री, तोरणे, समेळ, झांज, व रणशिंगे, आदी वाघे असतात. मेळात प्रत्येक प्रकारची सोंगे आणली जातात. त्यात श्रीराम, श्रीकृष्ण श्री हनुमान, नारद यासारख्या पौराणिक सोंगाबरोबर छत्रपती शिवाजी, संत-सांधू आदींचा समावेश असतो. शिमग्यात कला सादरीकरण्यापेक्षा उपरोद्यात्मक कलाविष्काराला अधिक महत्व असते. तालगडी, तोणयामुळे, गोफ यांची शिमग्यातूनच झाली.

छत्रीची पूजा

शिमग्यातील आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे `तळी` लोकांच्या घरासमोरील अंगणात मेळ नाचायला आला की घरातील महिला एका ताटात नारळ, तांदूळ दरवाज्यात आणून ठेवतात. यालाच तळी असे म्हणतात. मेळात छत्री नाचवली जाते. या छत्रीची पूजा केली जाते. नंतर मेळाच प्रमुख एका विशिष्ट्य पद्धतीने गा-हाणे घालतो, घरातील मंडळीचे कल्याणकर असे म्हणून ताटातील थोडे तांदूळ घरावर टाकतो.

गडे पडणे

शिगमोत्सवात काही गावात गडे पडण्याची पद्धत आहे. देवालयासमोर गडे (अंगात दैवी शक्तीचा संचार झालेले) गोलाकार उभे राहतात. मध्यभागी ढोल, ताशे व कासाळे वाजविले जातात. गडे नाचत नाचत रामायण, महाभारतावर अधारित गीते म्हणतात. काही वेळाने त्या गड्याच्या अंगी दैवी संचारून तो नाचत नाचत जमिनीवर पडतो. असे एक एक गडा जमिनीवर पडत असता त्याला  दुसरा उठवतो. नंतर त्या गड्याच्या प्रत्येकी एक एक नारळ देऊन ते सर्व दडे स्थानिक (क्षेत्रपाल-देवा देवचार) या स्थळी जातात पुढे सर्व गडे स्मशानभूमीवर जातात. मृत पावलेल्या माणसाबद्दल जसे रडतात तसे हे गडे रडत रडत मोठा आवाज करीत असतात. नंतर जवळच्या नदीत किंवा तलावात आंघोळ करून आपआपल्या घरी परततात.

शिगमोत्सवानिमित्त गावातील मांडावर किंवा मंदिरासमोर पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटके सादर केली जातात. गावच्या परंपरेप्रमाणे सीमेपर्यंत देव-देवतांची पालखी वाजत गाजत मिरवणूकीने नेली जाते. तेथे प्रत्येक धार्मिक विधी करून मूळस्थानी परत येतात. काही गावात पालखी प्रत्येक घरासमोर येऊन तिची खणा नारळाने ओटी भरली जाते.

-नारायण विनू नाईक

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com